Monday, October 17, 2022

लाल सिंग चढ्ढा


"लाल सिंग चढ्ढा":एक नितांत सुंदर अनुभव

चित्रपट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि व्यक्त होण्याचे एक प्रभावी माध्यम आहे असे मला वाटते.आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांचा प्रभाव चित्रपटावर पडत असतो आणि तो चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो पण कधी कधी याच्याबरोबर उलट होतं. चित्रपटाशी संलग्न गोष्टींचा व्यक्तींचा समाजावर (चुकीचा) प्रभाव पडतो आणि मग त्या चित्रपटाला त्याचे परिणाम भोगावे लागतात.एका चांगल्या कलाकृतीची हानी होते. चित्रपट कला ही जरी समाजाभिमुख असली तरी चित्रपट हा एक स्वतंत्र विषय आहे असं मला वाटतं. ज्यामध्ये एखाद्याला आपली कला सादर करण्याचा आपल्या विचारांनी व्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण दुर्दैवाने असं होत नाही.हे सगळं मी बोलतोय कारण अशाच परिणाम भोगलेल्या एका चित्रपटाचा OTT वर पुनर्जन्म झाला आणि तो चित्रपट म्हणजे "लालसिंग चढ्ढा".
हा चित्रपट याच वर्षी 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित झाला (त्याच्याभोवती असलेल्या वादाबद्दल मला काही बोलायचं नाहीये पण एक स्वतंत्र चित्रपट म्हणून लाल सिंग चड्डा हा एक नितांत सुंदर अनुभव आहे एवढं मात्र नक्की.) लगेचच पडला.बऱ्याच लोकांना तो दुर्बोध वाटला. ९०% लोकांनी त्याची तुलना ज्या चित्रपटावर तो बेतला आहे त्या  "FOREST GUMP" या चित्रपटाशी केली म्हणूनही असेल किंवा दुसरी अनेक (चुकीची) कारणे असतील पण हा चित्रपट सिनेमागृहात चालला नाही किंवा मुद्दामून त्याला पाडण्यात आले माहित नाही. पण आता "OTT PLATFORM" वर हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे आणि घरी बसून शांतपणे ज्यांनी हा चित्रपट बघितला त्यांना आता समजतंय की केवढी मोठी चूक केली.( आणि आता मोठ्या संख्येने लोक या चित्रपटाबद्दल मनापासून व्यक्त होत आहेत).
पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल थोडेसे!!! "लालसिंग चढ्ढा" हा नव्वदीच्या दशकामध्ये आलेल्या "FOREST GUMP" या चित्रपटाचा REMAKE आहे म्हणजेच पुनरावृत्ती आहे.
"ERIK ROTH" या पटकथाकाराने अमेरिकी इतिहासात घडलेल्या कालातीत घटनांचा संदर्भ घेऊन एक बांधेसूद पटकथा बनवली ज्याला "ROBERT ZEMECKIS"सारख्या सर्जनशील दिग्दर्शकाची जोड मिळाली आणि "TOM HANKS" या मातब्बर अभिनेत्याने या चित्रपटातील प्रमुख भूमिकेचे सोने केले होते. त्या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यातही या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावत आपली छाप सोडली होती.