Monday, August 14, 2017

रुबाब

विख्यात दिग्दर्शक ब्रायन डी पाल्मा  यांच्या प्रचंड गाजलेल्या "THE UNTOUCHABLES" या माफियापटात सुरुवातीचा प्रसंग .... अमेरिकेतल्या शिकागो शहरातला प्रमुख माफिया अल कपोन (महान अभिनेता रॉबर्ट डी निरो एका उत्कृष्ठ भूमिकेत ) हा एका आरामखुर्चीवर ऐसपैस पसरला आहे.एक सुंदर ललना त्याच्या नखांची निगा राखते आहे एक तरबेज न्हावी कपोनच्या दाढीची तयारी करत आहे आणि अनेक पत्रकार आदबीने कपोनच्या बाजूला उभे आहेत ,कपोनचे अंगरक्षक चारीबाजूला उभे राहून आपल्या नेत्याला रक्षण देतायत.या एका प्रसंगाने कपोनची दहशत त्याचे वर्चस्व आणि त्याचा रुबाब आपल्यापर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. असे म्हणतात महान वेस्ट इंडियन फलंदाज सर विवियन रिचर्ड्स जेंव्हा खेळपट्टीपर्यंत पॅव्हेलियनकडून चालत यायचा तेंव्हा त्याच्या त्या रुबाबदार चालीनेच गोलंदाजांची गाळण उडायची. रुबाब हा एक अंगभूत गुण आहे त्याचे उसने अवसान आणता येत नाही हेच खरे. असाच एका वाघाचा रुबाब मला अनेक वर्षांपूर्वी पाहिलेला अगदी स्वछ आठवतोय.
                                माझा मामेभाऊ देवाशिष याच्या लहानपणाची ही एक गोष्ट आहे. देबूने राणीचा बाग कधीच पाहिला नव्हता आणि त्याची ही ईच्छा त्याच्या बाबाने म्हणजे माझ्या बंड्यामामाने पूर्ण करायच ठरवले आणि मलाही या सहलीत सामील करून घेतले. मामा म्हणजे अगदी "ROYAL" कारभार. रीतसर अंधेरी ते भायखळा टॅक्सी ने आम्ही राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. मी ,लतामामी,मामा आणि देबू . त्याकाळी राणीच्या बागेचे प्रवेशतिकीट केवळ २रुपये होते . मामा तिकीट काढायला गेला आणि मी आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो .  राणीच्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळ एक चांगले छोटे उद्यान आहे त्या उद्यानाच्या हिरवळीवर अनेक कुटुंबे बसली होती. आणि मुक्त हस्ताने खाण्याचे आणि बसल्याठिकाणी कचरा टाकण्याचे काम इमाने इतबारे करत होती. सकाळचे दहा साडेदहाच वाजले होते पण मे महिना असल्याने सकाळीच कमालीचे उकडत होते. राणीबागेचे ते प्रथम दर्शन अजिबात सुखावह नव्हते. तिकीट मिळाले आणि आम्ही बागेत प्रवेश केला आणि तेथील पिंजर्यात बंद असलेले प्राणी पाहू लागलो. माकडे आपल्या माकडचेष्टांमध्ये रमलेली आढळली . लांडगे पिंजऱ्यात इकडून तिकडे चकरा मारत होते. कोल्हा तर पिंजऱ्यात एका झुडूपात दडून  बसला होता. जी गत लांडग्याची तीच बिबट्याची तोही पिंजऱ्यात चकरा मारत होता मध्येच गुरगुरत होता . जंगलाच्या राजाने तर मान वर करून त्याला बघायला आलेल्यांकडे लक्ष द्यायची तसदीदेखील घेतली नाही,महाराज अगदी गाढ झोपले होते .पाणघोडा तर पाण्याच्या बाहेरच आला नाही .हत्ती आपल्याच खेळात दंग .