नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विले पार्ले विधानसभेचे आमदार म्हणून ऍड . पराग अळवणी सलग दुसऱयांदा तब्बल ५८,९११ च्या मताधिक्याने निवडून आले. माझी भाजप कार्यकर्ता म्हणून तिसरी आणि स्वत: परागजी उमेदवार म्हणून असलेली ही पहिलीच निवडणूक . तशी माझी आणि परागजींची ओळख ५ वर्षेच जुनी . २०१४ सालातल्या डिसेंबर महिन्यातली ही गोष्ट असावी . तेंव्हा ते नुकतेच तेही पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले . ते राहात असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये आमची भेट झाली . त्यांचे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी मला मिळाली होती. वर्षभर मी त्यांचा कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहिले .नंतर मी माझे स्वतंत्र काम सुरु केले,तरी परागजींबरोबर असलेला ऋणानुबंध अद्यापही तसाच आहे. परागजींच्या सहवासात मी अनेक गोष्टी शिकलो .त्याचा मला स्वतः चे व्यक्तिमत्व घडविण्यात खूप मदत झाली.परागजींच्या कार्यालयात काम करत असताना अनेक मित्र मिळाले. खूप मोठ्या लोकांचा सहवास लाभला. भाजपचा प्रभाग क्र. ८१ मधला कार्यकर्ता म्हणूनही परागजी एक सक्षम नेता आहेत याची ही प्रचिती आली .त्यामुळे जेंव्हा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जेंव्हा निश्चित झाली तेंव्हा पुन्हा एकदा आपल्या नेत्याला जिंकून द्यायचेच या उद्देशाने विले पार्ले विधानसभेमधला परागजींचा प्रत्येक कार्यकर्ता भारून गेला होता. पण केवळ कार्यकर्ताच नव्हे तर विले पार्ले विधानसभेतील सामान्य नागरिकांवरही पराग अळवणी या माणसाचे गारुड आहे .परागजींनी आपल्या विधानसभेत केलेल्या कामांची यादीच सांगते की परागजींनीं आपल्या विधानसभेच्या उत्कर्षासाठी किती कष्ट घेतलेत ते. मग तो विमानपत्तन परिसरातील बाधित झोपड्पट्टीवासीयांबद्दल असो किंवा चकाला ,चरतसिंग वसाहत परिसरातील मलनिःस्सारण वाहिनीसंदर्भातील विषय असो असे अनेक विषय परागजींनी लावून धरले आणि त्यात यश मिळवले. त्यामुळे त्यांच्या विधानसभेतील लोकांचे आपल्या या सुसंस्कृत ,सुस्वभावी,विनयशील,हुशार आणि मेहनती नेत्यावर प्रचंड प्रेम आहे . त्यामुळे या वेळीही केवळ जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे हा निर्धार करूनच भाजप कार्यकर्ते कामाला लागले होते. परागजी उमेदवारी अर्ज भरायला निघाले तेंव्हा भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहून विरोधी उमेदवारांना नक्कीच धस्स झाले असेल. प्रचंड जनसमुदाय . परागजी तुम आज बढो हम तुम्हारे साथ हैं या नार्याने सारे पार्ले भरून गेले होते. अर्ज दाखल झाला आणि कार्यकर्त्यांची लगबग आपापल्या विभागात वाढू लागली. परागजी तर आपल्या विधानसभेत पायाला भिंगरी लागल्यागत फिरत होते .कार्यकर्त्यांबरोबर बैठकांच्या फेऱ्या होत होत्या . समाजमाध्यमे ,प्रचारपत्रकांच्या माध्यमातून प्रचार जोर पकडत होता .गेल्या खेपेला जिथे मतं कमी पडली त्या विभागात काम अधिक जोमाने सुरु होते,कमी मतं का पडली याविषयी त्या त्या विभागातले नेमलेले प्रभारी स्थानिक कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करीत होते .जिथे गरज पडली तिथे परागजी जातीने सभांना हजेरी लावत होते ,कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत होते . बहुतेक कार्यकर्ते परागजींचा प्रचाराचा धडाका बघून असेही म्हणू लागले "अरे परागजी जिंकणारच आहेत खात्री आहे आम्हाला तरी परागजी एव्हढी धावपळ का करतायत ??" .शाळेतला हुशार विदयार्थी हा केवळ चांगले मार्क मिळाले म्हणून समाधानी नसतो त्याला पैकीच्या पैकी मार्क हवे असतात कारण त्याला चांगल्या मार्कांच्या सुखापेक्षा गेलेल्या मार्कांचे वाईट वाटते .परागजींचेही तसेच चांगली मतं आपल्याला मिळणार हे त्यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला समजत नव्हते असे नाही ,पण विजयाला सोळा अणे बळकटी हवी.प्रत्येक बूथमधून भरघोस आघाडी मिळावी यासाठी परागजी आग्रही होते.त्यांचा हा ध्यासच कार्यकर्त्यांमध्ये जोश जागवीत होता म्हणूनच की काय निवडणुकांच्या काळात अनेक कार्यकर्ते कामावर रजा टाकून आपापल्या प्रभागात हिरीरीने प्रचार करत होते. माझ्या प्रभाग कर. ८१ बद्दल बोलायचे तर आमच्या प्रभारी शुभांगीताई भावे नुकत्याच एक आजारातून बऱ्या झालेल्या त्यांना विश्रांतीची नितांत आवश्यकता असतानासुद्धा सतत परागजींसाठी जीवाचे रान करत होत्या. निलेश सावंत,संतोष गोताड,लीना गोम्स ,बोनू,मनीषा पटेल,स्वाती मोरे,वयाची साठी उलटले डेविड काका,युसूफ मुल्ला ,संजय भेकरे,अनंत चव्हाण आदि मंडळी दिवस रात्र एक करत होती ,परागजींच्या सभा यशस्वी व्हाव्यात,त्यांचा प्रचार योग्य रीतीने व्हावा,प्रचार फेरीची मंजुरी ,त्या फेरीची आखणी,पत्रके वाटणे अशी भरमसाट कामे ही सर्व मंडळी जीवाचे रान करून पार पाडीत होती . 