Sunday, July 26, 2020

गणेश अण्णा 50

बहुतेकांच्या घराला आढळणाऱ्या हॅपी बुद्धा सारखे सदैव आनंदी असणारे आणि निवांतपणा हा स्थायीभाव असणारेआमचे सर्वांचे लाडके बंधू माननीय श्री गणेश
अण्णा चव्हाण यांनी या वर्षी आपल्या वयाची 50 वर्षे पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.अत्यंत अगत्यशील,सदैव हसरा चेहरा आणि लहानपणापासूनच मोठ्या कुटुंबात राहिल्यामुळे अत्यंत गर्दीप्रिय असे हे व्यक्तिमत्व. माणसांच्या गोतावळ्यात राहायला आवडते म्हणूनच असेल,वेळ मिळाला की आपल्या बहिणींच्या कुटुंबासमवेत नवीन घेतलेल्या गाडीतून भटकंती करायला प्रचंड आवडते .खरेतर गाडी घेऊन त्यांना दोन एक वर्ष झाली असतील पण त्यांनी गाडी पुढच्या दहा वर्षात जेवढे धावेल एवढं दौडवीली आहे यावरून तुम्हाला कल्पना यावी.अण्णाकडे जर कधी जावे तर त्याच्या अगत्याने तुम्हाला गुदमरायला होते.हॉटेलमध्ये काय घेऊन जाईल,काय काय नवीन नवीन खाण्याच्या डिशेस मागवेल.घरच्या जेवणात पण खास बेत ठरलेला. त्यात आमची वहिनीपण सुग्रण आहे मग तर काय विचारायलाच नको.त्यामुळेच कदाचित अण्णाची तब्येत आता त्या हॅपी फेस बुद्धा सारखीच होत चालली आहे.बुद्धीच्या देवतेचे नाव लाभल्याने अत्यंत बुद्धिमान तर आहेतच आणि गोड खाण्याची आवड असल्यामुळे तो गोडपणा बोलण्यातही उतरलाय.आदर्श पती,आदर्श पिता,आदर्श पुत्र आणि आदर्श भाऊ अशा सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलणारे आमचे बंधुराज; चेहर्‍यावरची लकाकी अजून वय तिशीतच थांबलेय असे वाटावे इतकी चांगली. मिशांची ठेवण थेट "भाऊजी" आदेश बांदेकरांसारखी,म्हणून पर्वतीचा आदेश बांदेकर असेही यांना म्हणतात.अश्या ह्या आमच्या सदैव आनंदी आणि गोड स्वभावाच्या भावाला सुवर्णमहोत्सवी जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

द ग्रेट मराठा सरदार

आजच्या दिवसाचे मानकरी आहेत ज्यांचा उल्लेख मी नेहमी "मराठा सरदार" असा करतो ते पार्ले महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.गुरचरणजितसिंग संधू अर्थात सर्वांचे लाडके "चरण सर".एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढण्यात अत्यंत तरबेज असलेले आणि सरदार असल्याने प्रत्येक आघाडीवर विजय मिळवण्याच्या जिद्दीने लढणारा हा लढवय्या. "जसा रोगी तसा इलाज " या कलेत तर ह्या माणसाचा कोणी हाथ पकडू शकत नाही त्यामुळे कोणाला कुठली मात्रा लागू पडेल याचा ह्यांचा अंदाज तर वाखाणण्याजोगा.जन्माने मराठी असलेल्यानांदेखील आश्चर्य वाटेल इतके सुंदर मराठी हा जन्माने मराठी नसलेला माणूस बोलतो.विले पार्ले म्हणजे मुंबईची सांस्कृतिक राजधानी,त्यामुळे इथे सतत काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते ह्यातल्या बहुतेक कार्यक्रमांत खारीचा का होईना वाटा घेऊन कोणत्याही वय्यक्तिक फायदा न बघता केवळ तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असलेला हा सच्चा पार्लेकर.औदुंबराला जेव्हढ्यावेळा फूल येत असेल त्यापेक्षा कमी वेळा ह्यांच्या चेहर्यावर हसू असते बाकी वेळी (उगीचच) गंभीर चेहरा. पण ह्या गंभीर चेहर्याच्या माणसाकडे (फक्त चेहराच गंभीर आहे,बोलता बोलता कधी समोरच्याची फिरकी घेतील याचा नेम नाही) अत्यंत कलासक्त मन आहे.सुप्तावस्थेत असलेली  "WAFS" पुनरुज्जीवित करण्याचे आणि त्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ते जोडण्याचे श्रेय फक्त या माणसाला जाते.त्यासाठी त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न आम्ही पाहिले आहेत.विद्यार्थीदशेत असल्यापासून नृत्य,अभिनय ,राजकारण अशा अनेक क्षेत्रात मनसोक्त मुशाफिरी केलेला,त्यामुळेच आलेल्या अनुभवसंपन्नतेमुळे प्रवृत्तीने स्थिप्रद्न्य असलेला आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने निघालेल्या बाणाप्रमाणे सरळ गतिमान चालीसारख्या सरळ स्वभावाचा ,आयुष्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची झुळूक लागलेला हा आमचा चिरतरुण मित्र..... चरण सर तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.सुरु झालेले २०१८ साल तुम्हाला अत्यंत यशस्वी कारकिर्दीचे जावो ही स्वामीचरणी प्रार्थना......

