Wednesday, August 7, 2024

निवृत्ती

निवृत्ती....
एकदम  चितपरिचित शब्द.....पण प्रत्येकाची निवृत्तीची संकल्पना वेगळी असू शकते. एकाच कार्यालयात अक्खी कारकीर्द घडविल्यानंतर निवृत्त होताना देखील एखाद्या निवृत्तीधारकाला लहान मुलासारखे रडताना पाहिले आहे. माझ्या परिचित एका मित्राने मला सांगितले कि त्याने असे भविष्ययोजना करून ठेवली आहे कि वयाच्या चाळीशीत त्याला निवृत्त व्हायचे आहे आणि पुढे आपल्या छंदासाठी वेळ द्यायचा आहे....माझ्या मामीला  अकाली निवृत्ती घेतल्यानंतर काय करायचे हा प्रश्न पडला होता.एक साहेब निवृत्त होत असताना त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली होती.. गेला एकदाचा.... एक महान क्रिकेटर वयामुळे हालचाली मंदावल्यानंतरदेखील केवळ अट्टाहास म्हणून खेळत राहिला...अखेर त्याला सक्तीने निवृत्त हो...असे संकेत देण्यात आल्याचा इतिहास ताजा आहे. आपल्या वयाची नव्वदी गाठून देखील पदाचा मोह न सोडणाऱ्या राजकारण्यांबद्दल तर न बोललेलेच बरे . एका महान क्रिकेटरला तो अनेक विक्रम करत असताना,चांगला भरात असताना ,त्याने अचानक निवृत्ती का पत्करली  असे विचारले तेंव्हा त्याने फार छान उत्तर दिले. तो म्हणाला, "तुम्ही कारकिर्दीच्या  सर्वोच्च शिखरावर असताना जेंव्हा तूम्ही बाजूला होता,तेंव्हा तुमची निवृत्ती अनेकांना चटका लावून जाते... सतत रुख रुख लावून जाते ... का केले त्याने असे? असा विचार करायला लावते आणि तीच खरी निवृत्तीची गम्मत आहे...थांबण्याची हीच वेळ"
नमनाला एव्हढे घडाभर तेल ओतण्याचे कारण मागच्या आठवड्यातली अशीच एक चटका लावणारी  निवृत्तीची घोषणा... तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ब्रिटिश कलाकार डॅनिएल डे लुईस याने वयाच्या साठाव्या वर्षी अभिनयाच्या प्रांतातून पत्करलेली निवृत्ती.तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ऑस्करच्या इतिहासातला तो एकमेव अभिनेता आहे . गेली ४ दशके  अभिनय क्षेत्र गाजवणारा,या क्षेत्रात येणाऱ्या अपरिहार्य मोहांना बळी ना पडलेला आणि आपले खाजगी आयुष्य कमालीचे जपणारा एक महान अभिनेता. त्याच्या कारकिर्दीकडे जर नजर टाकली तर खरेच अचंबित व्हायला होते. १९७० साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने आपल्या ४ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत केवळ २० चित्रपटांतून काम केलेय आणि यादरम्यान त्याला ४ वेळा ऑस्कर नामांकने (त्यात ३ वेळा पुरस्कार प्राप्त), ५ वेळा गोल्डन ग्लोब नामांकने(२वेळा विजेता ),४ वेळा बाफटा  नामांकने(२ वेळा विजेता) अशी भरीव कामगिरी.हा अभिनेता नाट्यक्षेत्रातही "दादा" होता,ते क्षेत्रही त्याने चांगलेच गाजवले आहे . चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याने साकारलेल्या माय लेफ्ट फूट मधील अपंग ख्रिस्टी ब्राउन,द लास्ट ऑफ द मोहिकंस मधील लढवय्या "हॉक आय " नाथनेल पो,महान दिग्दर्शक  मार्टिन स्कॉर्सेझी यांच्या "गँग्स ऑफ न्यूयॉर्क"मधला एका अनाथ मुलीवर(कॅमरॉन डीआझ ) मनापासून पोटच्या मुलीसारखे  प्रेम करणारा पण तिचे ज्याच्यावर प्रेम आहे त्या विरुद्ध गॅंगच्या नेत्याच्या (लिओनार्दो डी कॅप्रिओ ) जीवावर उठलेला क्रूरकर्मा एकाक्ष बिल "द बुचर ",प्रयोगशील दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन याच्या "देअर विल बी ब्लड" मधला कमालीचा व्यवहारी पण तितकाच हळवा पिता असलेला तेलखाणीचा मालक डॅनियल प्लान्व्हिऊ आणि ज्या भूमिकेसाठी त्याला ३ऱ्यांदा ऑस्कर मिळाले तो ख्यातनाम दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग यांच्या अमेरिकेचे महान माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा त्याच नावाचा जीवनपट "लिंकन "मधील अब्राहम लिंकन या त्याच्या भूमिका चित्रपट रसिकांच्या मनात कायम कोरल्या गेल्यात.आपण साकारत असलेल्या भूमिकेत परकायाप्रवेश केल्याप्रमाणे शिरणे ही या अभिनेत्याची खासियतच म्हणावी लागेल  आणि तसे त्याच्या भूमिकेचे आणि त्याचे अद्वैत चित्रपटरसिकांनी नेहमीच अनुभवले आहे. "माय लेफ्ट फूट "मधील अपंग साकारताना तो इतका तन्मय झाला होता की त्याला त्या मनोभूमिकेतून बाहेर काढायला एक मनोचिकित्सक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी नेहमी हजर असायचा. लिंकन  चित्रपटासाठी  भूमिकेच्या तयारीसाठी त्याने लिंकनवरची १००च्यावर पुस्तके वाचून काढली,लिंकनसारखे दिसावे म्हणून रंगभूषाकारांसोबत अनेक वेळा चर्चा केली,लिंकन जोवर आत्मसात करत नाही तोवर चित्रीकरणासाठी येणार नाही असे सांगितले आणि त्यावर ठाम राहिला. ज्याची पोचपावती  त्याला ऑस्करच्या रूपाने मिळाली . त्यावर्षी डेन्झेल वॉशिंग्टन ,ब्रॅडली कूपर ,ह्यू जॅकमन ,जॉकीन फिनिक्स अशी  तगडी स्पर्धा  असताना देखील डॅनियल ने बाजी मारली. त्याला ऑस्कर देण्यासाठी मंचावर आलेली महान अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिने तिला दिलेले विजेत्याचे नाव लिहिलेले पाकीट उघडण्याचीदेखील तसदी घेतली नाही इतकी तिला खात्री होती कि विजेता डॅनिएलच असणार . ज्यांनी लिंकन बघितलाय त्यांना भूमिकेशी तादात्म्य पावणे काय असते ते डॅनिएलच्या अभिनयातून नक्कीच अनुभवले असणार.त्याचा शेवटचा चित्रपट १९७० सालातल्या ब्रिटनमधील फॅशन इंडस्ट्रीवर बेतलेला "फँटम थ्रेड" हा आहे  आणि तो पुढच्यावर्षी ऑस्कर स्पर्धेत असेल हे नक्की,असा हा महान अभिनेता. नुकतीच  त्याला "सर "हि पदवी बहाल करण्यात आलेली आहे.