'LEADING FROM FRONT " या उक्तीला साजेश्या शुभांगी ताई स्वतः आपल्या तब्येतीची,बाकी सर्व चिंता,विवंचना बाजूला सारून परागजींचा भरघोस मतांनी विजय ह्या ध्यासाने भारून गेल्या होत्या. आपल्या प्रभागातून जास्तीतजास्त मते परागजींना मिळवून देणारच हे आव्हान ताईंनी स्वीकारले होते (आणि ते त्यांनी खरे करून दाखविले ,ज्या इस्लामपूरा विभागातून नेहमी काँग्रेसला मतदान होई त्या इस्लामपूरातील एकगठ्ठा मते परागजींना मिळाली ).अनंत अडचणी येत होत्या. कधी कधी स्थानिकांकडून विरोधाचा सूर येई पण त्या सर्व अडथळ्यांना यशस्वी रित्या पार करत भाजप कार्यकर्ते नेटाने आपले काम करत राहिले. (इथे मला खारचे माजी नगरसेवक आणि जिल्हा महामंत्री महेश पारकर यांचा खास उल्लेख करावा लागेल कारण शुभांगी ताईला पहाडासारखी साथ महेशजींनी दिली. ताईचा कामाचा ताण हलका केला) अनेकांना कौतुक वाटावे असे हे वातावरण बर्याच वरिष्ठ कार्यकर्त्यांना अगदी माझ्यासारख्या नगण्य कार्यकर्त्यालासुद्धा लोक भेटले की विचारायचे का एव्हढे का राबताय तुमच्या नेत्यासाठी,काय मिळणार आहे तुम्हाला?? याचे कारण आमचा सर्वांची काळजी करणारा आमचा नेता हे होय. मला या निवडणूकीदरम्यान आलेले दोन अनुभव पुरेसे बोलके आहेत.प्रचारफेरी होती आणि वेळ दुपारची,ऑक्टोबरचा तो सर्वात गर्मीवाला दिवस होता,वातावरणातला दमटपणा अजूनच थकावट आणत होता.यात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. परागजी प्रचाररथावर स्वार झाले फेरी सुरु होताच काही वेळाने मी रथाजवळच उभा असल्याने त्यांनी मला विचारले अमित हा फेरीचा मार्ग खूप लांबचा नाही ना ?? सकाळी एक प्रचारफेरी आटपून आलेले परागजी थकले असावेत असा माझा कयास पण त्यांचे पुढचे वाक्य त्यांच्यातल्या काळजी करणाऱ्या नेत्याचे दर्शन देणारे होते. माझ्या मनातला प्रश्न आपल्या चाणाक्ष नजरेने ओळखत परागजी म्हणाले अमित मला माझी पर्वा नाही मी उमेदवार आहे पण या वातावरणाचा त्रास माझ्या कार्यकर्त्यांना झालेला मला चालणार नाही. मी स्तब्ध झालो. रात्री उशिरापर्येंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत असेलेला आणि तरीही सकाळी एक प्रचार फेरी आटपून आलेला आणि पुन्हा एकदा प्रचार फेरीला सज्ज असलेला हा नेता आपल्या आधी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करतो. फेरीच्या आधी फेरीच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली आहे की नाही ते स्वतः जातीने बघणारा हा संवेदनशील नेता . खरंच कौतुकास्पद. दुसरा प्रसंग एक स्थानिक परागजींकडे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची तक्रार करत होता. पण परागजींनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्या माणसाची हजेरी घेतली आणि हे कार्यकर्ते मला निःस्वार्थी साथ देतात ह्यांच्याबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही अशी ताकीद दिली. अशा नेत्यासाठी कार्यकर्ते धडपडतात त्यात आश्चर्य ते काय!! या माणसाकडे प्रचंड ऊर्जा आहे. एव्हढा मोठा विले पार्ले विधानसभा प्रभाग परागजींनी अक्षरश: पिंजून काढला होता . अनेक बैठका ,निवडणुकीची इतर कामे,सततचा प्रवास पण परागजींच्या चेहर्यावर थकावटीचे एक ही लक्षण नसायचे त्यांचा हाच उत्साह ,कामाप्रती असेलेली निष्ठा कार्यकर्त्यांना बळ देत होती. अखेर तो २१ तारखेचा मतदानाचा दिवस उजाडला इतके दिवस ह्या दिवसासाठी केलेली तयारी,रात्रंदिवस घेतलेली मेहनत ,प्रचंड मेहनतीने जमवलेला लोकसम्पर्क यांचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी कार्यकर्ते आपापल्या बूथमध्ये सज्ज होते. मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रतिसाद कमी वाटत होता. कार्यकर्ते सावध झाले ,आपापल्या प्रभागातील इमारतींमध्ये,चाळीत राहणाऱ्या मतदाराला घरोघरी जाऊन आवाहन करू लागले. मतदानासाठी प्रवृत्त करू लागले . त्यांच्या प्रयत्नाला यश येऊ लागले. अनेक ठिकाणी मतदारांना ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि एक चांगल्या संख्येचे मतदान झाले. संध्याकाळी मतदान झाल्यावर भाजप कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती ती ही नाही की परागजी किती मताधिक्याने जिंकणार कारण एकतर्फी लढत सरळ दिसत होती. दि . २४ ऑक्टोबर वेळ दुपारी १ वाजता पारंगजींचे मताधिक्य ४०,०००चा आकडा पार करून गेले होते. विजय निश्चित होता आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी होती. जिल्हा कार्यालयात प्रोजेक्टर स्क्रीन वर महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल दाखवले जात होते कार्यकर्त्यांची खूप गर्दी होती. सर्वाना प्रतीक्षा होती परागजींची. विजय निश्चित झाल्याने मी समाधानाने घरी परतलो.थोडा आराम करावा म्हणून जरासा लवंडलो तर कधी डोळा लागला कळलेच नाही .बऱ्याच दिवसानी शांत झोप मिळाली. जागा झालो तर समाजमाध्यमांवर परागजींची हसरी छबी सर्वांचे आभार पुष्पगुछरूपात स्वीकारताना झळकली. मनात म्हटले आपणही जावे आणि त्यांना भेटून यावे.इतक्या दिवसांच्या धावपळीने श्रमलेले परागजी असतील का कार्यालयात ? मनात संशय डोकावला .तडक परागजींचे स्वीय सहाय्यक आणि माझे परममित्र दीपक कदम यांना फोन केला ."