Thursday, August 12, 2021
अण्णा पन्नाशी
मी त्याला "अण्णा" अशी हाक का आणि कधी मारायला लागलो मलाच माहीत नाही. (पुढे जाऊन तो दक्षिण भारताचा जावई होणार आहे असं मला कुठेतरी दिसलं असावं म्हणून असेल कदाचित!!! दक्षिण भारतीय लोक मोठ्या भावाला "अण्णा" म्हणतात म्हणून मी त्यालाही अण्णा म्हणायला सुरुवात केली असावी.) खरं तर त्याला अण्णा म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही.तो नेहमी मला दरडावून सांगायचा "ए मला अजित म्हण!! "अण्णा" म्हणून हाक मारू नकोस!!!" मग मी पण मुद्दाम तो चारचौघात विशेषतः त्याच्या खास मित्रांच्या गोतावळ्यात असला की त्याला चिडवायला लांबून त्याला "अण्णा" म्हणून हाक मारायचो. सुट्टी पडली की मामाच्या गावाला जाऊया असे आपल्या लहानपणी म्हणायचे माझ्या बालपणीतल्या बहुतेक सुट्ट्या ह्या मुलुंडला माझ्या आत्याच्या घरी जीवन नगर सोसायटीत गेल्यात. माझा सर्वात मोठा दादा उदय माझे सर्व लाड पुरवायचा.दोन नंबरचा भाऊ ऋतुराज माझी खूप काळजी घ्यायचा.पण अण्णा माझा यार होता. खेळातला सवंगडी होता.त्याचे कितीतरी क्रिकेटचे सामने मी केवळ प्रेक्षक म्हणून बघायला जायचो.त्याची गोलंदाजी इतकी भन्नाट होती की त्याच्या गोलंदाजीला त्याच्या एरियातले तत्कालीन भले भले फलंदाज घाबरायचे.भन्नाट वेगाने चेंडू टाकणारा सहा फूट उंच माझा अण्णा पाहणे म्हणजे एक पर्वणी असायची आणि आपल्या पहिल्याच षटकात समोरच्या संघातला गडी बाद करण्यात त्याचा हातखंडा होता.त्या क्षेत्रात पुढे गेला असता तर तो खरंच एक नावाजलेला गोलंदाज झाला असता यात काही शंकाच नव्हती.पण त्याने वेगळे क्षेत्र निवडले.त्यातही आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर तो आज खूप मोठ्या पदावर आहे.
त्याचा जन्म १३ तारखेचा!! तेरा ही अशुभ तारीख समजली जाते. पण आपल्या कर्तृत्वाने अण्णाने ही तारीख किती शुभ असू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.तीन भावंडांत तो सर्वात धाकटा!!! पण या तिन्ही भावंडांमध्ये बऱ्याच बाबतीत त्याने पहिला नंबर लावला आहे. मुंबईच्या बाहेर नोकरी करायला गेलेला या तीन भावांतला तो पहिला.नोकरीनिमित्ताने परदेशवारी करणाराही पहिला तोच आणि या तीन भावंडांपैकी चार चाकी गाडी घेणाराही तोच पहिला.
असं म्हणतात की नशीब हे कर्तुत्ववान माणसालाच नेहमी साथ देते.आयुष्यभराचं जोडीदार हा चांगला मिळणे हा सुद्धा एक नशिबाचाच भाग असतो.त्याबाबतीत अण्णा खरंच नशीबवान आहे की दिव्या वहिनीसारखी साक्षात लक्ष्मी त्याच्या आयुष्यात आली.आता त्यांच्या आयुष्यात "अध्यन"चाही प्रवेश झाला आहे.अण्णाच्या मुळच्या भ्रमरवृत्तीमुळे,मनस्वी स्वभावामुळे त्याचे कसे होणार??? अशी त्याच्या आईला म्हणजे माझ्या सुहासिनी(मंदा)आत्याला नेहमी काळजी असायची.त्याच आमच्या अण्णाला आज एक उच्चपदस्थ अधिकारी ,उत्तम गृहस्थ, एक अतिशय चांगला पिता आणि प्रेमळ नवरा अश्या विविध भूमिकांमध्ये सहज वावरताना बघून आत्याला खूप आनंद झाला असता.