Happy Birthday Uday Dada

शुभेच्छा.. नमस्कार मंडळी ..... तर आजच्या शुभेच्छांचे मानकरी आहेत L & T रत्न श्री.उदय कुडतरकर ...... (टाळ्या).ह्या माणसाबद्दल काय सांगावे महाराजा. "Live Life King Size" हे जगण्याचे ब्रीदवाक्य असलेले हे महाभाग. खरे तर आपण आजच्या जमान्याचे "लिओनार्दो द विंची " च व्हायचे पण पदरी ( L & T) पडले आणि पवित्र झाले या उक्तीनुसार गेली तीस वर्षे इमाने इतबारे नोकरी केली,अजून करतात . पोलाद कंपनीत कामाला असून देखील (एकेकाळी) पोलादी शरीराच्या ह्या माणसाची कुंचल्यावरची पकड तितकीच नाजूक आणि नज़ाकतभरी आहे. रंगाच्या दुनियेत मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्या उदयजींनी अनेक सुंदर सुंदर चित्रे काढली आहेत.ह्याच्या जोडीला अत्यंत सुंदर गाता गळा ह्यांना लाभलेला आहे. अनेक गाण्याच्या मैफिली गाजवल्या आहेत. तर असे हे "गाणे ,चित्रकला ,छायाचित्रण,प्रवास" असे चांगले तर "अवाढव्य आणि वायफळ खरेदी,दुसऱ्याला उगीचच ज्ञानामृत पाजणे आणि प्रचंड झोप " असे भलते सलते षौक बाळगणारे,एक नुकतीच मिसरूड फुटलेला आणि नेहमी ह्यांच्याशी मान खाली घालून बोलणारा मुलगा (कारण तो ह्यांच्यापेक्षा उंचीने जास्त आहे ),एक निळ्या बटांचे केस असलेली मुलगी आणि मासे व चहा ह्या दोन गोष्टींवर नवऱ्याइतकेच प्रेम असणारी ह्यांची सुविद्य,गृहकृत्यदक्ष पत्नी ह्यांच्यात रमलेले एक बहुआयामी रुबाबदार व्यक्तिमत्व. एकाच वेळी अनेक मोबाईल चार्ज करायची सुविधा असलेला "बहुपिनी " चार्जरच जणू .....पण हा चार्जर स्वतः ला चार्ज करायला त्याच्या कोकणातल्या घरी जेंव्हा सुट्टी मिळेल तेंव्हा रवाना होतो ,तेथील निसर्गाच्या सान्निध्यात रमतो ,मनसोक्त गातो आणि खातो (म्हणून बऱ्याचदा एकटाच जातो )... डोक्यावरची कौले उडायला लागल्यावर विचार आला कोकणात एक कौलारू घर असावे आणि "अद्वैत "निर्मिती झाली. ते आता त्याचे "Most Favourite Destination " बनले आहे . आजूबाजूच्या मालवणी लोकांमध्ये आता चांगली उठबस होऊ लागली आहे .. तिकडच्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहमी बोलवणे असते,स्थानिक मालवणी भाषाही लीलया बोलू शकतो.माझ्या आई वडिलांनी पुरविले नसतील एव्हडे लाड माझ्या ह्या भावाने माझे पुरविले आहेत  .तर अशा या कुडतरकर घराण्याच्या दुसऱ्या पिढीच्या नायकाला माझ्या तर्फे आणि संपूर्ण परब परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. "HAPPY BIRTH DAY UDAY DADA "

