Sunday, July 16, 2017

"प्रतिमा अन्वयार्थ "

छायाचित्रण हा माझा एक आवडता छंद...जेंव्हा जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा मी माझा Nikon D3000 कॅमेरा हाताळत असतो.मला चांगली छायाचित्रे पाहणेही  आवडते.सगळीच लक्षात राहतात असे नाही पण काही प्रतिमा निश्चितच विसरल्या जात नाहीत त्या सर्वोत्तम आहेत?? माहीत नाही.... पण त्या मला आवडल्या एव्हढे मात्र निश्चित... त्या का आवडल्या त्यांचा अन्वयार्थ सांगण्याचा हा उद्देश....सुरुवात गौतम राजाध्यक्ष यांनी घेतलेल्या सचिन तेंडुलकरच्या छायाचित्राने करतो.. गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पांढऱ्या कपड्यातली सचिनची धवल प्रतिमा आपल्या समोर येते. एक अप्रतिम  "COMPOSITION " असलेला फोटो. ज्या बॅटच्या सहाय्याने सचिनने आपली कारकीर्द घडवली तिचा आधार घेतलेला पण चेंडूवर नजर रोखून ठेवलेला सचिन  इथे आपल्याला दिसतो.एका महान फलंदाजाचे संपूर्ण व्यक्तिमत्व अधोरेखित करणारे हे छायाचित्र. तसेच एक छायाचित्र स्टेफी ग्राफचे मी बघितले होते. ९०च्या दशकातली ही जर्मनीची अतिशय देखणी टेनिस सम्राज्ञी. टेनिस कोर्टवर बेसलाईनवर उजव्या हातात टेनिसचे रॅकेट घट्ट धरलेली,दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवलेली,कमरेत थोडीशी पुढे झुकून  प्रतिस्पर्ध्याच्या सर्विसवर नजर असलेली "READY FOR ACTION"  स्टेफी अत्यंत आकर्षक वाटते. काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले एक उत्कृष्ठ छायाचित्रकार दिवंगत जगदीश माळी या मराठमोळ्या छायाचित्रकाराने ९०च्या दशकात काढलेले अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन या तत्कालीन चित्रपट महानायकांचे एक छायाचित्र असेच माझ्या कायम स्मरणात राहिले ;एका पंचतारांकित हॉटेलच्या श्रीमंती प्रवेशद्वाराच्या समोर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या "Rolls Royce"च्या बॉनेटवर पांढऱ्या सुटाबुटात बसलेले हे दोन सुपरस्टार्स."Rolls Royce" ही गाडी म्हणजे श्रीमंतीचे,खानदानीपणाचे एक आदर्श उदाहरण,आजच्या काळातही हि गाडी सर्वोत्तम मानली जाते. अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांचे यशाच्या शिखरावर असणे अधोरेखित करण्यासाठी या गाडीचा एक प्रतिमा म्हणून केलेला वापर निव्वळ अप्रतिम. राज कपूर-नर्गिस या जोडीची अनेक छायाचित्रे असतील पण लंडनच्या एक दुकानासमोर उभे असलेले राज नर्गिस यांचे एक वेगळे पण आकर्षक असे छायाचित्र. नखशिखांत पाश्चिमात्य पेहरावातला बोटांत सिगारेट धरलेला देखणा राज आणि साडी नेसलेली पण ओव्हरकोट घातलेली नर्गिस..एक अंगावर पडलेले पाणी पाडूनदेखील ओले न होणारे कमलपर्ण तर दुसरा त्या पानावर पडलेला थेंब..."ना एक हुवे ना अलग हो सके " ... एक अविस्मरणीय प्रेमाची शोकांतिका . राज नर्गिस जोडीचे अद्वैत दाखवणारा एक आरसा म्हणजे हे छायाचित्र.विक्रम शेठ हे जागतिक साहित्यातले एक मोठे नाव... त्यांच्या लिखाणाचा मोठा चाहता असलेला आजच्या घडीचा सर्वोत्तम अभिनेता आमिर खान याचे विक्रमजींची स्वाक्षरी घेतानाचे छायाचित्र म्हणजे स्वत: एक मोठे नाव असून देखील दुसर्याचे मोठेपण मान्य करण्याची प्रगल्भता दाखविणारे प्रतीक. शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे हा एक लोकविलक्षण नेता... अत्यंत रसिक,करारी व्यक्तिमत्व...