सर आजून कार्यालयात आहेत ,कधी ही निघतील ,लवकर ये " दीपक जी वदले .,धावत पळत जिल्हा कार्यालय गाठले .परागजी आपल्या कक्षात होते . पुष्पगुच्छांनी कार्यालय भरून गेले होते . सर्वानाच परागजींना भेटायचे होते त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते ,सकाळी ७ वाजता मतमोजणी कार्यालय गाठलेले आणि संध्याकाळी विजय यात्रा करून आलेले परागजी कोणालाही नाराज करत नव्हते .सर्वांबरोबर फोटो काढत होते सुहास्य वदनाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते . थकवटीचा हलकासा परिणाम दिसत नव्हता . माझा नंबर आल्यावर मी पुढे झालो. "अमित ये ये " अशी आपुलकीची हाक ऐकू आली मी हस्तांदोलन केले मलाही फोटो हवा होता,त्यांच्या बाजूला फोटोसाठी उभा राहिलो. घाईगडबडीत मी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणायला विसरलो हे लक्षात आले मी ओशाळवाणा झालो ..माझी अवस्था माझ्या नेत्याच्या लक्षात आला आणि आपल्या या कार्यकर्त्यांच्या फोटोचा विचका होऊ नये या साठी समोरच असलेला एक सुंदर पुष्पगुच्छ माझ्या हातात देत मिस्किलपणे म्हणाले "हं आता काढा रे फोटो, आमचा फोटो चांगला आला पाहिजे " . फोटो झाला मी पुन्हा एकदा हस्तांदोलन केले,आणि बाहेर जाण्यासाठी वळलो ,बाहेर खूप माणसे अभिनंदन करण्यासाठी ताटकळली होती .मला खात्री होती परागजी एकालाही नाराज करणार नव्हते .लोकांच्या गराड्यात सर्वांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत सुहास्यवदनाने उभा असलेला आमचा सेनापती मनात साठवत मी बाहेर पडलो. आता पुन्हा सज्ज व्हायचे होते पुन्हा एक नवी सुरुवात झाली होती . लोकसेवेचा वसा घातलेला आमचा सेनापती आता थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा लढाईला सज्ज होईल म्हणजे आम्हालाही त्याला साथ द्यायला सज्ज रहावेच लागेल....."परागजी आप आगे बढो हम हमेशा तुम्हारे साथ हैं ". परागजी सलग दुसऱयांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन
Saturday, October 26, 2019
Wednesday, April 11, 2018
शब्दांकित: गाऱ्हाणं........
शब्दांकित: गाऱ्हाणं........: हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा.....काही द...
Tuesday, April 10, 2018
गाऱ्हाणं........
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....व्हय म्हाराजा.....काही दिवसांपुर्वीची गोष्ट हा रे म्हाराजा..... झी मराठीवरली मालवणी भाषेची मालिकेतलो एक नट माका भेटलेलो.... मी त्याका विचारलंय का रे बाबा मालवणी भाषेवरची हि मालिका बंद कित्याक केलास..... त्यावर तो म्हणालो त्यो चॅनेल चो निर्णय आसा म्हणून..... मग त्यावर तो बोललो कि मालवणी माणसांबरोबर आणि मालवणी भाषेबरोबर नेहमी असाच होता... आणि माझ्या डोक्यात किडो वळवळलो.....खराच आसा ता ......अगदी कोकणात खयपण गावणाऱ्या आंबटगोड चवीच्या करवंदासारखी आपली मालवणी भाषा. पण तिचो आता ऱ्हास होवून लागलो हा.... सिनेमातून,मालिकातून,नाटकातून विनोदी पात्राच्या तोंडातून हि भाषा डोकावता...... पण दोस्तहो माझी मालवणी भाषा खरंच महान आसा कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्यासारखी कानाक गोड लागणारी,कोकणातल्या नद्यांसारखी तिरकस वळणांची आणि कितीही संकटांका पुरून उरलेल्या आणि कधीही आत्महत्येचो मार्ग न धरलेल्या कोकणी शेतकऱ्यासारखी कडक आसा माझी मालवणी भाषा. "वस्त्रहरण"वाले गंगाराम गवाणकर,मालवणी नटसम्राट मश्च्छिन्द्र कांबळी ,दिगंबर नाईक अशा अनेकांनी हाय भाषेचा महत्व टिकवून ठेवलेला आसा पण माका वाटता कोकणात तर हि भाषा बोलली जाताच पण शहरात रवणाऱ्या आपल्यासारख्या लोकांची पण हि जबाबदारी आसा की आपल्या भाषेचो मान आणि अभिमान आपणांकच टिकवूचो लागतालो दोन गुजराथी म्हणा किंवा मद्रासी,केरळी,पंजाबी माणसा समोरासमोर असली कि हटकून आपल्या भाषेत बोलतत पण मालवणी माणसा नाय बोलत... ती बोलूक व्हयी.. आपल्या ह्या भाषेचो गोडवो आपणच सर्वांका दाखवून देवूचो लागतलो.... आपल्या पुढच्या पिढीक ह्यो भाषेचो वारसो देऊची जवाबदारी आपलीच आसा नायतर आपली पुढची पिढी ही भाषा बोलुनी नाय आणि मालवणी भाषा नामशेष होवूक वेळ लागायचो नाय. आधीच कोकणात गुजराती ,मारवाड्यान आणि इतर अनेक परप्रांतियान हातपाय पसरलेले आसत आपली भाषाही सहज बोलतत,पण आपापसात बोलताना आप्ल्याच भाषेत बोलतत;मग आपण कीत्या मागे रवायचा???कोकणावर,त्याच्या भाषेवर आपला मनापासून प्रेम आसात तर ह्यो अक्षयतृतीयेचो मुहूर्त चांगलो आसा रे म्हाराजा..... या मुहूर्तावर मी तुका गाऱ्हाणा घालतंय कि आपल्या शहराकडल्या मालवणी माणसांका मालवणीतून बोलण्याची बुद्धी लाभू दे रे म्हाराजा.... मी तुका सांगताय रे म्हाराजा कि मी माझ्या आवशीबापाशीवांगडा ,माझ्या नातलगांवांगडा ,माझ्या बायले वांगडा मालवणीतूनच बोलतलय.आणि माझी तुमका सर्वांक विनंती आसा शक्य असतात तेंव्हा मालवणीतून बोलत रवा;चुकलात तरी चालात...चला आज संकल्प करूयात.आपण मालवणीतूनच बोलतलव कोणाची फिकीर न करता .... बोला व्हय म्हाराजा.