एका आर्य पुरुषाची निवृत्ती

एखाद्या ललनेला सहज आकर्षित करू शकेल अश्या रांगड़या पुरुषार्थाची सर्व लक्षणे मिरवणारया आणि अतिशय सुदृढ प्रजनन क्षमतेच्या पुरुषाला आपल्या संस्कृतीमध्ये आर्यपुरुष म्हणून संबोधतात.अश्या पुरुषाकडे अशी काहीतरी दैवी असते की कुठल्यातरी अनामिक ओढीने स्त्रिया चुंबकासारख्या ह्या पुरुषाकडे ओढल्या जातात.अश्याच कासवातल्या आर्यपुरुषाच्या गेल्या महिन्यातल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले.
"डिएगो" नावाचं कासव आपल्या वयाच्या शंभरीमध्ये निवृत्त झाले आणि ही त्याची निवृत्ती सर्वार्थाने गाजली.त्याला एका राष्ट्र वीराच्या सन्मानाने परत त्याच्या मूळ जन्मस्थानी सोडण्यात आले.आता ह्या डिएगोने काय एवढे मोठे कार्य केले ते आपण जाणून घेणे इथे फार महत्त्वाचे ठरते.त्यासाठी आपण आधी ह्या कासवाचा इतिहास जाणून घेऊ.
डिएगोचा जन्म 1920 सालातला एस्पाओला बेट, गॅलपागोस,स्पेन येथला. तेथील नैसर्गिक वातावरणात आपल्या आयुष्याची काही वर्षे आनंदात घालवल्यानंतर नंतर 1940 झाली डिएगो पकडला गेला आणि त्याची रवानगी झाली अमेरिकेतल्या कैलिफ़ोर्निया राज्यातील सॅन डिएगो राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात.तेथे ही स्वारी खूपच चांगली रमली आणि 1970 सालापर्यंत तिथे अत्यंत आनंदात डिएगो जगत होता.कस्तुरीमृगाला ज्याप्रमाणे आपल्या नाभीमध्ये कस्तुरी आहे हे जसे माहिती नसतं तसंच डिएगोलाही आपण कुठल्या कार्यासाठी जन्माला आलोय आणि आपल्याकडे काय आहे याची काहीच कल्पना नव्हती. रोजच्याप्रमाणे खाणे,आपल्या प्राणिसंग्रहालयात जिथे त्याला ठेवलं होतं त्या जागेत मनसोक्त विहार करणे एवढेच त्या बिचारयाला माहित. पण डीएगो खऱ्या अर्थाने प्रकाशात आला तो 1970 साली.त्याचे कारण असे की निसर्गनियमाप्रमाणे आणि मुख्यतः मानवनिर्मित घटनांमुळे अनेक प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हूड आयलँड कासव(प्रजाती:-Chelonoidis hoodensis ) हेही त्यातलेच एक. या कासवांची शिकार मुख्यतः शेळीऐवजी पर्यायी अन्न म्हणून आणि त्याचे मोठे पाठीवरचे कवच यासाठी प्रामुख्याने केली गेली.स्पेन मध्ये प्रामुख्याने विकसित झालेल्या आणि तिथेच वाढत असलेल्या प्रजातीला अनेकांच्या क्षुधाशांतीसाठी प्रामुख्याने वापरले गेले; इतके की शेवटी या प्रजातीची फक्त बाराच कासवे शिल्लक राहिलीत असे तेथील स्थानिक वनअधिकार्यांना जाणवले.या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या कासवाची मान लांब असते आणि पूर्ण वाढ झालेले कासव हे पाच फुटापर्यंतही असू शकते. ही प्रजाती पूर्णतः शाकाहारी आहे.असो!! नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ह्या कासवांच्या प्रजातीकडे वन्य विशेषकांचे लक्ष गेले नसते तरच नवल होते.