हरणे झाडीत गायब झाली होती. एकशिंगी गेंडा आपल्या अजस्त्र घळईरूपी पिंजऱ्यात एका कोनाड्यात भिंतीकडे तोंड करून उभा होता . सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विभागात तर का आलो हा प्रश्न पडला होता. वेगवेगळ्या प्रकारचे साप,अजगर जिवंत तरी आहेत का असा प्रश्न पडावा एव्हडे निष्काम पडले होते एकूणच राणी बागे ने मला निराश केले . देबूही कंटाळला होता. आता एक वाघ बघूया आणि निघूया हा सार्वमताने आम्ही निर्णय घेतला आणि त्यादिशेने निघालो.  राणी बागेतला वाघाचा पिंजरा हा चांगलाच मोठा आणि अंडाकृती होता. आम्ही पिंजऱ्याच्या डाव्याबाजूला होतो. पिंजऱ्यात बऱ्यापैकी झाडे होती. आमच्यासारखी अनेक कुटुंबे व्याघ्रदर्शनासाठी उभी होती. पण पिंजऱ्यातील वाघ काही दिसेना आपल्या बाकी सहकार्यांसारखाच तोही कंटाळलेला असावा असा मी मनाशी विचार करत असताना त्या अंडाकृती पिंजऱ्यातल्या शेवटाशी असलेल्या  घळईत एक लांबलचक पट्टेदार शेपटी वळवळताना  दिसली आणि सगळ्यांच्या नजरा तिथे वळल्या. एक  गुरगुरणे ऐकू आले. आणि एका ढाण्या वाघाने घळईच्या बाहेर उडी मारली . त्या झोकदार प्रवेशाने एकदम धन्य झाल्यासारखे वाटले. किती सुंदर जनावर होते ते! निदान ७-८ फूट लांब,वजनदार भारदस्त शरीर,लालसर सोनेरी त्वचा आणि त्या लालसर सोनेरी त्वचेवर शोभून दिसणारे काळे पट्टे,मजबूत पाय,मोठ्ठा चेहरा त्या चेहऱ्याला शोभणाऱ्या चंदेरी मिश्या,पिवळसर डोळे ,भेदक नजर,मोठ्ठाले सुळे ,सारखी आतबाहेर होणारी गुलाबी जीभ आणि लांब शेपटी.  त्या लांब शेपटीमुळे मी मनातल्या मनात त्याचे नाव "बृहंगुलाचार्य" म्हणजे लांब शेपटीवाला असे करून टाकले. ह्या बृहंगुलाचार्याने पिंजऱ्याच्या चोहोबाजूला नजर टाकली आणि पिंजऱ्याच्या टोकाच्या दिशेने प्रस्थान केले. त्याला समोरून येताना बघावे म्हणून मी, मामी, देबूला कडेवर घेतलेला मामा सगळे आम्ही धावत पिंजऱ्याच्या टोकाशी पोहोचलो आणि धावपळीचे चीज झाले. समोरून वाघ चालत येत होता . ती त्याची चाल,त्याचा रुबाब माझ्या मनावर कायमचा कोरला गेला .अत्यंत सावकाशीने,धीमी पावले टाकत,कधी डावीकडे कधी उजवीकडे त्याच्या एका दर्शनासाठी पिंजऱ्याबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या चाहत्यांकडे कटाक्ष टाकत वाघ चालत येत होता.जणू आपल्या दरबारात सिहांसनाच्या दिशेने निघालेला अनभिषिक्त सम्राटच. एव्हाना मलूल झालेला देबू त्या वाघाला बघून आनंदाने टाळ्या वाजवू लागला,हसू लागला. पिंजऱ्याबाहेरचे अनेक जण कौतुकाने त्या वाघाचे पुरुषी सौंदर्य न्याहाळत होते पण त्याला त्याची काही पर्वा नव्हती तो आपल्याच मस्तीत होता. पिंजऱ्याच्या  टोकाला येऊन एका सावलीत तो विसावला .असा टेचात बसला होता कि बस.अनेक कॅमेरे निघाले क्लीक क्लीक झाले जणू एका नायकाचे छायाचित्रणाचे सत्र चालू होते.  खरे तर तो पिंजरा त्या वाघाचे छोटेसे विश्व पण त्या विश्वातही तो आपला आब,आपला रुबाब राखून होता. त्या एव्हढ्याश्या पिंजऱ्यात टेचात फिरत होता आपल्या मस्तीत जगत होता .आपले विश्व कसेही असो आपण त्या विश्वात आपला आब राखून जगले पाहिजे कसलीही पर्वा न करता ... 