Monday, August 14, 2017
रुबाब
विख्यात दिग्दर्शक ब्रायन डी पाल्मा यांच्या प्रचंड गाजलेल्या "THE UNTOUCHABLES" या माफियापटात सुरुवातीचा प्रसंग .... अमेरिकेतल्या शिकागो शहरातला प्रमुख माफिया अल कपोन (महान अभिनेता रॉबर्ट डी निरो एका उत्कृष्ठ भूमिकेत ) हा एका आरामखुर्चीवर ऐसपैस पसरला आहे.एक सुंदर ललना त्याच्या नखांची निगा राखते आहे एक तरबेज न्हावी कपोनच्या दाढीची तयारी करत आहे आणि अनेक पत्रकार आदबीने कपोनच्या बाजूला उभे आहेत ,कपोनचे अंगरक्षक चारीबाजूला उभे राहून आपल्या नेत्याला रक्षण देतायत.या एका प्रसंगाने कपोनची दहशत त्याचे वर्चस्व आणि त्याचा रुबाब आपल्यापर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. असे म्हणतात महान वेस्ट इंडियन फलंदाज सर विवियन रिचर्ड्स जेंव्हा खेळपट्टीपर्यंत पॅव्हेलियनकडून चालत यायचा तेंव्हा त्याच्या त्या रुबाबदार चालीनेच गोलंदाजांची गाळण उडायची. रुबाब हा एक अंगभूत गुण आहे त्याचे उसने अवसान आणता येत नाही हेच खरे. असाच एका वाघाचा रुबाब मला अनेक वर्षांपूर्वी पाहिलेला अगदी स्वछ आठवतोय.
माझा मामेभाऊ देवाशिष याच्या लहानपणाची ही एक गोष्ट आहे. देबूने राणीचा बाग कधीच पाहिला नव्हता आणि त्याची ही ईच्छा त्याच्या बाबाने म्हणजे माझ्या बंड्यामामाने पूर्ण करायच ठरवले आणि मलाही या सहलीत सामील करून घेतले. मामा म्हणजे अगदी "ROYAL" कारभार. रीतसर अंधेरी ते भायखळा टॅक्सी ने आम्ही राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. मी ,लतामामी,मामा आणि देबू . त्याकाळी राणीच्या बागेचे प्रवेशतिकीट केवळ २रुपये होते . मामा तिकीट काढायला गेला आणि मी आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो . राणीच्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळ एक चांगले छोटे उद्यान आहे त्या उद्यानाच्या हिरवळीवर अनेक कुटुंबे बसली होती. आणि मुक्त हस्ताने खाण्याचे आणि बसल्याठिकाणी कचरा टाकण्याचे काम इमाने इतबारे करत होती. सकाळचे दहा साडेदहाच वाजले होते पण मे महिना असल्याने सकाळीच कमालीचे उकडत होते. राणीबागेचे ते प्रथम दर्शन अजिबात सुखावह नव्हते. तिकीट मिळाले आणि आम्ही बागेत प्रवेश केला आणि तेथील पिंजर्यात बंद असलेले प्राणी पाहू लागलो. माकडे आपल्या माकडचेष्टांमध्ये रमलेली आढळली . लांडगे पिंजऱ्यात इकडून तिकडे चकरा मारत होते. कोल्हा तर पिंजऱ्यात एका झुडूपात दडून बसला होता. जी गत लांडग्याची तीच बिबट्याची तोही पिंजऱ्यात चकरा मारत होता मध्येच गुरगुरत होता . जंगलाच्या राजाने तर मान वर करून त्याला बघायला आलेल्यांकडे लक्ष द्यायची तसदीदेखील घेतली नाही,महाराज अगदी गाढ झोपले होते .पाणघोडा तर पाण्याच्या बाहेरच आला नाही .हत्ती आपल्याच खेळात दंग .हरणे झाडीत गायब झाली होती. एकशिंगी गेंडा आपल्या अजस्त्र घळईरूपी पिंजऱ्यात एका कोनाड्यात भिंतीकडे तोंड करून उभा होता . सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विभागात तर का आलो हा प्रश्न पडला होता. वेगवेगळ्या प्रकारचे साप,अजगर जिवंत तरी आहेत का असा प्रश्न पडावा एव्हडे निष्काम पडले होते एकूणच राणी बागे ने मला निराश केले . देबूही कंटाळला होता. आता एक वाघ बघूया आणि निघूया हा सार्वमताने आम्ही निर्णय घेतला आणि त्यादिशेने निघालो. राणी बागेतला वाघाचा पिंजरा हा चांगलाच मोठा आणि अंडाकृती होता. आम्ही पिंजऱ्याच्या डाव्याबाजूला होतो. पिंजऱ्यात बऱ्यापैकी झाडे होती. आमच्यासारखी अनेक कुटुंबे व्याघ्रदर्शनासाठी उभी होती. पण पिंजऱ्यातील वाघ काही दिसेना आपल्या बाकी सहकार्यांसारखाच तोही कंटाळलेला असावा असा मी मनाशी विचार करत असताना त्या अंडाकृती पिंजऱ्यातल्या शेवटाशी असलेल्या घळईत एक लांबलचक पट्टेदार शेपटी वळवळताना दिसली आणि सगळ्यांच्या नजरा तिथे वळल्या. एक गुरगुरणे ऐकू आले. आणि एका ढाण्या वाघाने घळईच्या बाहेर उडी मारली . त्या झोकदार प्रवेशाने एकदम धन्य झाल्यासारखे वाटले. किती सुंदर जनावर होते ते! निदान ७-८ फूट लांब,वजनदार भारदस्त शरीर,लालसर सोनेरी त्वचा आणि त्या लालसर सोनेरी त्वचेवर शोभून दिसणारे काळे पट्टे,मजबूत पाय,मोठ्ठा चेहरा त्या चेहऱ्याला शोभणाऱ्या चंदेरी मिश्या,पिवळसर डोळे ,भेदक नजर,मोठ्ठाले सुळे ,सारखी आतबाहेर होणारी गुलाबी जीभ आणि लांब शेपटी. त्या लांब शेपटीमुळे मी मनातल्या मनात त्याचे नाव "बृहंगुलाचार्य" म्हणजे लांब शेपटीवाला असे करून टाकले. ह्या बृहंगुलाचार्याने पिंजऱ्याच्या चोहोबाजूला नजर टाकली आणि पिंजऱ्याच्या टोकाच्या दिशेने प्रस्थान केले. त्याला समोरून येताना बघावे म्हणून मी, मामी, देबूला कडेवर घेतलेला मामा सगळे आम्ही धावत पिंजऱ्याच्या टोकाशी पोहोचलो आणि धावपळीचे चीज झाले. समोरून वाघ चालत येत होता . ती त्याची चाल,त्याचा रुबाब माझ्या मनावर कायमचा कोरला गेला .