कुडतरकर लक्ष्मी ५०

वीस हून अधिक वर्षे झाली असतील; ती आमच्या कुटुंबाचा भाग झाली. दिसायला अगदी चारचौघींसारखीच.थोडीशी मान कलती ठेवून उभी राहणारी . कोकणातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या तुळस ह्या अगदी छोट्याश्या पण निसर्गाची आणि मत्स्यसंस्कृतीची जोड लाभलेल्या गावातून मुंबईत आलेली . चार  सालस बहिणी आणि एक  भाऊ, आई ,वडील असा कुटुंब कबिला. आई  साधीभोळी ,वडील देवमाणूस. रस्त्यातून चालतानाही नजर वर न करता चालणारे सरळमार्गी . चेंबूरच्या मराठी बहुल टिळक नगर मध्ये अनुभवलेले लहानपण बरेच काही देऊन गेले .मराठी वातावरण असल्याने  मराठी सण ,परंपरा लहानपणापासूनच मनावर  बिंबलेल्या ,व्यक्तिमत्वाचाच एक भाग झालेल्या . जात्याच हुशार असल्याने शिक्षणात कसलाही अडथळा आला नाही,कर्तव्यदक्ष वडिलांनी  तुटपुंज्या पगारात सर्व लेकरांचे शिक्षण व्यवस्थित केले .शिक्षण चांगले असल्याने नोकरी ही चांगली आणि पट्कन मिळाली. 
तर असे चांगले संस्कार,चांगले  शिक्षण नोकरी, चाळसंस्कृतीत वाढल्याने जुळवून घ्यायची,सर्वाना एकत्र करून राहण्याची वृत्ती अशा बर्याच चांगल्या गुणांची शिदोरी अन आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ती सुचिता शिवराम सावंत ची ...ची.सौ.कां सुचिता उदय कुडतरकर होऊन कुडतरकर घराण्यात प्रविष्ठ झाली. हे सावंतवाडीचे कुडतरकर म्हणजे तसे प्रतिष्ठित घराणेच. एक तर हे आमचे तीनही बंधू कमालीचे देखणे आणि सर्व गुणसंपन्न . तितकेच मनस्वीही आणि हट्टीही. तिचा ज्याच्याशी पाट लागला ते आमचे सर्वात मोठे बंधुराज तर गायन,चित्रकला,खेळ(वायफळ खरेदी इत्यादि ) अशा अनेक कलांमध्ये पारंगत,अभ्यासात ही कमालीचे हुशार. पण त्याच बरोबर कलाकार असल्याने अत्यंत मनस्वी आणि अगदी लहान मुलासारखे खट्याळ . अशी माणसे प्रवाही पाण्यासारखी असतात. त्यांना मायेचे, धाकाचे कुंपणाची गरज असते असे कुंपण जे त्यांच्या प्रतिभेला साथ देईल आणि प्रसंगी कठोर होवून त्यांना योग्य प्रसंगी रोखून ही धरेल. हे काम गेली वीस वर्षांहूनही अधिक काळ ती करत आहे. सर्व नात्यांचे महत्व जाणून आहे त्यांना योग्य तो मान देत आली आहे. आज वयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना तिला आनंद तर होत असेलच पण या दिवसाच्या पूर्वसंध्येला  मागे वळून बघताना या घरात अनुभवलेले बरे वाईट प्रसंगांचा ,अनुभवांचा कॅलिडोस्कोप तिच्या डोळ्यांसमोर असेल ,चांगला अनुभव आनंद देऊन गेला तर वाईट अनुभव काही तरी शिकवून गेला असेच तिला वाटत असेल हे नक्की . जीवन नगर मधल्या त्या वन रुम किचन घरात नवरा,त्याचे दोन भाऊ सासू सासरे एव्हढी मंडळी असून देखील गुण्या गोविंदाने केलेला संसार आठवत असेल तिला. तिच्या दोन्ही मुलांचा जन्म,त्यांच्या लहानपणीच्या गोड आठवणी आठवत असतील. एव्हढं मोठे कुटुंब असल्याने भांड्याला भांडे लागलेही असेल, पण त्यामुळे त्या भांडयांना पोचा पडणार नाही याची दक्षता नेहमीच घेत आलीय ती. 