या चित्रपटाची पुनरावृत्ती करण्याचे शिवधनुष्य उचलणे हीच एक स्वतःमध्ये फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि हे शिवधनुष्य लीलया आमिर खान प्रोडक्शन्स,आमिर खान स्वतः,अद्वैत चंदन; या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि या चित्रपटाची पटकथा ज्यांनी लिहिली ते अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लिलया पेलले आहे असे मला वाटते. मुळात एखाद्याने आधीच जर असं हिमालयासारखं कर्तृत्व करून ठेवलं असेल तर त्याला समांतर अशी पटकथा लिहिणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे.अतुल कुलकर्णी यांनी ते शक्य करून दाखवले आहे. निव्वळ अप्रतिम पटकथा!!! भारतीय इतिहासातील घडून गेलेल्या काही घटनांचा संदर्भ घेऊन त्या "लाल"च्या आयुष्यभराच्या प्रवासात अत्यंत खूबीने पेरून बांधीव अशी पटकथा अतुल कुलकर्णी यांनी तयार केली त्याबद्दल त्यांना शंभर पैकी शंभर मार्क.अद्वैत चंदन या तुलनेने नवख्या दिग्दर्शकाने अतुलजींच्या पटकथेला योग्य न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे नव्हे तो 100% यशस्वी झालाय असेच मी म्हणेन आणि अद्वैतच्या या प्रयत्नांना चित्रपटातल्या तगड्या कलाकारांची योग्य साथ मिळाली आहे.करीना कपूर खान हिने साकारलेली "रूपा डिसूजा" अप्रतिम आहे तीच गोष्ट बाला झालेल्या चैतन्य अकीनेनी या तेलुगु अभिनेत्याची. मानव वीज यांनी साकारलेला मोहम्मद हा पाकिस्तानी सैनिक लक्षात राहतो आणि आमिर खान बद्दल काय बोलायचं.आत्ममग्न असलेला,प्रेमाचा भुकेला,सरळमार्गी लालसिंग चढ्ढा आमिरने ज्या ताकदीने उभा केलाय त्याला तोड नाही.अमीर ही भूमिका जगलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हे असं आमिरच्या प्रत्येक भूमिकांच्या बाबतीत म्हणता येईल. उदाहरणच घ्यायचं झालं तर 'दंगल'मधला त्यांनी उभा केलेला महावीर सिंग फोगाट बघा METHOD ACTINGचा तो एक अप्रतिम नमुना आहे.(या भूमिकेसाठी आमिरने वजन वाढवलं,कुस्ती शिकली तरी त्यावर्षी सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार आमिरला डावलून अक्षय कुमारला त्याच्या "रुस्तम" या सुमार चित्रपटातल्या टुकार भूमिकेसाठी देण्यात आला होता. असो!!!) या चित्रपटातलं त्याचं आत्ममग्न बोलणं,डोळे मिचकावणं या लकबी लोकांना खटकू शकतात. पण आत्ममग्न लोक अशीच असतात;त्यामुळेच ती दुसऱ्यांना थोडीशी वेडी वाटतात पण खरं तर ती तशी नसतात."लाल"च्या मनात चाललेली भावनाची आंदोलनं आमिरने अवघ्या देहबोलीतून इतक्या ताकदीनं व्यक्त केली आहेत त्याला तोड नाही. निव्वळ अप्रतिम!!! आमीर काय ताकदीचा अभिनेता आहे हे जर बघायचं असेल तर या चित्रपटातला तो आपल्या मुलाला भेटतो त्याप्रसंगी व्यक्त झालेला अमीर बघा मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते.....
तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट कमाल आहे.सेतू यांचं छायाचित्रण आणि प्रीतम यांचे म्युझिक चित्रपटाला अनुरूप असेच आहे. एकूणच काय एक नितांत सुंदर चित्रपट बघायचा असेल तर "लालसिंग चढ्ढा" जरूर बघावा फक्त आपले पूर्वग्रहाचे चष्मे बाजूला काढून हा चित्रपट बघा एक नितांत सुंदर अनुभव नक्की मिळेल तुम्हाला!!!
"लालसिंग चढ्ढा" आता "NETFLIX"वर प्रदर्शित झाला आहे.