अत्यंत सावकाशीने,धीमी पावले टाकत,कधी डावीकडे कधी उजवीकडे त्याच्या एका दर्शनासाठी पिंजऱ्याबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या चाहत्यांकडे कटाक्ष टाकत वाघ चालत येत होता.जणू आपल्या दरबारात सिहांसनाच्या दिशेने निघालेला अनभिषिक्त सम्राटच. एव्हाना मलूल झालेला देबू त्या वाघाला बघून आनंदाने टाळ्या वाजवू लागला,हसू लागला. पिंजऱ्याबाहेरचे अनेक जण कौतुकाने त्या वाघाचे पुरुषी सौंदर्य न्याहाळत होते पण त्याला त्याची काही पर्वा नव्हती तो आपल्याच मस्तीत होता. पिंजऱ्याच्या टोकाला येऊन एका सावलीत तो विसावला .असा टेचात बसला होता कि बस.अनेक कॅमेरे निघाले क्लीक क्लीक झाले जणू एका नायकाचे छायाचित्रणाचे सत्र चालू होते. खरे तर तो पिंजरा त्या वाघाचे छोटेसे विश्व पण त्या विश्वातही तो आपला आब,आपला रुबाब राखून होता. त्या एव्हढ्याश्या पिंजऱ्यात टेचात फिरत होता आपल्या मस्तीत जगत होता .आपले विश्व कसेही असो आपण त्या विश्वात आपला आब राखून जगले पाहिजे कसलीही पर्वा न करता ...
माझा मामेभाऊ देवाशिष याच्या लहानपणाची ही एक गोष्ट आहे. देबूने राणीचा बाग कधीच पाहिला नव्हता आणि त्याची ही ईच्छा त्याच्या बाबाने म्हणजे माझ्या बंड्यामामाने पूर्ण करायच ठरवले आणि मलाही या सहलीत सामील करून घेतले. मामा म्हणजे अगदी "ROYAL" कारभार. रीतसर अंधेरी ते भायखळा टॅक्सी ने आम्ही राणीच्या बागेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. मी ,लतामामी,मामा आणि देबू . त्याकाळी राणीच्या बागेचे प्रवेशतिकीट केवळ २रुपये होते . मामा तिकीट काढायला गेला आणि मी आजूबाजूचा परिसर न्याहाळू लागलो . राणीच्या बागेच्या प्रवेशद्वाराजवळ एक चांगले छोटे उद्यान आहे त्या उद्यानाच्या हिरवळीवर अनेक कुटुंबे बसली होती. आणि मुक्त हस्ताने खाण्याचे आणि बसल्याठिकाणी कचरा टाकण्याचे काम इमाने इतबारे करत होती. सकाळचे दहा साडेदहाच वाजले होते पण मे महिना असल्याने सकाळीच कमालीचे उकडत होते. राणीबागेचे ते प्रथम दर्शन अजिबात सुखावह नव्हते. तिकीट मिळाले आणि आम्ही बागेत प्रवेश केला आणि तेथील पिंजर्यात बंद असलेले प्राणी पाहू लागलो. माकडे आपल्या माकडचेष्टांमध्ये रमलेली आढळली . लांडगे पिंजऱ्यात इकडून तिकडे चकरा मारत होते. कोल्हा तर पिंजऱ्यात एका झुडूपात दडून बसला होता. जी गत लांडग्याची तीच बिबट्याची तोही पिंजऱ्यात चकरा मारत होता मध्येच गुरगुरत होता . जंगलाच्या राजाने तर मान वर करून त्याला बघायला आलेल्यांकडे लक्ष द्यायची तसदीदेखील घेतली नाही,महाराज अगदी गाढ झोपले होते .पाणघोडा तर पाण्याच्या बाहेरच आला नाही .हत्ती आपल्याच खेळात दंग .हरणे झाडीत गायब झाली होती. एकशिंगी गेंडा आपल्या अजस्त्र घळईरूपी पिंजऱ्यात एका कोनाड्यात भिंतीकडे तोंड करून उभा होता . सरपटणाऱ्या प्राण्यांच्या विभागात तर का आलो हा प्रश्न पडला होता. वेगवेगळ्या प्रकारचे साप,अजगर जिवंत तरी आहेत का असा प्रश्न पडावा एव्हडे निष्काम पडले होते एकूणच राणी बागे ने मला निराश केले . देबूही कंटाळला होता. आता एक वाघ बघूया आणि निघूया हा सार्वमताने आम्ही निर्णय घेतला आणि त्यादिशेने निघालो. राणी बागेतला वाघाचा पिंजरा हा चांगलाच मोठा आणि अंडाकृती होता. आम्ही पिंजऱ्याच्या डाव्याबाजूला होतो. पिंजऱ्यात बऱ्यापैकी झाडे होती. आमच्यासारखी अनेक कुटुंबे व्याघ्रदर्शनासाठी उभी होती. पण पिंजऱ्यातील वाघ काही दिसेना आपल्या बाकी सहकार्यांसारखाच तोही कंटाळलेला असावा असा मी मनाशी विचार करत असताना त्या अंडाकृती पिंजऱ्यातल्या शेवटाशी असलेल्या घळईत एक लांबलचक पट्टेदार शेपटी वळवळताना दिसली आणि सगळ्यांच्या नजरा तिथे वळल्या. एक गुरगुरणे ऐकू आले. आणि एका ढाण्या वाघाने घळईच्या बाहेर उडी मारली . त्या झोकदार प्रवेशाने एकदम धन्य झाल्यासारखे वाटले. किती सुंदर जनावर होते ते! निदान ७-८ फूट लांब,वजनदार भारदस्त शरीर,लालसर सोनेरी त्वचा आणि त्या लालसर सोनेरी त्वचेवर शोभून दिसणारे काळे पट्टे,मजबूत पाय,मोठ्ठा चेहरा त्या चेहऱ्याला शोभणाऱ्या चंदेरी मिश्या,पिवळसर डोळे ,भेदक नजर,मोठ्ठाले सुळे ,सारखी आतबाहेर होणारी गुलाबी जीभ आणि लांब शेपटी. त्या लांब शेपटीमुळे मी मनातल्या मनात त्याचे नाव "बृहंगुलाचार्य" म्हणजे लांब शेपटीवाला असे करून टाकले. ह्या बृहंगुलाचार्याने पिंजऱ्याच्या चोहोबाजूला नजर टाकली आणि पिंजऱ्याच्या टोकाच्या दिशेने प्रस्थान केले. त्याला समोरून येताना बघावे म्हणून मी, मामी, देबूला कडेवर घेतलेला मामा सगळे आम्ही धावत पिंजऱ्याच्या टोकाशी पोहोचलो आणि धावपळीचे चीज झाले. समोरून वाघ चालत येत होता . ती त्याची चाल,त्याचा रुबाब माझ्या मनावर कायमचा कोरला गेला .