तशी ती फारशी रागवत नाही. पण कधीतरी कुणावर राग ही आला असेल.अशा प्रसंगी माहेरच्या आठवणीने हळवी ही झाली असेल ते आठवेल. सायकल साठी हट्ट धरून बसलेल्या १४ वर्ष्यांच्या टोणग्या दिराला समजवता,समजवता नाकी नऊ आले होते तिच्या आणि दादाच्या. पोटच्या पोराप्रमाणे असलेल्या त्या वांड कार्ट्याला मायेने,प्रेमाने स्वत:च्या हाताने भरवले होते तिने. स्वकमाईने घेतलेले काल्हेरचे घर आठवत असेल तिला आणि आज मुलुंडमध्ये तीन खोल्यांचे स्वमालकीचे घर समाधान देत असेल.अति काळजी करते ,नेहमी कामाच्या गडबडीत असते,सारखी मुलांच्या मागे असेही तिला बर्याचदा म्हटले गेले पण तिने कधीच त्याला प्रत्युत्तर केले नाही.हसून ते सहन करत आली. ती आली आणि माझी प्रगती झाली असे आमचे बंधुराज म्हणतात ते उगीच नाही. सर्व कुटुंबाला एकत्र धरून ठेवण्याचे काम माझ्या तीनही वहिन्यांनी केलेय  त्यातही ही सर्वात ज्येष्ठ असल्याने हिची जबाबदारी कांकणभर जास्तच. लक्ष्मीच्या पावलांनी ती आली आणि कुटुंबात अशी मिसळून गेली जणू दुधात साखर . मुलांवरही खूप चांगले संस्कार आहेत.दोन्ही मुले अत्यंत हुशार आणि प्रेमळ आहेत (खरे तर आमची सर्व पुतणे मंडळी गोड आहेत). वयाची पन्नाशी असली की तिला सुवर्णमहोत्सवी वर्ष असे म्हणतात. आज आमची सुचिता वहिनी आपले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करतेय. सुवर्ण भट्टीत टाकले की त्या आगीने त्याला अजूनच झळाळी येते; ते त्याच्या गर्भित तेजाने उजळून निघते.त्याचप्रमाणे संसाराच्या भट्टीत आपल्या आयुष्याचे सोने अर्पण केल्याने  आपल्या कुटुंबियांच्या प्रति असलेल्या समर्पण भावनेच्या ,कर्तव्याच्या,प्रेमाच्या गर्भित तेजाने वाहिनीचे सुवर्णरूपी व्यक्तिमत्व अधिकच झळाळून उठले आहे आणि तिच्या गर्भित उबदार मायेची पखरण तिच्या सुहृदांवर सदैव होत राहील याची मला खात्री आहे. या वयपरत्वे अधिकच तेजस्वी होत चाललेल्या व्यक्तिमत्वाचा आज सुवर्णमहोत्सवी वाढदिवस . वहिनी तुझी आजवरची वाटचाल स्तंभित करणारी आहे .यापुढेही तुझी अशीच यशस्वी वाटचाल होवो . तुला उदंड आयुष्य लाभो .तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामीचरणी प्रार्थना....