निवृत्ती

निवृत्ती .....एकदम  चितपरिचित शब्द.....पण प्रत्येकाची निवृत्तीची संकल्पना वेगळी असू शकते. एकाच कार्यालयात अक्खी कारकीर्द घडविल्यानंतर निवृत्त होताना देखील एखाद्या निवृत्तीधारकाला लहान मुलासारखे रडताना पाहिले आहे. माझ्या परिचित एका मित्राने मला सांगितले कि त्याने असे भविष्ययोजना करून ठेवली आहे कि वयाच्या चाळीशीत त्याला निवृत्त व्हायचे आहे आणि पुढे आपल्या छंदासाठी वेळ द्यायचा आहे....माझ्या मामीला  अकाली निवृत्ती घेतल्यानंतर काय करायचे हा प्रश्न पडला होता.एक साहेब निवृत्त होत असताना त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली होती.. गेला एकदाचा.... एक महान क्रिकेटर वयामुळे हालचाली मंदावल्यानंतरदेखील केवळ अट्टाहास म्हणून खेळत राहिला...अखेर त्याला सक्तीने निवृत्त हो...असे संकेत देण्यात आल्याचा इतिहास ताजा आहे. आपल्या वयाची नव्वदी गाठून देखील पदाचा मोह न सोडणाऱ्या राजकारण्यांबद्दल तर न बोललेलेच बरे . एका महान क्रिकेटरला तो अनेक विक्रम करत असताना,चांगला भरात असताना ,त्याने अचानक निवृत्ती का पत्करली  असे विचारले तेंव्हा त्याने फार छान उत्तर दिले. तो म्हणाला, "तुम्ही कारकिर्दीच्या  सर्वोच्च शिखरावर असताना जेंव्हा तूम्ही बाजूला होता,तेंव्हा तुमची निवृत्ती अनेकांना चटका लावून जाते... सतत रुख रुख लावून जाते ... का केले त्याने असे? असा विचार करायला लावते आणि तीच खरी निवृत्तीची गम्मत आहे...थांबण्याची हीच वेळ"
नमनाला एव्हढे घडाभर तेल ओतण्याचे कारण मागच्या आठवड्यातली अशीच एक चटका लावणारी  निवृत्तीची घोषणा... तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ब्रिटिश कलाकार डॅनिएल डे लुईस याने वयाच्या साठाव्या वर्षी अभिनयाच्या प्रांतातून पत्करलेली निवृत्ती.तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ऑस्करच्या इतिहासातला तो एकमेव अभिनेता आहे . गेली ४ दशके  अभिनय क्षेत्र गाजवणारा,या क्षेत्रात येणाऱ्या अपरिहार्य मोहांना बळी ना पडलेला आणि आपले खाजगी आयुष्य कमालीचे जपणारा एक महान अभिनेता. त्याच्या कारकिर्दीकडे जर नजर टाकली तर खरेच अचंबित व्हायला होते. १९७० साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने आपल्या ४ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत केवळ २० चित्रपटांतून काम केलेय आणि यादरम्यान त्याला ४ वेळा ऑस्कर नामांकने (त्यात ३ वेळा पुरस्कार प्राप्त), ५ वेळा गोल्डन ग्लोब नामांकने(२वेळा विजेता ),४ वेळा बाफटा  नामांकने(२ वेळा विजेता) अशी भरीव कामगिरी.