मग त्यातली काही कासवे ही अमेरिकेतील सांताक्रूझ आयलँड येथील प्रजनन केंद्रात आणली गेली. हेतू हा की तेथे संरक्षित परिस्थितीमध्ये त्यांचे प्रजनन व्हावे आणि त्यांची संख्या वाढावी. तिथे या सर्व कासवांची शारीरिक तपासणी केली गेली पण असे लक्षात आले की तिथे प्रजननयोग्य नरांची संख्या कमी आहे. मग हा शोध पुन्हा सुरू झाला आणि डिएगो वर येऊन थांबला. डिएगोची पूर्णतः शारीरिक तपासणी करण्यात आली.त्याच्या जनुकीय बनावटीचाही अभ्यास केला गेला;त्यावरून असे लक्षात आले की डिएगो हाही हुड आयलंड प्रजातीला कासव आहे आणि प्रजनन योग्यही आहे.मग डिएगोची रवानगी सांताक्रुज़ आयलँड मधील प्रजनन केंद्रात करण्यात आली. ते साल होतं 1970 आणि त्यावेळी डिएगो होता पन्नास वर्षांचा. डिएगोप्रमाणेच आणखी दोन नर कासवे E 5 आणि E 3 यानांही याच कामासाठी प्रजनन केंद्रात आणले गेले.या तिघांनी मिळून आतापर्यंत २५००हून अधिक पिलांना जन्माला घालायचे सत्कर्म केले आहे.यात एकट्या डिएगोचा वाटा 900 पेक्षा अधिक पिलांचा म्हणजे या एकूण प्रजननातील तब्बल ४०% भार या कासवातील आर्यपुरुषोत्तमाने एकट्याने उचलला आहे.या प्रजनन केंद्रातील तज्ञांनी आपली निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्यानुसार डिएगोच्या प्रजातीतील बहुसंख्य माद्यांनी E5 आणि E3 या दोन नरांपेक्षा डिएगोला मिलनासाठी सर्वात जास्त पसंती दिली.याचं कारण E5 आणि E3 दोघेही प्रजनन करणे हे केवळ कार्य समजून ते कार्य करायचे आणि एवढे मिलनोत्सुक नसत.पण डीएगो मात्र मीलनाच्याबाबतीत आक्रमक,बोलका आणि आग्रही असायचा.त्यामुळे अश्या नरोत्तमाकडे माद्या आकर्षिल्या गेल्या यात नवल ते काय?? डिएगोही अपेक्षेपेक्षा जास्तच उत्साही निघाला.अगदी आताआतापर्यंत म्हणजे 2020 सालापर्यंत आपल्यावर सोपवलेले आपल्या प्रजातीच्या वाढीचे काम तो इमानेइतबारे करत होता.हुड आयर्लंड प्रजातीच्या कासवांची संख्या आता व्यवस्थीत वाढली आहे असे लक्षात आल्यावर सांताक्रुज़ आयलँड प्रजनन केंद्रातील अधिकार्‍यांनीही आपल्या प्रजातीच्या पुनरुथ्थानासाठी गेली पन्नास वर्ष झटलेल्या या कासवा मधल्या आर्या पुरुषाला त्याला शोभेल असाच निरोप द्यायचे ठरवले आणि पूर्ण सन्मानाने एखाद्या राष्ट्र वीराच्या मानाने डिएगोला नैसर्गिक वातावरणात परत नेऊन सोडण्यात आले जेणेकरून तो आपले उर्वरित आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात सुखाने,समाधानाने घालवू शकेल.अर्थात तिथे सोडण्याआधी डिएगोची पूर्ण शारीरिक चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली. निवृत्तीच्या वेळी शंभर वर्षाचा असलेला डिएगो शारीरिक चाचणीत सुदृढ आढळला.जर नैसर्गिक वातावरणात डिएगो कोणाकडून काही अपाय झाला नाही तर आणखी पन्नास वर्ष सहज जगू शकेल अशी त्याची शारिरीक तंदुरुस्ती सांगते.अशा या कासवातल्या आर्य पुरुषाला निवृत्तीच्या शुभेच्छा.आजच्या तरुण पिढीच्या फेसबुकी भाषेत बोलायचं तर या दिएगोसाठी एक लाईक तो बनता है.