निरोप

शेवटी ती वेळ आली.... तुला निरोप देण्याची!!
साधारण २५ वर्षांपूर्वी तू आमच्या आयुष्यात आलास; म्हणजे माझ्या वडिलांनी तुला आमच्या आयुष्यात आणलं.
आईचा वाढदिवस होता... वडिलांना आईला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं आणि या गिफ्टच्या रूपाने तू आमच्या घरी आलास . छान होतास!! METALIC GREY रंगाचा,व्यवस्थित थंड होणारा, ज्या,ज्या गोष्टी आम्हाला तुझ्या पोटात ठेवाव्याश्या वाटल्या त्या आपल्या पोटात ठेवून त्यांना COOL राहून सांभाळणारा .अगदी हल्ली हल्लीपर्यंत  तुझा हा इमानीपणा तू सोडला नव्हतास. पण आजकाल कुठेतरी तुझ्यातला तो COOLNESS हरवायला लागला होता. कधीतरी तू अतिशय थंड व्हायचास, कधी आतल्या आत खूप रडायचास, तुझा दरवाजा उघडला की सगळं पाणीच पाणी. कधीतरी स्वतःला बंदच करून घ्यायचास. मग तुझ्यासाठी तुझा डॉक्टर बोलावला की तो तुला थोडासा दुरुस्त करून परत आमच्याकडे सोपवायचा; पण अलीकडे तुझं दुखणं खूपच वाढलेलं आणि मग आमच्या लक्षात आलं की तुझं वय झालंय.तुला बदलण्याची वेळ झालीय. खरंच कठीण होता हा निर्णया आमच्यासाठी. कारण तू एक निर्जीव वस्तू जरी असलास तरी आमच्या घरातला एक भाग होतास. गेली २५ वर्षं तू आम्हाला ईमाने इतबारे सेवा दिली होतीस.
या घरातली किती स्थित्यंतरे तू पाहिलीस.माझं लग्न,माझ्या वडिलांचा मृत्यू, अवंतीचा जन्म आणि तिचं बालपण! कोरोनाकाळात तर आमच्यासाठी देवदूत होतास तू!!! हे सारे तू पाहिलेस त्यामुळे नकळतपणे तुला निरोप देताना आम्ही सारेच भावूक झालोय. विषेशतः माझी आई!!  तुला नियमितपणे स्वच्छ ठेवणं. तुझी काळजी घेणं,तू बिघडलास की माझ्या खनपटीला बसून तुझा डॉक्टर बोलायला सांगणं. हे सगळं माझ्या आईने निगुतीने केलं. पण आम्हालाही समजत होतं तुझी वेळ आता जवळ आलीय त्यामुळेच तुझाच जातकुळीतला पण थोडा वरच्या दर्जाचा तुझा भाऊ आम्ही आता आमच्या सेवेत घेतलाय; त्याला तुझ्या आशीर्वाद असू दे. उद्या तू आमच्या घरातून कायमचा जाणार हे ऐकल्यावर केवळ आम्हीच नाही तर तुझ्याबरोबर फक्त साडेचार वर्षांची  ओळख असलेली माझी लेकही भावूक झाली होती. उद्या कंपनीवाले तुला येऊन घेऊन जाणार आणि मग तुझ्याबरोबर काय होईल माहित नाही;पण आता तुझ्यासाठी एकच सदिच्छा की तुला पुन्हा नवा रंग रूप देऊन त्यांनी आमच्यासारख्याच कोणाच्या तरी चांगल्या माणसांच्या हातात तुला द्यावं आणि तू आमची केलीस तशीच सेवा त्यांचीही करावीस हीच तुझ्या मित्राची तुला शुभेच्छा....
Good BYE  "SAMSUNG REFRIGERATOR "
तू दिलेल्या पंचवीस वर्षाच्या अखंड सेवेबद्दल तुझे खूप खूप आभार.........

अलविदा