Sunday, September 27, 2020

नाळ

 मातेच्या गर्भातला जीव नवमास भरले कि या वास्तवादी जगात प्रवेश करतो तेंव्हा त्याच्या मातेच्या गर्भाशयाशी ज्या नाळेने  जोडलेला असतो ती  नाळ कापून  डॉक्टर त्या बाळाला गर्भाशयापासून विलग करतात पण त्या नाळेचा काही भाग तुकडा मात्र तसाच बाळाशी चिकटलेला असतो.जो काही दिवसानी आपोआप गाळून पडतो .पण मला असे वाटते की माता केवळ स्वत:च्या नाळेशी जोडलेल्या आपल्या बाळाला केवळ आपले गुणधर्म देते असे नाही तर आपली स्वप्ने मनातल्या ईच्छा आकांक्षा पण देत असावी.म्हणूनच जेंव्हा ती नाळ कापून बाळ वेगळे होते तेंव्हा तो तिच्या ईच्छा आकांक्षारूपी नाळेचा तुकडा बाळाला चिकटून राहतो आणि मग त्या ईच्छा आकांक्षा बाळामध्ये झिरपल्या की मग ती नाळ आपोआप गाळून पडते. आमच्या मंदाआत्येला कोकणाचे भयंकर अप्रूप होते एव्हढे की सम्पूर्ण हयात मुंबईत घालवून देखील ती नेहमी मालवणीतूनच बोलायची. गावाकडच्या आठवणीत रमायची. तिची एक ईच्छा होती की कोकणात आपले एक ऐसपैस घर असावे आणि हेच तिचे स्वप्न उदयदादामध्ये झिरपले असावे .आत्येने तिचे स्वप्न तिने उदयदादा तीच्या गर्भात असताना पेरले असावे. कारण दादाने अक्षरशः ध्यास घेतला होता की माझ्या कोकणात माझे स्वत:चे असे एक घर असायला पाहिजे कारण त्यालाही आता कुठे जाणवत होतं की आपली नाळ या कोकणाच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे . मग त्याचा शोध सुरु झाला आणि मालवणातील कट्टा या गावाजवळ येऊन थांबला. दादाच्या स्वप्नातले घरकुल उभे राहिले . नावही त्याने खूप विचार करून ठेवलेय ,"अद्वैत " याचा अर्थ कोणाशीही द्वैत म्हणजे वैर नसलेला. हे घर हे नुसतं घर नाहीये त्यातून दादाचा रसिक स्वभाव ठायी ठायी जाणवेल . मला असं वाटतं ह्या घराची हीच खासियत आहे की या घरावर आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टींवर उदय दादाचा ठळक ठसा जाणवतो.त्याने नव्याने उभारलेली पुष्करिणीही त्याला अपवाद नाही. एखाद्या आईने ज्या मायेने,प्रेमाने आपल्या लेकीला सजववावे तद्वत दादाने आपला हा स्वप्नमहाल सजविला आहे.दादाने त्याच्या मनात या घराबद्दल चे वाटतं ते शब्दात मांडले खरे पण ते खूपच अपूर्ण आहे असे मला वाटते कारण या घराबद्दल त्याला जे वाटते ते शब्दांत मांडणे अवघड आहे.खरं म्हणजे घराचा विषय निघाला तर तो बोलायचा थांबतच नाही इतक्या घराबद्दल त्याला प्रेम आहे आणि खरच हे घर त्याच्यासाठी स्पेशल आहे कारण उदयदादासाठी हे केवळ घर नाही तर एक स्वकष्टाने पूर्ण केलेली स्वप्नपूर्ती आहे. त्याची नाळ त्या घराशी आणि कोकणच्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. 

No comments:

Post a Comment