असा माझा अण्णा आज त्याच्या आयुष्यातले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.त्याबद्दल त्याला अनेक शुभेच्छा.......
Happy Birthday अण्णा!!!
Sunday, April 4, 2021
एकमेकांचे व्हा कायमचे!!!
Friday, February 12, 2021
वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष
गावडे घराणातल्या वरिष्ठ फळीमधली आम्हा सर्वांची लाडकी जयश्री आजी ,आमच्या विजय मामाची आई, सर्वाची लाडकी काकीचे आज निधन झाले.वात्सल्याचे कुठलं रूप असे जर आपण मनामध्ये त्याचं चित्र काढलं तर ते बहुतेक आमच्या आजीच्या रूपातच असावं.आपल्या वात्सल्यपूर्ण प्रेमाची छाया तिने संपूर्ण कुटुंबावर गेली साठ वर्षे धरली होती. एक आदर्श गृहिणी तर होतीच पण त्याबरोबर ती एक आदर्श शिक्षिका ही होती. आदर्श शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून एका प्रतिष्ठित शाळेतून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमही तिने खूप चांगल्या प्रकारे जगला असंच म्हणावे लागेल.सुगरण तर इतक्या वरच्या दर्जाची होती की तिने जेवताना वाढलेले पाणी ही चविष्ट लागायचे. तिच्या घरी गेल्यावर जेवणाचा आग्रह तो नेहमीचाच. तिच्या हातच्या जेवणाने पोट भरून जायचे पण मन भरायचे नाही. हस्ताक्षर तर एखाद्या छापील अक्षरापेक्षा सुंदर आणि रेखीव होते( तिच्या लाडक्या नातवामध्ये म्हणजेच देवाशिष मध्ये हा गुण अगदी अचूक उतरला आहे).
गावडे कुटुंबाच्या सुखात आणि दुःखात या कल्पवृक्षाची वात्सल्यपूर्ण सावली नेहमीच असायची. कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात तर तिची हजेरी हे विशेष आकर्षण असायचे.अतिशय साधी पण आकर्षक वेशभूषा करून एखाद्या गर्भश्रीमंत संस्थानच्या महाराणीसारखी दिसणारी; पहिल्या रांगेत बसून शांतपणे सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत बसलेली काकी आजी यापुढे दिसणार नाही याची चुटपुट यापुढे कायमची सगळ्यांना लागेल. अगदी आताआतापर्यंत तिला एवढा मोठे आजारपण आले असतानादेखील आपल्या नातवाच्या म्हणजे माझा चुलत मामेभाऊ विनितच्या लग्नात तिची हजेरी होती. या वात्सल्यमूर्तीने किती जणांना सांभाळले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले त्याची गणतीच नाही. त्यात सख्खे रक्ताचे तर होतेच पण सख्खे नसलेले जास्त होते. आजीने सर्वांना प्रेम, आपुलकी दिली. कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच तिचा प्रेमाचा गोतावळा एव्हढा मोठा आहे जो तिला या आयुष्यात तरी कधी विसरू शकत नाही. या दुष्ट आजारामुळे तीचे शेवटचे काही दिवस खूप कठीण गेले होते. गेले दोन दिवस तर ती अतिशय शांत झाली होती. समाधानी होती. कारण तिला कळलं होतं.असं कळणं आणि वास्तव स्वीकारणे फारच कमी लोकांना जमतं.जगाचा निरोपही तिने त्याच शांतपणे झोपेतच घेतला. कोणालाही त्रास न होऊ देता!!! आजी आज जरी तु आमच्यात नसलीस तरी तुझ्या आठवणींच्या रूपाने तू सदैव आमच्या मध्येच आहेस.....