अत्यंत सावकाशीने,धीमी पावले टाकत,कधी डावीकडे कधी उजवीकडे त्याच्या एका दर्शनासाठी पिंजऱ्याबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या चाहत्यांकडे कटाक्ष टाकत वाघ चालत येत होता.जणू आपल्या दरबारात सिहांसनाच्या दिशेने निघालेला अनभिषिक्त सम्राटच. एव्हाना मलूल झालेला देबू त्या वाघाला बघून आनंदाने टाळ्या वाजवू लागला,हसू लागला. पिंजऱ्याबाहेरचे अनेक जण कौतुकाने त्या वाघाचे पुरुषी सौंदर्य न्याहाळत होते पण त्याला त्याची काही पर्वा नव्हती तो आपल्याच मस्तीत होता. पिंजऱ्याच्या टोकाला येऊन एका सावलीत तो विसावला .असा टेचात बसला होता कि बस.अनेक कॅमेरे निघाले क्लीक क्लीक झाले जणू एका नायकाचे छायाचित्रणाचे सत्र चालू होते. खरे तर तो पिंजरा त्या वाघाचे छोटेसे विश्व पण त्या विश्वातही तो आपला आब,आपला रुबाब राखून होता. त्या एव्हढ्याश्या पिंजऱ्यात टेचात फिरत होता आपल्या मस्तीत जगत होता .आपले विश्व कसेही असो आपण त्या विश्वात आपला आब राखून जगले पाहिजे कसलीही पर्वा न करता ...
निवृत्ती
निवृत्ती .....एकदम चितपरिचित शब्द.....पण प्रत्येकाची निवृत्तीची संकल्पना वेगळी असू शकते. एकाच कार्यालयात अक्खी कारकीर्द घडविल्यानंतर निवृत्त होताना देखील एखाद्या निवृत्तीधारकाला लहान मुलासारखे रडताना पाहिले आहे. माझ्या परिचित एका मित्राने मला सांगितले कि त्याने असे भविष्ययोजना करून ठेवली आहे कि वयाच्या चाळीशीत त्याला निवृत्त व्हायचे आहे आणि पुढे आपल्या छंदासाठी वेळ द्यायचा आहे....माझ्या मामीला अकाली निवृत्ती घेतल्यानंतर काय करायचे हा प्रश्न पडला होता.एक साहेब निवृत्त होत असताना त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली होती.. गेला एकदाचा.... एक महान क्रिकेटर वयामुळे हालचाली मंदावल्यानंतरदेखील केवळ अट्टाहास म्हणून खेळत राहिला...अखेर त्याला सक्तीने निवृत्त हो...असे संकेत देण्यात आल्याचा इतिहास ताजा आहे. आपल्या वयाची नव्वदी गाठून देखील पदाचा मोह न सोडणाऱ्या राजकारण्यांबद्दल तर न बोललेलेच बरे . एका महान क्रिकेटरला तो अनेक विक्रम करत असताना,चांगला भरात असताना ,त्याने अचानक निवृत्ती का पत्करली असे विचारले तेंव्हा त्याने फार छान उत्तर दिले. तो म्हणाला, "तुम्ही कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना जेंव्हा तूम्ही बाजूला होता,तेंव्हा तुमची निवृत्ती अनेकांना चटका लावून जाते... सतत रुख रुख लावून जाते ... का केले त्याने असे? असा विचार करायला लावते आणि तीच खरी निवृत्तीची गम्मत आहे...थांबण्याची हीच वेळ"
नमनाला एव्हढे घडाभर तेल ओतण्याचे कारण मागच्या आठवड्यातली अशीच एक चटका लावणारी निवृत्तीची घोषणा... तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ब्रिटिश कलाकार डॅनिएल डे लुईस याने वयाच्या साठाव्या वर्षी अभिनयाच्या प्रांतातून पत्करलेली निवृत्ती.तीन वेळा सर्वोत्कृष्ठ अभिनेता विभागात ऑस्कर पुरस्कार मिळवणारा ऑस्करच्या इतिहासातला तो एकमेव अभिनेता आहे . गेली ४ दशके अभिनय क्षेत्र गाजवणारा,या क्षेत्रात येणाऱ्या अपरिहार्य मोहांना बळी ना पडलेला आणि आपले खाजगी आयुष्य कमालीचे जपणारा एक महान अभिनेता. त्याच्या कारकिर्दीकडे जर नजर टाकली तर खरेच अचंबित व्हायला होते. १९७० साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या या अभिनेत्याने आपल्या ४ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत केवळ २० चित्रपटांतून काम केलेय आणि यादरम्यान त्याला ४ वेळा ऑस्कर नामांकने (त्यात ३ वेळा पुरस्कार प्राप्त), ५ वेळा गोल्डन ग्लोब नामांकने(२वेळा विजेता ),४ वेळा बाफटा नामांकने(२ वेळा विजेता) अशी भरीव कामगिरी.हा अभिनेता नाट्यक्षेत्रातही "दादा" होता,ते क्षेत्रही त्याने चांगलेच गाजवले आहे . चित्रपटांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याने साकारलेल्या माय लेफ्ट फूट मधील अपंग ख्रिस्टी ब्राउन,द लास्ट ऑफ द मोहिकंस मधील लढवय्या "हॉक आय " नाथनेल पो,महान दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेझी यांच्या "गँग्स ऑफ न्यूयॉर्क"मधला एका अनाथ मुलीवर(कॅमरॉन डीआझ ) मनापासून पोटच्या मुलीसारखे प्रेम करणारा पण तिचे ज्याच्यावर प्रेम आहे त्या विरुद्ध गॅंगच्या नेत्याच्या (लिओनार्दो डी कॅप्रिओ ) जीवावर उठलेला क्रूरकर्मा एकाक्ष बिल "द बुचर ",प्रयोगशील दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन याच्या "देअर विल बी ब्लड" मधला कमालीचा व्यवहारी पण तितकाच हळवा पिता असलेला तेलखाणीचा मालक डॅनियल प्लान्व्हिऊ आणि ज्या भूमिकेसाठी त्याला ३ऱ्यांदा ऑस्कर मिळाले तो ख्यातनाम दिग्दर्शक स्टिव्हन स्पीलबर्ग यांच्या अमेरिकेचे महान माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा त्याच नावाचा जीवनपट "लिंकन "मधील अब्राहम लिंकन या त्याच्या भूमिका चित्रपट रसिकांच्या मनात कायम कोरल्या गेल्यात.