हा अभिनेता नाट्यक्षेत्रातही "दादा" होता,ते क्षेत्रही त्याने चांगलेच गाजवले आहे . चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याने साकारलेल्या माय लेफ्ट फूट मधील अपंग ख्रिस्टी ब्राउन,द लास्ट ऑफ द मोहिकंस मधील लढवय्या "हॉक आय " नाथनेल पो,महान दिग्दर्शक  मार्टिन स्कॉर्सेझी यांच्या "गँग्स ऑफ न्यूयॉर्क"मधला एका अनाथ मुलीवर(कॅमरॉन डीआझ ) मनापासून पोटच्या मुलीसारखे  प्रेम करणारा पण तिचे ज्याच्यावर प्रेम आहे त्या विरुद्ध गॅंगच्या नेत्याच्या (लिओनार्दो डी कॅप्रिओ ) जीवावर उठलेला क्रूरकर्मा एकाक्ष बिल "द बुचर ",प्रयोगशील दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन याच्या "देअर विल बी ब्लड" मधला कमालीचा व्यवहारी पण तितकाच हळवा पिता असलेला तेलखाणीचा मालक डॅनियल प्लान्व्हिऊ आणि ज्या भूमिकेसाठी त्याला ३ऱ्यांदा ऑस्कर मिळाले तो ख्यातनाम दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग यांच्या अमेरिकेचे महान माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा त्याच नावाचा जीवनपट "लिंकन "मधील अब्राहम लिंकन या त्याच्या भूमिका चित्रपट रसिकांच्या मनात कायम कोरल्या गेल्यात.आपण साकारत असलेल्या भूमिकेत परकायाप्रवेश केल्याप्रमाणे शिरणे ही या अभिनेत्याची खासियतच म्हणावी लागेल  आणि तसे त्याच्या भूमिकेचे आणि त्याचे अद्वैत चित्रपटरसिकांनी नेहमीच अनुभवले आहे. "माय लेफ्ट फूट "मधील अपंग साकारताना तो इतका तन्मय झाला होता की त्याला त्या मनोभूमिकेतून बाहेर काढायला एक मनोचिकित्सक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी नेहमी हजर असायचा. लिंकन  चित्रपटासाठी  भूमिकेच्या तयारीसाठी त्याने लिंकनवरची १००च्यावर पुस्तके वाचून काढली,लिंकनसारखे दिसावे म्हणून रंगभूषाकारांसोबत अनेक वेळा चर्चा केली,लिंकन जोवर आत्मसात करत नाही तोवर चित्रीकरणासाठी येणार नाही असे सांगितले आणि त्यावर ठाम राहिला. ज्याची पोचपावती  त्याला ऑस्करच्या रूपाने मिळाली . त्यावर्षी डेन्झेल वॉशिंग्टन ,ब्रॅडली कूपर ,ह्यू जॅकमन ,जॉकीन फिनिक्स अशी  तगडी स्पर्धा  असताना देखील डॅनियल ने बाजी मारली. त्याला ऑस्कर देण्यासाठी मंचावर आलेली महान अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिने तिला दिलेले विजेत्याचे नाव लिहिलेले पाकीट उघडण्याचीदेखील तसदी घेतली नाही इतकी तिला खात्री होती कि विजेता डॅनिएलच असणार . ज्यांनी लिंकन बघितलाय त्यांना भूमिकेशी तादात्म्य पावणे काय असते ते डॅनिएलच्या अभिनयातून नक्कीच अनुभवले असणार.त्याचा शेवटचा चित्रपट १९७० सालातल्या ब्रिटनमधील फॅशन इंडस्ट्रीवर बेतलेला "फँटम थ्रेड" हा आहे  आणि तो पुढच्यावर्षी ऑस्कर स्पर्धेत असेल हे नक्की,असा हा महान अभिनेता. नुकतीच  त्याला "सर "हि पदवी बहाल करण्यात आलेली आहे.