Saturday, October 31, 2020
"अलविदा सर शाॅन"
"सर शॉन कॉनरी" या स्कॉटीश अभिनेत्याचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झालं. "ईयान फ्लेमींग" या ब्रिटिश लेखकाने "MI6" या खर्याखुर्या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेतील हे "जेम्स बॉण्ड 007" नावाचे काल्पनिक पात्र निर्मिले.हा नायक रांगडा होता, तितकाच तो रोमँटिक होता,दिसायला देखणा, उंचापुरा, बोलायला चतुर आणि पिस्तूल चालवण्यात वाकबगार असा होता.शॉन कॉनरीच्या व्यक्तिमत्त्वात हे सारे गुण बॉंडपटाच्या निर्मात्यांना ठळकपणे दिसून आले आणि तो अजरामर व्यक्तिरेखेचा पहिला मानकरी बनला. त्याने एकूण सात चित्रपटात बॉंड साकारला.एवढी अमीट छाप त्या भूमिकेवर सोडणे त्याच्यानंतर ही भुमिका साकारणारया दुसर्या कुठल्याही अभिनेत्याला जमले नाही.पण म्हणून बॉण्ड साकारणारा अभिनेता या चाकोरीत अडकवणे हे शॉन कॉनरीचा अपमान ठरेल. "हंट फोर रेड ऑक्टोबर" यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले.अत्यंत गाजलेल्या "अनटचेबल्स" या ब्रायन डी पाल्मा दिग्दर्शित माफियापटात त्याने साकारलेला पोलीस ऑफीसर जिमी मलोन कमालीचा प्रभावी होता.अभिनेत्यांचा अभिनेता असे ज्याचे वर्णन केले जाते असा "रॉबर्ट डी निरो",तत्कालीन हॉलीवूड सुपरस्टार "केविन कॉस्टनर",आपल्या सहज अभिनयासाठी प्रसिध्द असलेला "अँडी गर्सिया" अश्या तगड्या अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असून देखील कॉनरीने आपल्या भूमिकेसाठी त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचे ऑस्कर पटकावले हा एव्हढा पुरावा तो किती चांगला अभिनेता होता हे सांगायला पुरेसा ठरतो.ऑस्कर मिळवणारा तो पहिला(आणि एकमेव) "बॉण्ड" ठरला आणि त्याचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे." इंडियना जोन्स अँड द लास्ट कृसेड" चित्रपटातली नायकाच्या पित्याची भूमिकाही विशेष गाजली. "फाईंडिंग फोरेस्टर" या गस वॅन सांट दिग्दर्शित चित्रपटातील त्याची "विल्यम फॉरेस्टर" या विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकाची भूमिकाही मला फार आवडली होती.2000 साली त्याला "सर" या पदवीने सन्मानित करण्यात आले.आपण स्कॉटीश असण्याचा कमालीचा अभिमान त्याला होता.आणि "बॉंड" च्या व्यक्तिरेखेला कोणी न्याय देऊ शकेल तर तो केवळ एखादा स्कॉटीश ,आयरिश अथवा ब्रिटिश अभिनेताच देऊ शकेल;अमेरीकन किंवा अन्य कोणी त्याला न्याय देऊ शकणार नाही असे तो जाहीरपणे सांगायचा.त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली कारण त्याच्यानंतर बॉंड साकारणारे "रॉजर मूर","तिमोथी दाल्तन", "डैनिएल क्रेग" हे ब्रिटिश अभिनेते तर "पियर्स ब्रॉस्सनान" हा आयरिश अभिनेता कमालीचे लोकप्रिय ठरले तर "जॉर्ज लेसेंबी" या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याला प्रेक्षकानी नाकारले ही वस्तुस्थिती आहे. अशा या हरहुन्नरी आणि "जेम्स बॉण्ड" या सर्वमान्य लोकप्रिय अशा गुप्तहेराच्या व्यक्तिमत्वाला पुरेपूर न्याय देणाऱ्या या नटश्रेष्ठाला भावपूर्ण श्रद्धांजली.