उंची मद्य ,सिगार यांचा षौक असणारे आणि ते कधी लपवून न ठेवणारे मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे बाळासाहेब... विख्यात छायाचित्रकार रघु राय यांनी कृष्णधवल शैलीत काढलेला बाळासाहेबांचा फोटो खासच आहे. आपली आवडती सिगार हातात घेऊन ऐटीत बसलेले बाळासाहेब. त्यांच्या मागे बाळासाहेबांचे आदर्श महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांचे चित्र तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे चिन्ह असलेला ढाण्या वाघ.. समाजकारण आणि राजकारण यांची योग्य तोल बाळासाहेबांनी साधला होता हे अधोरेखित करणारे हे छायाचित्र. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे राजकारणात पूर्ण बुडालेले असले तरी छायाचित्रण हा त्यांचा श्वास आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांचे हवाई छायचित्रण उद्धवजींनी केले आहे त्यांचे ते छायाचित्रण करून परत असताना हेलिपॅडवर काढलेला त्यांचा फोटो असाच माझ्या नेहमी स्मरणात राहील. निळ्या हेलिकॉप्टरच्या समोर दोन्ही हातात एकेक कॅमेरा घेऊन उभे असलेले सुहास्यवदन उद्धवजी.. या छायाचित्राचे विशेष म्हणजे उद्धवजींचे हास्य... इतके निरामय आणि खरे हास्य शिवसेना निवडणुकीत जिंकल्यावर देखील त्यांच्या चेहऱ्यावर आले नसेल.. राज ठाकरे आपल्या काकासाहेबांसारखेच करारी आणि हाडाचे व्यंगचित्रकार ... बाळासाहेबांकडून त्यांना तो वारसा मिळाला पण केवळ त्यावर समाधानी न राहता राजसाहेबांनी स्वतः ची शैली निर्माण केली,असेच चित्र काढण्याच्या तयारीत असलेल्या राजसाहेबांचे छायाचित्र मी पाहिले होते.... अत्यंत बोलके चित्र .. आपल्या खोलीत जमिनीवर मांडी घालून बसलेले राजसाहेब समोर एक लोड ठेवलेला त्या लोडावर लाकडी ड्रॉईंग बोर्ड ठेवला आहे. त्या बोर्डाला एक कोरा कागद नीट अडकवलेला आहे. राजजींच्या बाजुलाच एक उघडलेले  सोनेरी रंगाचे  "Benson and Hedges" या उंची सिगारेटचे पाकीट ठेवलेले,त्याच्या बाजूला चित्र काढण्यासाठी वापरले जाणाऱ्या काळ्या रंगाची काचकुपी झाकण उघडून ठेवलेली, राजजींच्या एका हाताच्या बोटांत कुंचला,तर दुसरा हाताच्या बोटांत एक अर्धी संपलेली सिगारेट आणि तो हात अर्धा मुडपून सिगारेटला ओठांशी लावायला निघालेला..समोर असलेल्या कागदावर आपली नजर खिळवलेले आणि काय चित्र काढावे या विचारात गढलेले राजसाहेब... आपल्या भाषणातून आपली भूमिका आक्रमकपणे मांडणारे अतिशय भेदक डोळ्यांचे आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आदरयुक्त वचक असलेले,आणि कोणत्याही नेत्याची अचूक नक्कल करू शकणारे राज या चित्रात अतिशय मोहक आणि सोज्वळ वाटतात.एखाद्या नेत्याचे मला सर्वात आवडलेले छायाचित्र . छायाचित्रण हा अचूक वेळ साधण्याची कला आहे ज्याने हि वेळ साधली त्याला एक ग्रेट फोटो मिळालाच समजा.  अशीच अचूक वेळ साधली आहे  प्रसिद्ध वन्यछायाचित्रकार युवराज गुर्जर ने. सापाची जीभ हा त्याचा महत्वाचा अवयव आहे.. साप सारखा आपली जीभ आत बाहेर करत असतो..अगदी  क्षणार्धात! अशी सापाची बाहेर आलेली दुभंगलेली जीभ युवराजने इतकी अचूक टिपली आहे कि ज्याचे नाव ते. अशीच किमया साधली आहे नयन खानोलकर याने. बोरिवलीतल्या राष्ट्रीय उद्यानातल्या आदिवासी पाड्यांमध्ये हल्ले करणाऱ्या बिबळ्यांचा अभ्यास करणारा हा तरुण. नयनने या पाड्यांमध्ये लपवलेल्या एका कॅमेरामधे पाड्यात शिरलेला बिबळ्या टिपला आहे.कॅमेराकडे कुतूहलाने पाहणारा पण सावधपणे पावले टाकणारा बिबळ्या त्याच्या मागे असलेल्या पिवळ्या बल्बच्या प्रकाशात अप्रतिम टिपला गेला आहे.तर असे हे मला आवडलेले काही फोटो,प्रत्येकाचे  मला जाणवलेले गुणविशेष,मला जाणवलेली सौंदर्यस्थळे. यातले बहुतेक फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. 

No comments:

Post a Comment