Saturday, October 26, 2019

अभिनंदन परागजी

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विले पार्ले विधानसभेचे आमदार म्हणून ऍड . पराग अळवणी  सलग दुसऱयांदा तब्बल ५८,९११ च्या मताधिक्याने निवडून आले. माझी भाजप कार्यकर्ता म्हणून तिसरी आणि स्वत: परागजी उमेदवार म्हणून असलेली ही पहिलीच निवडणूक . तशी माझी आणि परागजींची ओळख ५ वर्षेच जुनी . २०१४ सालातल्या डिसेंबर महिन्यातली ही गोष्ट असावी . तेंव्हा ते नुकतेच तेही पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले . ते राहात असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये आमची भेट झाली . त्यांचे कार्यालय सांभाळण्याची जबाबदारी मला मिळाली होती. वर्षभर मी त्यांचा कार्यालय प्रमुख म्हणून काम पाहिले .नंतर मी माझे स्वतंत्र काम सुरु केले,तरी परागजींबरोबर असलेला ऋणानुबंध अद्यापही तसाच आहे. परागजींच्या सहवासात मी अनेक गोष्टी शिकलो .त्याचा मला स्वतः चे व्यक्तिमत्व घडविण्यात खूप मदत झाली.परागजींच्या कार्यालयात काम करत असताना अनेक मित्र मिळाले. खूप मोठ्या लोकांचा सहवास लाभला. भाजपचा प्रभाग क्र. ८१ मधला कार्यकर्ता म्हणूनही परागजी एक सक्षम नेता आहेत याची ही प्रचिती आली .त्यामुळे जेंव्हा विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जेंव्हा निश्चित झाली तेंव्हा पुन्हा एकदा आपल्या नेत्याला जिंकून द्यायचेच या उद्देशाने विले पार्ले विधानसभेमधला परागजींचा प्रत्येक कार्यकर्ता भारून गेला होता. पण केवळ कार्यकर्ताच नव्हे तर विले पार्ले विधानसभेतील सामान्य नागरिकांवरही पराग अळवणी या माणसाचे गारुड आहे .परागजींनी आपल्या विधानसभेत केलेल्या कामांची यादीच सांगते की परागजींनीं आपल्या विधानसभेच्या उत्कर्षासाठी किती कष्ट घेतलेत ते. मग तो विमानपत्तन परिसरातील बाधित झोपड्पट्टीवासीयांबद्दल असो किंवा चकाला ,चरतसिंग वसाहत परिसरातील मलनिःस्सारण वाहिनीसंदर्भातील विषय असो असे अनेक विषय परागजींनी लावून धरले आणि त्यात यश मिळवले. त्यामुळे त्यांच्या विधानसभेतील लोकांचे आपल्या या सुसंस्कृत ,सुस्वभावी,विनयशील,हुशार आणि मेहनती नेत्यावर प्रचंड प्रेम आहे . त्यामुळे या वेळीही केवळ जिंकायचे नाही तर मोठ्या फरकाने जिंकायचे हा निर्धार करूनच भाजप कार्यकर्ते कामाला लागले होते. परागजी उमेदवारी अर्ज भरायला निघाले तेंव्हा भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहून विरोधी उमेदवारांना नक्कीच धस्स झाले असेल. प्रचंड जनसमुदाय . परागजी तुम आज बढो हम तुम्हारे साथ हैं या नार्याने सारे पार्ले भरून गेले होते. अर्ज दाखल झाला आणि कार्यकर्त्यांची लगबग आपापल्या विभागात वाढू लागली. परागजी तर आपल्या विधानसभेत पायाला भिंगरी लागल्यागत फिरत होते .कार्यकर्त्यांबरोबर बैठकांच्या फेऱ्या होत होत्या . समाजमाध्यमे ,प्रचारपत्रकांच्या माध्यमातून प्रचार जोर पकडत होता .गेल्या खेपेला जिथे मतं कमी पडली त्या विभागात काम अधिक जोमाने सुरु होते,कमी मतं का पडली याविषयी त्या त्या विभागातले नेमलेले प्रभारी स्थानिक कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करीत होते .जिथे गरज पडली तिथे परागजी जातीने सभांना हजेरी लावत होते ,कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत होते . बहुतेक कार्यकर्ते परागजींचा प्रचाराचा धडाका बघून असेही म्हणू लागले "अरे परागजी जिंकणारच आहेत खात्री आहे आम्हाला तरी परागजी एव्हढी धावपळ का करतायत ??" .शाळेतला हुशार विदयार्थी हा केवळ चांगले मार्क मिळाले म्हणून समाधानी नसतो त्याला पैकीच्या पैकी मार्क हवे असतात कारण त्याला चांगल्या मार्कांच्या सुखापेक्षा गेलेल्या मार्कांचे वाईट वाटते .परागजींचेही तसेच चांगली मतं आपल्याला मिळणार हे त्यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला समजत नव्हते असे नाही ,पण विजयाला सोळा अणे बळकटी हवी.