Saturday, October 10, 2020
महानायक ७८
बच्चन साहेबाना उदंड आयुष्य लाभो हीच याप्रसंगी एक त्यांचा चाहता म्हणून प्रार्थना.
Sunday, September 27, 2020
नाळ
मातेच्या गर्भातला जीव नवमास भरले कि या वास्तवादी जगात प्रवेश करतो तेंव्हा त्याच्या मातेच्या गर्भाशयाशी ज्या नाळेने जोडलेला असतो ती नाळ कापून डॉक्टर त्या बाळाला गर्भाशयापासून विलग करतात पण त्या नाळेचा काही भाग तुकडा मात्र तसाच बाळाशी चिकटलेला असतो.जो काही दिवसानी आपोआप गाळून पडतो .पण मला असे वाटते की माता केवळ स्वत:च्या नाळेशी जोडलेल्या आपल्या बाळाला केवळ आपले गुणधर्म देते असे नाही तर आपली स्वप्ने मनातल्या ईच्छा आकांक्षा पण देत असावी.म्हणूनच जेंव्हा ती नाळ कापून बाळ वेगळे होते तेंव्हा तो तिच्या ईच्छा आकांक्षारूपी नाळेचा तुकडा बाळाला चिकटून राहतो आणि मग त्या ईच्छा आकांक्षा बाळामध्ये झिरपल्या की मग ती नाळ आपोआप गाळून पडते. आमच्या मंदाआत्येला कोकणाचे भयंकर अप्रूप होते एव्हढे की सम्पूर्ण हयात मुंबईत घालवून देखील ती नेहमी मालवणीतूनच बोलायची. गावाकडच्या आठवणीत रमायची. तिची एक ईच्छा होती की कोकणात आपले एक ऐसपैस घर असावे आणि हेच तिचे स्वप्न उदयदादामध्ये झिरपले असावे .आत्येने तिचे स्वप्न तिने उदयदादा तीच्या गर्भात असताना पेरले असावे. कारण दादाने अक्षरशः ध्यास घेतला होता की माझ्या कोकणात माझे स्वत:चे असे एक घर असायला पाहिजे कारण त्यालाही आता कुठे जाणवत होतं की आपली नाळ या कोकणाच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे . मग त्याचा शोध सुरु झाला आणि मालवणातील कट्टा या गावाजवळ येऊन थांबला. दादाच्या स्वप्नातले घरकुल उभे राहिले . नावही त्याने खूप विचार करून ठेवलेय ,"अद्वैत " याचा अर्थ कोणाशीही द्वैत म्हणजे वैर नसलेला. हे घर हे नुसतं घर नाहीये त्यातून दादाचा रसिक स्वभाव ठायी ठायी जाणवेल . मला असं वाटतं ह्या घराची हीच खासियत आहे की या घरावर आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टींवर उदय दादाचा ठळक ठसा जाणवतो.त्याने नव्याने उभारलेली पुष्करिणीही त्याला अपवाद नाही. एखाद्या आईने ज्या मायेने,प्रेमाने आपल्या लेकीला सजववावे तद्वत दादाने आपला हा स्वप्नमहाल सजविला आहे.दादाने त्याच्या मनात या घराबद्दल चे वाटतं ते शब्दात मांडले खरे पण ते खूपच अपूर्ण आहे असे मला वाटते कारण या घराबद्दल त्याला जे वाटते ते शब्दांत मांडणे अवघड आहे.खरं म्हणजे घराचा विषय निघाला तर तो बोलायचा थांबतच नाही इतक्या घराबद्दल त्याला प्रेम आहे आणि खरच हे घर त्याच्यासाठी स्पेशल आहे कारण उदयदादासाठी हे केवळ घर नाही तर एक स्वकष्टाने पूर्ण केलेली स्वप्नपूर्ती आहे. त्याची नाळ त्या घराशी आणि कोकणच्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे.