Thursday, August 12, 2021

अण्णा पन्नाशी

मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक!!! मला सख्खे भावंडं नाही.पण मला माझ्या नात्यातल्या भावंडांचे खूप प्रेम लाभले आहे.त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.त्यातही माझ्या सख्ख्या आत्येभावांचे म्हणजे तीनही कुडतरकर बंधूंचे प्रेम मला जरा जास्तच लाभले आहे.माझे सख्खे भाऊ वाटावेत असे हे तिघे. याच माझ्या तीन भावांपैकी सर्वात धाकट्या पातीचा म्हणजे माझ्या अजित अण्णाचा आज सुवर्ण महोत्सवी अर्थात ५०वा वाढदिवस.
मी त्याला "अण्णा" अशी हाक का आणि कधी मारायला लागलो मलाच माहीत नाही. (पुढे जाऊन तो दक्षिण भारताचा जावई होणार आहे असं मला कुठेतरी दिसलं असावं म्हणून असेल कदाचित!!! दक्षिण भारतीय लोक मोठ्या भावाला "अण्णा" म्हणतात म्हणून मी त्यालाही अण्णा म्हणायला सुरुवात केली असावी.) खरं तर त्याला अण्णा म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही.तो नेहमी मला दरडावून सांगायचा "ए मला अजित म्हण!! "अण्णा" म्हणून हाक मारू नकोस!!!" मग मी पण मुद्दाम तो चारचौघात विशेषतः त्याच्या खास मित्रांच्या गोतावळ्यात असला की त्याला चिडवायला लांबून त्याला "अण्णा" म्हणून हाक मारायचो. सुट्टी पडली की मामाच्या गावाला जाऊया असे आपल्या लहानपणी म्हणायचे माझ्या बालपणीतल्या बहुतेक सुट्ट्या ह्या मुलुंडला माझ्या आत्याच्या घरी जीवन नगर सोसायटीत गेल्यात. माझा सर्वात मोठा दादा उदय माझे सर्व लाड पुरवायचा.दोन नंबरचा भाऊ ऋतुराज माझी खूप काळजी घ्यायचा.पण अण्णा माझा यार होता. खेळातला सवंगडी होता.त्याचे कितीतरी क्रिकेटचे सामने मी केवळ प्रेक्षक म्हणून बघायला जायचो.त्याची गोलंदाजी इतकी भन्नाट होती की त्याच्या गोलंदाजीला त्याच्या एरियातले तत्कालीन भले भले फलंदाज घाबरायचे.भन्नाट वेगाने चेंडू टाकणारा सहा फूट उंच माझा अण्णा पाहणे म्हणजे एक पर्वणी असायची आणि आपल्या पहिल्याच षटकात समोरच्या संघातला गडी बाद करण्यात त्याचा हातखंडा होता.त्या क्षेत्रात पुढे गेला असता तर तो खरंच एक नावाजलेला गोलंदाज झाला असता यात काही शंकाच नव्हती.पण त्याने वेगळे क्षेत्र निवडले.त्यातही आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर तो आज खूप मोठ्या पदावर आहे.
त्याचा जन्म १३ तारखेचा!! तेरा ही अशुभ तारीख समजली जाते. पण आपल्या कर्तृत्वाने अण्णाने ही तारीख किती शुभ असू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.तीन भावंडांत तो सर्वात धाकटा!!! पण या तिन्ही भावंडांमध्ये बऱ्याच बाबतीत त्याने पहिला नंबर लावला आहे. मुंबईच्या बाहेर नोकरी करायला गेलेला या तीन भावांतला तो पहिला.नोकरीनिमित्ताने परदेशवारी करणाराही पहिला तोच आणि या तीन भावंडांपैकी चार चाकी गाडी घेणाराही तोच पहिला.
असं म्हणतात की नशीब हे कर्तुत्ववान माणसालाच नेहमी साथ देते.आयुष्यभराचं जोडीदार हा चांगला मिळणे हा सुद्धा एक नशिबाचाच भाग असतो.त्याबाबतीत अण्णा खरंच नशीबवान आहे की दिव्या वहिनीसारखी साक्षात लक्ष्मी त्याच्या आयुष्यात आली.आता त्यांच्या आयुष्यात "अध्यन"चाही प्रवेश झाला आहे.अण्णाच्या मुळच्या भ्रमरवृत्तीमुळे,मनस्वी स्वभावामुळे त्याचे कसे होणार??? अशी त्याच्या आईला म्हणजे माझ्या सुहासिनी(मंदा)आत्याला नेहमी काळजी असायची.त्याच आमच्या अण्णाला आज एक उच्चपदस्थ अधिकारी ,उत्तम गृहस्थ, एक अतिशय चांगला पिता आणि प्रेमळ नवरा अश्या विविध भूमिकांमध्ये सहज वावरताना बघून आत्याला खूप आनंद झाला असता.
असा माझा अण्णा आज त्याच्या आयुष्यातले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.त्याबद्दल त्याला अनेक शुभेच्छा.......
Happy Birthday अण्णा!!!