प्रत्येक बूथमधून भरघोस आघाडी मिळावी यासाठी परागजी आग्रही होते.त्यांचा हा ध्यासच कार्यकर्त्यांमध्ये जोश जागवीत होता म्हणूनच की काय निवडणुकांच्या काळात अनेक कार्यकर्ते कामावर रजा टाकून आपापल्या प्रभागात हिरीरीने प्रचार करत होते. माझ्या प्रभाग कर. ८१ बद्दल बोलायचे तर आमच्या प्रभारी शुभांगीताई भावे नुकत्याच एक आजारातून बऱ्या झालेल्या त्यांना विश्रांतीची नितांत आवश्यकता असतानासुद्धा सतत परागजींसाठी जीवाचे रान करत होत्या. निलेश सावंत,संतोष गोताड,लीना गोम्स ,बोनू,मनीषा पटेल,स्वाती मोरे,वयाची साठी उलटले डेविड काका,युसूफ मुल्ला ,संजय भेकरे,अनंत चव्हाण  आदि  मंडळी दिवस रात्र एक करत होती ,परागजींच्या सभा यशस्वी व्हाव्यात,त्यांचा प्रचार योग्य रीतीने व्हावा,प्रचार फेरीची मंजुरी ,त्या फेरीची आखणी,पत्रके वाटणे अशी भरमसाट कामे ही सर्व मंडळी जीवाचे रान करून पार पाडीत होती . 'LEADING FROM FRONT " या उक्तीला साजेश्या शुभांगी ताई स्वतः आपल्या तब्येतीची,बाकी सर्व चिंता,विवंचना बाजूला सारून परागजींचा भरघोस मतांनी विजय ह्या ध्यासाने भारून गेल्या होत्या. आपल्या प्रभागातून जास्तीतजास्त मते परागजींना मिळवून देणारच हे आव्हान ताईंनी स्वीकारले होते (आणि ते त्यांनी खरे करून दाखविले ,ज्या इस्लामपूरा विभागातून नेहमी काँग्रेसला मतदान होई त्या इस्लामपूरातील एकगठ्ठा मते परागजींना मिळाली ).अनंत अडचणी येत होत्या. कधी कधी स्थानिकांकडून विरोधाचा सूर येई पण त्या सर्व अडथळ्यांना  यशस्वी रित्या पार करत भाजप कार्यकर्ते नेटाने आपले काम करत राहिले. (इथे मला खारचे माजी नगरसेवक आणि जिल्हा महामंत्री महेश पारकर यांचा खास उल्लेख करावा लागेल कारण शुभांगी ताईला पहाडासारखी साथ महेशजींनी दिली.   ताईचा कामाचा ताण हलका केला) अनेकांना कौतुक वाटावे असे हे वातावरण बर्याच वरिष्ठ कार्यकर्त्यांना अगदी माझ्यासारख्या नगण्य कार्यकर्त्यालासुद्धा लोक भेटले की विचारायचे का एव्हढे का राबताय तुमच्या नेत्यासाठी,काय मिळणार आहे तुम्हाला?? याचे कारण आमचा सर्वांची काळजी करणारा आमचा नेता हे होय. मला या निवडणूकीदरम्यान आलेले दोन अनुभव पुरेसे बोलके आहेत.प्रचारफेरी होती आणि वेळ दुपारची,ऑक्टोबरचा तो सर्वात गर्मीवाला दिवस होता,वातावरणातला दमटपणा अजूनच थकावट आणत होता.यात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. परागजी प्रचाररथावर स्वार झाले फेरी सुरु होताच काही वेळाने मी रथाजवळच उभा असल्याने त्यांनी मला विचारले अमित हा फेरीचा मार्ग खूप लांबचा नाही ना ?? सकाळी एक प्रचारफेरी आटपून आलेले परागजी थकले असावेत असा माझा कयास पण त्यांचे पुढचे वाक्य त्यांच्यातल्या काळजी करणाऱ्या नेत्याचे दर्शन देणारे होते. माझ्या मनातला प्रश्न आपल्या चाणाक्ष नजरेने ओळखत परागजी म्हणाले अमित मला माझी पर्वा नाही मी उमेदवार आहे पण या वातावरणाचा  त्रास माझ्या कार्यकर्त्यांना झालेला मला चालणार नाही. मी स्तब्ध झालो. रात्री उशिरापर्येंत कार्यकर्त्यांच्या बैठकीत असेलेला आणि तरीही सकाळी एक प्रचार फेरी आटपून आलेला आणि पुन्हा एकदा प्रचार फेरीला सज्ज असलेला हा नेता आपल्या आधी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार करतो. फेरीच्या आधी फेरीच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली आहे की नाही ते स्वतः जातीने बघणारा हा संवेदनशील नेता . खरंच कौतुकास्पद. दुसरा प्रसंग एक स्थानिक परागजींकडे स्थानिक भाजप कार्यकर्त्यांची तक्रार करत होता. पण परागजींनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्या माणसाची हजेरी घेतली आणि हे कार्यकर्ते मला निःस्वार्थी साथ देतात ह्यांच्याबद्दल एक शब्द ऐकून घेणार नाही अशी ताकीद दिली. अशा नेत्यासाठी कार्यकर्ते धडपडतात त्यात आश्चर्य ते काय!! या माणसाकडे प्रचंड ऊर्जा आहे. एव्हढा मोठा विले पार्ले विधानसभा प्रभाग परागजींनी अक्षरश: पिंजून काढला होता . अनेक बैठका ,निवडणुकीची इतर