आपण साकारत असलेल्या भूमिकेत परकायाप्रवेश केल्याप्रमाणे शिरणे ही या अभिनेत्याची खासियतच म्हणावी लागेल आणि तसे त्याच्या भूमिकेचे आणि त्याचे अद्वैत चित्रपटरसिकांनी नेहमीच अनुभवले आहे. "माय लेफ्ट फूट "मधील अपंग साकारताना तो इतका तन्मय झाला होता की त्याला त्या मनोभूमिकेतून बाहेर काढायला एक मनोचिकित्सक चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी नेहमी हजर असायचा. लिंकन चित्रपटासाठी भूमिकेच्या तयारीसाठी त्याने लिंकनवरची १००च्यावर पुस्तके वाचून काढली,लिंकनसारखे दिसावे म्हणून रंगभूषाकारांसोबत अनेक वेळा चर्चा केली,लिंकन जोवर आत्मसात करत नाही तोवर चित्रीकरणासाठी येणार नाही असे सांगितले आणि त्यावर ठाम राहिला. ज्याची पोचपावती त्याला ऑस्करच्या रूपाने मिळाली . त्यावर्षी डेन्झेल वॉशिंग्टन ,ब्रॅडली कूपर ,ह्यू जॅकमन ,जॉकीन फिनिक्स अशी तगडी स्पर्धा असताना देखील डॅनियल ने बाजी मारली. त्याला ऑस्कर देण्यासाठी मंचावर आलेली महान अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिने तिला दिलेले विजेत्याचे नाव लिहिलेले पाकीट उघडण्याचीदेखील तसदी घेतली नाही इतकी तिला खात्री होती कि विजेता डॅनिएलच असणार . ज्यांनी लिंकन बघितलाय त्यांना भूमिकेशी तादात्म्य पावणे काय असते ते डॅनिएलच्या अभिनयातून नक्कीच अनुभवले असणार.त्याचा शेवटचा चित्रपट १९७० सालातल्या ब्रिटनमधील फॅशन इंडस्ट्रीवर बेतलेला "फँटम थ्रेड" हा आहे आणि तो पुढच्यावर्षी ऑस्कर स्पर्धेत असेल हे नक्की,असा हा महान अभिनेता. नुकतीच त्याला "सर "हि पदवी बहाल करण्यात आलेली आहे.
Sunday, July 16, 2017
"प्रतिमा अन्वयार्थ "
छायाचित्रण हा माझा एक आवडता छंद...जेंव्हा जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा मी माझा Nikon D3000 कॅमेरा हाताळत असतो.मला चांगली छायाचित्रे पाहणेही आवडते.सगळीच लक्षात राहतात असे नाही पण काही प्रतिमा निश्चितच विसरल्या जात नाहीत त्या सर्वोत्तम आहेत?? माहीत नाही.... पण त्या मला आवडल्या एव्हढे मात्र निश्चित... त्या का आवडल्या त्यांचा अन्वयार्थ सांगण्याचा हा उद्देश....सुरुवात गौतम राजाध्यक्ष यांनी घेतलेल्या सचिन तेंडुलकरच्या छायाचित्राने करतो.. गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पांढऱ्या कपड्यातली सचिनची धवल प्रतिमा आपल्या समोर येते. एक अप्रतिम "COMPOSITION " असलेला फोटो. ज्या बॅटच्या सहाय्याने सचिनने आपली कारकीर्द घडवली तिचा आधार घेतलेला पण चेंडूवर नजर रोखून ठेवलेला सचिन इथे आपल्याला दिसतो.एका महान फलंदाजाचे संपूर्ण व्यक्तिमत्व अधोरेखित करणारे हे छायाचित्र. तसेच एक छायाचित्र स्टेफी ग्राफचे मी बघितले होते. ९०च्या दशकातली ही जर्मनीची अतिशय देखणी टेनिस सम्राज्ञी. टेनिस कोर्टवर बेसलाईनवर उजव्या हातात टेनिसचे रॅकेट घट्ट धरलेली,दोन्ही पाय जमिनीवर घट्ट रोवलेली,कमरेत थोडीशी पुढे झुकून प्रतिस्पर्ध्याच्या सर्विसवर नजर असलेली "READY FOR ACTION" स्टेफी अत्यंत आकर्षक वाटते. काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले एक उत्कृष्ठ छायाचित्रकार दिवंगत जगदीश माळी या मराठमोळ्या छायाचित्रकाराने ९०च्या दशकात काढलेले अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन या तत्कालीन चित्रपट महानायकांचे एक छायाचित्र असेच माझ्या कायम स्मरणात राहिले ;एका पंचतारांकित हॉटेलच्या श्रीमंती प्रवेशद्वाराच्या समोर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या "Rolls Royce"च्या बॉनेटवर पांढऱ्या सुटाबुटात बसलेले हे दोन सुपरस्टार्स."Rolls Royce" ही गाडी म्हणजे श्रीमंतीचे,खानदानीपणाचे एक आदर्श उदाहरण,आजच्या काळातही हि गाडी सर्वोत्तम मानली जाते. अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांचे यशाच्या शिखरावर असणे अधोरेखित करण्यासाठी या गाडीचा एक प्रतिमा म्हणून केलेला वापर निव्वळ अप्रतिम. राज कपूर-नर्गिस या जोडीची अनेक छायाचित्रे असतील पण लंडनच्या एक दुकानासमोर उभे असलेले राज नर्गिस यांचे एक वेगळे पण आकर्षक असे छायाचित्र. नखशिखांत पाश्चिमात्य पेहरावातला बोटांत सिगारेट धरलेला देखणा राज आणि साडी नेसलेली पण ओव्हरकोट घातलेली नर्गिस..एक अंगावर पडलेले पाणी पाडूनदेखील ओले न होणारे कमलपर्ण तर दुसरा त्या पानावर पडलेला थेंब..."ना एक हुवे ना अलग हो सके " ... एक अविस्मरणीय प्रेमाची शोकांतिका . राज नर्गिस जोडीचे अद्वैत दाखवणारा एक आरसा म्हणजे हे छायाचित्र.विक्रम शेठ हे जागतिक साहित्यातले एक मोठे नाव... त्यांच्या लिखाणाचा मोठा चाहता असलेला आजच्या घडीचा सर्वोत्तम अभिनेता आमिर खान याचे विक्रमजींची स्वाक्षरी घेतानाचे छायाचित्र म्हणजे स्वत: एक मोठे नाव असून देखील दुसर्याचे मोठेपण मान्य करण्याची प्रगल्भता दाखविणारे प्रतीक. शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे हा एक लोकविलक्षण नेता... अत्यंत रसिक,करारी व्यक्तिमत्व...उंची मद्य ,सिगार यांचा षौक असणारे आणि ते कधी लपवून न ठेवणारे मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे बाळासाहेब... विख्यात छायाचित्रकार रघु राय यांनी कृष्णधवल शैलीत काढलेला बाळासाहेबांचा फोटो खासच आहे. आपली आवडती सिगार हातात घेऊन ऐटीत बसलेले बाळासाहेब. त्यांच्या मागे बाळासाहेबांचे आदर्श महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांचे चित्र तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे चिन्ह असलेला ढाण्या वाघ.. समाजकारण आणि राजकारण यांची योग्य तोल बाळासाहेबांनी साधला होता हे अधोरेखित करणारे हे छायाचित्र. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे राजकारणात पूर्ण बुडालेले असले तरी छायाचित्रण हा त्यांचा श्वास आहे. महाराष्ट्रातल्या अनेक गड किल्ल्यांचे हवाई छायचित्रण उद्धवजींनी केले आहे त्यांचे ते छायाचित्रण करून परत असताना हेलिपॅडवर काढलेला त्यांचा फोटो असाच माझ्या नेहमी स्मरणात राहील. निळ्या हेलिकॉप्टरच्या समोर दोन्ही हातात एकेक कॅमेरा घेऊन उभे असलेले सुहास्यवदन उद्धवजी.. या छायाचित्राचे विशेष म्हणजे उद्धवजींचे हास्य... इतके निरामय आणि खरे हास्य शिवसेना निवडणुकीत जिंकल्यावर देखील त्यांच्या चेहऱ्यावर आले नसेल.. राज ठाकरे आपल्या काकासाहेबांसारखेच करारी आणि हाडाचे व्यंगचित्रकार ... बाळासाहेबांकडून त्यांना तो वारसा मिळाला पण केवळ त्यावर समाधानी न राहता राजसाहेबांनी स्वतः ची शैली निर्माण केली,असेच चित्र काढण्याच्या तयारीत असलेल्या राजसाहेबांचे छायाचित्र मी पाहिले होते.... अत्यंत बोलके चित्र .. आपल्या खोलीत जमिनीवर मांडी घालून बसलेले राजसाहेब समोर एक लोड ठेवलेला त्या लोडावर लाकडी ड्रॉईंग बोर्ड ठेवला आहे. त्या बोर्डाला एक कोरा कागद नीट अडकवलेला आहे. राजजींच्या बाजुलाच एक उघडलेले सोनेरी रंगाचे "Benson and Hedges" या उंची सिगारेटचे पाकीट ठेवलेले,त्याच्या बाजूला चित्र काढण्यासाठी वापरले जाणाऱ्या काळ्या रंगाची काचकुपी झाकण उघडून ठेवलेली, राजजींच्या एका हाताच्या बोटांत कुंचला,तर दुसरा हाताच्या बोटांत एक अर्धी संपलेली सिगारेट आणि तो हात अर्धा मुडपून सिगारेटला ओठांशी लावायला निघालेला..समोर असलेल्या कागदावर आपली नजर खिळवलेले आणि काय चित्र काढावे या विचारात गढलेले राजसाहेब... आपल्या भाषणातून आपली भूमिका आक्रमकपणे मांडणारे अतिशय भेदक डोळ्यांचे आणि आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आदरयुक्त वचक असलेले,आणि कोणत्याही नेत्याची अचूक नक्कल करू शकणारे राज या चित्रात अतिशय मोहक आणि सोज्वळ वाटतात.एखाद्या नेत्याचे मला सर्वात आवडलेले छायाचित्र . छायाचित्रण हा अचूक वेळ साधण्याची कला आहे ज्याने हि वेळ साधली त्याला एक ग्रेट फोटो मिळालाच समजा. अशीच अचूक वेळ साधली आहे प्रसिद्ध वन्यछायाचित्रकार युवराज गुर्जर ने. सापाची जीभ हा त्याचा महत्वाचा अवयव आहे.. साप सारखा आपली जीभ आत बाहेर करत असतो..अगदी क्षणार्धात! अशी सापाची बाहेर आलेली दुभंगलेली जीभ युवराजने इतकी अचूक टिपली आहे कि ज्याचे नाव ते. अशीच किमया साधली आहे नयन खानोलकर याने. बोरिवलीतल्या राष्ट्रीय उद्यानातल्या आदिवासी पाड्यांमध्ये हल्ले करणाऱ्या बिबळ्यांचा अभ्यास करणारा हा तरुण. नयनने या पाड्यांमध्ये लपवलेल्या एका कॅमेरामधे पाड्यात शिरलेला बिबळ्या टिपला आहे.कॅमेराकडे कुतूहलाने पाहणारा पण सावधपणे पावले टाकणारा बिबळ्या त्याच्या मागे असलेल्या पिवळ्या बल्बच्या प्रकाशात अप्रतिम टिपला गेला आहे.तर असे हे मला आवडलेले काही फोटो,प्रत्येकाचे मला जाणवलेले गुणविशेष,मला जाणवलेली सौंदर्यस्थळे. यातले बहुतेक फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)