Saturday, May 29, 2021

MISS YOU ABU

उद्या दि.३० मे 2021 रोजी आमच्या लाडक्या "अभिषेक भार्गव" ला ज्याला प्रेमाने आम्ही सगळे "अबु" म्हणायचो त्याला जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. फारच तरुण वयात तो आम्हा सगळ्यांना सोडून निघून गेला.विलेपार्ले विधानसभेमधला "भाजप" चा एक उत्साही कार्यकर्ता आणि सर्वांचा लाडका असलेला अभिषेक भार्गव माझा ही खूप जवळचा मित्र होता.आमच्यासारख्या स्थूल प्रवृत्ती व्यक्तींना चिडवण्यासाठी एक शब्द नेहमी वापरला जातो आणि तो म्हणजे "बटाटा"!!! पण बर्‍याच लोकांना हे माहिती नाहीये किंवा असेल ही की बटाटा हे एक बहुआयामी कंदमुळ आहे.बटाटा मटणात चालतो आणि उपवासालाही चालतो. प्रत्येक भाजीत बटाटा वापरला जाऊ शकतो.त्यातही आपले अस्तित्व कधीच सोडत नाही. मुंबईची ओळख असलेला "वडापाव"चा महत्त्वाचा घटक म्हणजे बटाटा.अगदीच काही खायला नसेल तर एक बटाटा उकडून त्याला तिखट-मीठ लावून खाल्लं तरी पोट भरू शकते.असा हा बहुआयामी बटाटा!!! आमचा अबूही तसाच अगदी बहुआयामी.कोणतेही काम असो अबू कधी कुठल्याच कामाला नाही बोलला नाही. तो एक यशस्वी उद्योजक होता, एक हाडाचा कार्यकर्ता होता.फार तरूण वयात तो प्रभाग क्रमांक ८५ चा अध्यक्ष झाला आणि तिथेही त्याने फार उल्लेखनीय कामगिरी केली.पार्ले महोत्सवाचा तर तो कित्येक वर्ष अविभाज्य अविभाज्य घटक होता. परागजींच्या अत्यंत विश्वासातल्या कार्यकर्ता वर्तुळापैकी तो एक सर्वात तरुण कार्यकर्ता होता आणि हे सगळे त्याने आपल्या मेहनतीने आणि आपल्या गोड स्वभावाने कमावले होते. खानदानी श्रीमंत असला नीगर्वी होता. सर्वांशी मिळून मिसळून वागायचा.सर्वांची थट्टा मस्करी तर करायचाच पण स्वतःवरची थट्टा मस्करी हसत मुखाने सहन करायचा.कधी कोणाशी भांडण झाले तरी ते भांडण पुढच्या क्षणी विसरून त्या माणसाची सलगीने वागायचा.म्हणूनच आज तो  आपल्यात नाही हे खरे वाटत नाही.आजही त्याच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणावतात. विशेषतः त्याला मानसपुत्र मानणाऱ्या श्रीकृष्ण आंबेकरांचे.आजच माझी त्यांची भेट झाली होती तेव्हा त्याच्या आठवणीने आंबेकरजी गहिवरून गेले.असा होता आमचा अबू. उद्या दि.३० मे 2021 रोजी अबूच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त विलेपार्ले विधानसभेच्या वतीने खासदार पूनम महाजन निर्मित "मोक्षरथ लोकार्पण सोहळा" सकाळी १० वाजता उत्कर्ष मंडळ,विले पार्ले(पू.) येथे आयोजित करण्यात आला आहे. FACEBOOKच्या माध्यमातून तो LIVE सगळ्यांना दिसू शकणार आहे.मला याची खात्री आहे की आमच्या लाडक्या अबूवर प्रेम करणारे व त्याला ओळखणारे अनेक जण उद्या FACEBOOKच्या माध्यमातून नक्कीच हा सोहळा बघतील आणि हीच आमच्या लाडक्या अबूला एक विनम्र आदरांजली असेल......
MISS YOU ABU.....

Sunday, April 4, 2021

एकमेकांचे व्हा कायमचे!!!

ह्या दोघांची छोट्या पडद्यावरची chemistry अफलातून होती.परवा एका पुरस्कार सोहळ्यासाठी दोघे एकत्र अवतरले.खरे तर त्यांची अतिशय गाजलेली मालिका केंव्हाच संपली होती.या सोहळ्यात तर त्यांना नामांकनही नव्हते.पण सर्व आलेल्या आमंत्रितांपेक्षा हे दोघेच जास्ती "छाये हूवे" थे.
social media वर तर ह्यांच्या ह्या नव्या look ची, त्यांच्या एकत्र असण्याची बेफाट चर्चा चालू होती कारण होते तिने आपल्या Instagram account वर share केलेला त्या दोघांचा एक video.या सोहळ्यादरम्यान झालेल्या मुलाखतीत दोघेही एकमेकांबद्दल,त्यांना या मालिकेनिमित्ताने आलेल्या अनुभवांबद्दल भरभरून बोलले.दोघांच्या मैत्रीबद्दल विचारले असता त्याने त्याच्या नेहमीच्या सरळ आणि रांगड़या स्वभावाला अनुसरून "ही मैत्री आयुष्यभर अशीच राहील" असे सांगून टाकले.तिनेही सावधपणे का होईना पण त्याला हसत हसत "मम" म्हटले.पण तिनेच आपल्या"Instagram"वरच्या एका चित्राला दिलेल्या caption चाच वापर करून म्हणायचे तर "मुस्कुराते चेहरे,राज गेहेरे".
ही मालिका आता काही दिवसांपूर्वी मी पुन्हा एकदा ZEE5 APPवर बघितली.सलग नाही; पण "राणा-अंजली"चे काही निवडक प्रसंग म्हणा, एखादा Track आवडला म्हणून बघितला असे झाले. "दैनंदिन मालिका म्हणजे सिताफळ खाण्यासारखे असते. किती ही सांभाळून खायचे म्हटले तरी बरबट ही होतेच"- इति महान नट ॠषिकेश जोशी.
ह्या मालिकेचीही बरबट तर झालीच पण ही मालिका खूपच लोकप्रियही झाली.हे दोघे तर एव्हढे आपल्या भूमिकांमध्ये विरघळून गेले होते;जणू काही ही भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली होती.पुढे पुढे तर हे दोघे अभिनय करतायत की खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत असे वाटावे इतकं या दोघांचे tunning जमलेले वाटत होते.दोघांची व्यक्तिमत्वेही त्या भूमिकेला पूरक होती.अगदी आदर्श जोडपे वाटावे अशी.त्यामुळेच की काय या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांची साथ द्यावी असेच या दोघांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना वाटले तर त्यात नवल ते काय?? आपण प्रेक्षक खूपच भाबडे असतो.नको नको म्हणत असताना पण एखाद्या मालिकेमध्ये, त्या व्यक्तिरेखांमध्ये गुंतत जातो मग हे असे होते.पण सगळेच प्रेक्षक काय भाबडे नसतात त्याना या व्यक्तिरेखांच्या अभिनयापलीकडचेही काही दिसत असतं.कारण दैनंदिन मालिकेमध्ये अशा अनेक जोड्या असतात. हजार हजार भाग करतात पण त्यांच्यामधले tunning, त्यांच्यामधली chemishtry पडद्यावर औषधालाही आढळून येत नाही. केवळ एखाद्याच्या बाबतीतच असे होते आणि त्यांच्याबाबतीत जेंव्हा प्रेक्षक असे म्हणू लागतात की या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही असेच एकत्र रहावे ही या जोडीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.
अर्थात हे दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल निर्णय घेणारे आपण कोण??? पण हे दोघे एकमेकांना शोभतात, पुरक वाटतात एवढे मात्र नक्की.
एक भाबडा प्रेक्षक म्हणून एवढे मात्र वाटते या दोघांनी त्यांच्या पडद्यामागील वैय्यक्तीक आयुष्यातही सदैव एकत्र राहावे....कायमचे...
#RanaDaAnjaliBaai
#HardeekAkshaya
#togetherforever
#BestCoupleInWorld

Friday, February 12, 2021

वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष म्हणून एक काल्पनिक संकल्पना आहे हा कल्पवृक्ष म्हणजे असा एक वृक्ष असतो की त्याच्या पुढे उभे राहून कोणी काही मागितले तर त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि हा कल्पवृक्ष नेहमी आपल्या प्रेमाची, वात्सल्याची सावली आपल्या आश्रयास आलेल्या लोकांवर धरत असतो. गावडे घराण्याचा असाच एक वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष आज कायमचा कोमेजला!!!
गावडे घराणातल्या वरिष्ठ फळीमधली आम्हा सर्वांची लाडकी जयश्री आजी ,आमच्या विजय मामाची आई, सर्वाची लाडकी काकीचे आज निधन झाले.वात्सल्याचे कुठलं रूप असे जर आपण मनामध्ये त्याचं चित्र काढलं तर ते बहुतेक आमच्या आजीच्या रूपातच असावं.आपल्या वात्सल्यपूर्ण  प्रेमाची छाया तिने संपूर्ण कुटुंबावर गेली साठ वर्षे धरली होती. एक आदर्श गृहिणी तर होतीच पण त्याबरोबर ती एक आदर्श शिक्षिका ही होती. आदर्श शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून एका प्रतिष्ठित शाळेतून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमही तिने खूप चांगल्या प्रकारे जगला असंच म्हणावे लागेल.सुगरण तर इतक्या वरच्या दर्जाची होती की तिने जेवताना वाढलेले पाणी ही चविष्ट लागायचे. तिच्या घरी गेल्यावर जेवणाचा आग्रह तो नेहमीचाच. तिच्या हातच्या जेवणाने पोट भरून जायचे पण मन भरायचे नाही. हस्ताक्षर तर एखाद्या छापील अक्षरापेक्षा सुंदर आणि रेखीव होते( तिच्या लाडक्या नातवामध्ये म्हणजेच देवाशिष मध्ये हा गुण अगदी अचूक उतरला आहे).
गावडे कुटुंबाच्या सुखात आणि दुःखात या कल्पवृक्षाची वात्सल्यपूर्ण सावली नेहमीच असायची. कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात तर तिची हजेरी हे विशेष आकर्षण असायचे.अतिशय साधी पण आकर्षक वेशभूषा करून एखाद्या गर्भश्रीमंत संस्थानच्या महाराणीसारखी दिसणारी; पहिल्या रांगेत बसून शांतपणे सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत बसलेली काकी आजी यापुढे दिसणार नाही याची चुटपुट यापुढे कायमची सगळ्यांना लागेल. अगदी आताआतापर्यंत तिला एवढा मोठे आजारपण आले असतानादेखील आपल्या नातवाच्या म्हणजे माझा चुलत मामेभाऊ विनितच्या लग्नात तिची हजेरी होती. या वात्सल्यमूर्तीने किती जणांना सांभाळले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले त्याची गणतीच नाही. त्यात सख्खे रक्ताचे तर होतेच पण सख्खे नसलेले जास्त होते. आजीने सर्वांना प्रेम, आपुलकी दिली. कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच तिचा प्रेमाचा गोतावळा एव्हढा मोठा आहे जो तिला या आयुष्यात तरी कधी विसरू शकत नाही. या दुष्ट आजारामुळे तीचे शेवटचे काही दिवस खूप कठीण गेले होते. गेले दोन दिवस तर ती अतिशय शांत झाली होती. समाधानी होती. कारण तिला कळलं होतं.असं कळणं आणि वास्तव स्वीकारणे फारच कमी लोकांना जमतं.जगाचा निरोपही तिने त्याच शांतपणे झोपेतच घेतला. कोणालाही त्रास न होऊ देता!!! आजी आज जरी तु आमच्यात नसलीस तरी तुझ्या आठवणींच्या रूपाने तू सदैव आमच्या मध्येच आहेस.....