कामे,सततचा प्रवास पण परागजींच्या चेहर्यावर थकावटीचे एक ही लक्षण नसायचे त्यांचा हाच उत्साह ,कामाप्रती असेलेली निष्ठा कार्यकर्त्यांना बळ देत होती. अखेर तो २१ तारखेचा मतदानाचा दिवस उजाडला इतके दिवस ह्या दिवसासाठी केलेली तयारी,रात्रंदिवस घेतलेली मेहनत ,प्रचंड मेहनतीने जमवलेला लोकसम्पर्क यांचे मतांमध्ये रूपांतर करण्यासाठी कार्यकर्ते आपापल्या बूथमध्ये सज्ज होते. मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रतिसाद कमी वाटत होता. कार्यकर्ते सावध झाले ,आपापल्या प्रभागातील इमारतींमध्ये,चाळीत राहणाऱ्या मतदाराला घरोघरी जाऊन आवाहन करू लागले. मतदानासाठी प्रवृत्त करू लागले . त्यांच्या प्रयत्नाला यश येऊ लागले. अनेक ठिकाणी मतदारांना ने आण  करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि एक चांगल्या संख्येचे मतदान झाले. संध्याकाळी मतदान झाल्यावर भाजप कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती ती ही नाही की परागजी किती मताधिक्याने जिंकणार कारण  एकतर्फी लढत सरळ दिसत होती. दि . २४ ऑक्टोबर वेळ दुपारी १ वाजता पारंगजींचे मताधिक्य ४०,०००चा आकडा पार करून गेले होते. विजय निश्चित होता आता फक्त घोषणेची औपचारिकता बाकी होती. जिल्हा कार्यालयात प्रोजेक्टर स्क्रीन वर महाराष्ट्र निवडणुकीचे निकाल दाखवले जात होते कार्यकर्त्यांची खूप गर्दी होती. सर्वाना प्रतीक्षा होती परागजींची. विजय निश्चित झाल्याने मी समाधानाने घरी परतलो.थोडा आराम करावा म्हणून जरासा लवंडलो तर कधी डोळा लागला कळलेच  नाही .बऱ्याच दिवसानी शांत झोप मिळाली. जागा झालो तर समाजमाध्यमांवर परागजींची हसरी छबी सर्वांचे आभार पुष्पगुछरूपात स्वीकारताना झळकली. मनात म्हटले आपणही जावे आणि त्यांना भेटून यावे.इतक्या दिवसांच्या धावपळीने श्रमलेले परागजी असतील का कार्यालयात ? मनात संशय डोकावला .तडक परागजींचे स्वीय सहाय्यक आणि माझे परममित्र दीपक कदम यांना फोन केला ."सर आजून कार्यालयात आहेत ,कधी ही निघतील ,लवकर ये " दीपक जी वदले .,धावत पळत जिल्हा कार्यालय गाठले .परागजी आपल्या कक्षात होते . पुष्पगुच्छांनी कार्यालय भरून गेले होते . सर्वानाच परागजींना  भेटायचे होते त्यांच्याबरोबर फोटो काढायचे होते ,सकाळी ७ वाजता मतमोजणी कार्यालय गाठलेले आणि संध्याकाळी विजय यात्रा करून आलेले परागजी कोणालाही नाराज करत नव्हते .सर्वांबरोबर फोटो काढत होते सुहास्य वदनाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते . थकवटीचा हलकासा परिणाम दिसत नव्हता . माझा नंबर आल्यावर मी पुढे झालो. "अमित ये ये " अशी आपुलकीची हाक ऐकू आली मी हस्तांदोलन केले मलाही फोटो हवा होता,त्यांच्या बाजूला फोटोसाठी उभा राहिलो. घाईगडबडीत मी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणायला विसरलो हे लक्षात आले मी ओशाळवाणा झालो ..माझी अवस्था माझ्या नेत्याच्या लक्षात आला आणि आपल्या या कार्यकर्त्यांच्या  फोटोचा विचका होऊ नये या साठी समोरच असलेला एक सुंदर पुष्पगुच्छ माझ्या हातात देत मिस्किलपणे म्हणाले "हं आता काढा रे फोटो, आमचा फोटो चांगला आला पाहिजे " . फोटो झाला मी पुन्हा एकदा हस्तांदोलन केले,आणि बाहेर जाण्यासाठी वळलो ,बाहेर खूप माणसे अभिनंदन करण्यासाठी ताटकळली होती .मला खात्री होती परागजी एकालाही नाराज करणार नव्हते .लोकांच्या गराड्यात सर्वांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत सुहास्यवदनाने उभा असलेला आमचा सेनापती मनात साठवत मी बाहेर पडलो. आता पुन्हा सज्ज व्हायचे होते पुन्हा एक नवी सुरुवात झाली होती . लोकसेवेचा वसा घातलेला आमचा सेनापती आता थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा लढाईला सज्ज होईल म्हणजे आम्हालाही त्याला साथ द्यायला सज्ज रहावेच लागेल....."परागजी आप आगे बढो हम हमेशा तुम्हारे साथ हैं ". परागजी सलग दुसऱयांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन 