अमित अशोक परब
@amitashokparabofficial

Saturday, October 1, 2022

अभिष्टचिंतन

प्रिय उदय दादा, 

सप्रेम नमस्कार, 

आज तुझ्यासाठी खास दिवस आहे आणि याप्रसंगी तुला एका अलिखित वैश्विक सत्याची आठवण नक्कीच झाली असावी. माणसाला आपले पहिले प्रेम कधीच विसरता येत नाही आणि ते ज्या क्षणी त्याच्यापासून दूर जाते तो क्षण फार त्रासदायक असतो.आपण कितीही स्थितप्रज्ञतेचा आव आणला तरी मन भरून येते,डोळे झरू लागतात,सगळ्या जुन्या आठवणींची रिळं एकामागून एक मनाच्या पटलावर चालतात.तुझ्यासाठी फारच भावनिक क्षण असेल तो.... नक्कीच!!!
आज तुझे पहिलं प्रेम,तुझी कंपनी,ज्या कंपनीमध्ये ( तुझ्या आजच्या वयाच्या हिशेबाने) जवळजवळ आपलं अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केलंस,त्या "LARSEN & TOUBRO" कंपनीच्या मोठ्या पदावरून तू सेवानिवृत्त होतोयस..
खरंतर सेवानिवृत्ती ही सुद्धा एक नवीन सुरुवात असते.पण प्रत्येकाला असं "पुनःश्च हरी ओम्" करणं जमत नाही.त्या कंपनीशी, तिथल्या माणसांशी ऋणानुबंध जुळलेले असतात.त्या सर्व वातावरणाची सवय जडलेली असते;नव्हे तो आपल्या जीवनशैलीचाच एक भाग झालेला असतो.म्हणून जेंव्हा केंव्हा असा प्रसंग वाट्याला येतो तेंव्हा ते कटू वास्तव स्वीकारणं बऱ्याच जणांना जड जाते.निवृत्तीपश्चात अशी माणसं मग उगीचच कटू आणि कटकटी बनतात.त्यात तू  "L & T"मधील "HEAVY MACHINE SHOP"मध्ये कामाला!!! त्यामुळे आजूबाजूला असलेले रूक्ष धातू आणि विविध वाणाच्या मशीनींच्या सानिध्यात बराच काळ असलेल्या माणसाला त्यांचा गुण लागायची शक्यता असते पण तुझ्या बाबतीत असं काही घडायची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण तुझी रसिक कलाकारवृत्ती आणि तू जोपासलेले छंद.
                        तू एक चांगला गायक आहेस,फार वरच्या दर्जाचा चित्रकार-छायाचित्रकार आहेस,इंग्रजी भाषेवर तुझे प्रभुत्व आहे;या साहेबाच्या भाषेत तू केलेले लिखाण वाचनीय असते.शिवाय तुझ्या मनातला नवीन हळवा कोपरा,तूझे कोकणातले टुमदार घर "अद्वैत" आहेच.त्यामुळे आमच्यासारख्या तुझ्या सुह्रुदांना तू सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार याची चिंता नाही.
                 आपल्या तारुण्यात तू एक चांगला फलंदाज म्हणूनही लोकप्रिय होतास.आपले जुने घर,मुलुंड(पूर्व)ला असलेल्या जीवन नगर सोसायटीच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये तू लगावलेले षटकार अजूनही लोकांच्या लक्षात आहेत;त्यामुळे या तुझ्या 2ND INNINGमध्येही तू चांगली बॅटिंग करशील याची खात्री आहे.
निरोपाचे भाषण करताना आपल्या घरच्यांचे आणि सुह्रुदांचे आभार मानायचे शास्त्र असते,ते जरूर पाळ.कंपनीत २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून मिळालेले घड्याळ नक्की घाल आणि जर भावना अनावर झाल्या तर मोकळ्या मनाने अश्रूंना वाट करून दे.तिथे उगीचच स्थितप्रज्ञतेचा आव आणू नकोस.
दादा तू त्या भावनिक पिढीचा प्रतिनिधी आहेस ज्यांनी मिळालेली नोकरी आणि जिच्याशी लग्न झालं त्या छोकरीशी आयुष्यभर इमाने इतबारे निभावलं.अंगावर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलल्या.भाऊ,मित्र,मुलगा,पिता अशी नातीही मनापासून जपली. 
सुचिता वहिनीचे आभार मानायला विसरू नकोस,कारण तुझ्या आजवरच्या गृहस्थाश्रमाच्या प्रवासामध्ये तिची खंबीर साथ तुला होती,आहे आणि या पुढेही असणार आहे.
तुझ्या या सन्मानजनक निवृत्तीबद्दल उदय दादा तुझं अभिष्टचिंतन!!! आणि तुझी आतुरतेने वाट बघणार्या तूझ्या 2ND INNINGसाठी तुला डोंगराएवढा शुभेच्छा!!! 

तुझा लाडका भाऊ 

अमित

Sunday, September 18, 2022

अंतिम क्षण


झाडावरून ओघळणाऱ्या फुलासम
माझा अंतिम क्षण असावा
हे जग सोडून जात असताना
कसलाही आवाज न व्हावा

अमित अशोक परब 


सध्या पितृपंधरवडा चालू आहे आणि माझ्या वडिलांचा आज दिवस आहे. त्यानिमित्ताने सुचलेली ही चारोळी.👆
माझ्या वडिलांची शिकवण,त्यांचं प्रेम आणि इतरही अनेक 
त्यांच्या चांगल्या गोष्टी जश्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील तसाच कायम स्मरणात राहील त्यांचा अंतिम क्षण!!!! कारण तो झाडावरून ओघळणाऱ्या फुलासारखा होता.
झाडावरून जेव्हा एखादं फुल ओघळतं तेव्हा त्याचा कसलाही आवाज होत नाही आणि त्यामुळे ते ओघळल्याचे समजतही नाही.तसंच काहीसं झालं.
पप्पांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं.तरुण वयात अंगमेहनतीची काम केल्यामुळे आणि व्यायामाची मुळातच आवड असल्यामुळे वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांची प्रकृती वर्धिष्णू होती. पण २४ मे २०१८चा तो दिवस आणि तो क्षण चुकला नाही.कसल्याही मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला नाही वा अंथरुणात पडून राहावं लागलं नाही.स्वतःला आणि दुसऱ्यालाही नकोसं असणारे म्हातारपण त्यांच्या नशिबात आलं नाही.शांतपणे झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.असा अंतिम क्षण ज्याच्या नशिबात त्याला पुण्यवान माणूस असं म्हणतात.आज हे सगळे विचार मनात डोकावत असताना क्षणभर वाटून गेलं माझ्याही नशिबात असा अंतिम क्षण असेल काय?बहुदा नसावा!! कारण तेवढं पुण्यही गाठीशी असावं लागतं.........😔