Wednesday, April 11, 2018

शब्दांकित: गाऱ्हाणं........

शब्दांकित: गाऱ्हाणं........: हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा  म्हाराजा....व्हय म्हाराजा.....काही द...

Tuesday, April 10, 2018

गाऱ्हाणं........



हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा  म्हाराजा....व्हय म्हाराजा.....काही दिवसांपुर्वीची गोष्ट हा रे म्हाराजा..... झी मराठीवरली मालवणी भाषेची मालिकेतलो एक नट माका भेटलेलो.... मी त्याका विचारलंय का रे बाबा मालवणी भाषेवरची हि मालिका बंद कित्याक केलास..... त्यावर तो म्हणालो त्यो चॅनेल चो निर्णय आसा म्हणून..... मग त्यावर तो बोललो कि मालवणी माणसांबरोबर आणि मालवणी भाषेबरोबर नेहमी असाच होता... आणि माझ्या डोक्यात किडो वळवळलो.....खराच आसा ता ......अगदी कोकणात खयपण गावणाऱ्या आंबटगोड चवीच्या करवंदासारखी आपली मालवणी भाषा. पण तिचो आता ऱ्हास होवून लागलो हा.... सिनेमातून,मालिकातून,नाटकातून विनोदी पात्राच्या तोंडातून हि भाषा डोकावता...... पण दोस्तहो माझी मालवणी भाषा खरंच महान आसा कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्यासारखी कानाक गोड लागणारी,कोकणातल्या नद्यांसारखी तिरकस वळणांची आणि कितीही संकटांका पुरून उरलेल्या आणि कधीही आत्महत्येचो मार्ग न धरलेल्या कोकणी शेतकऱ्यासारखी कडक आसा माझी मालवणी भाषा. "वस्त्रहरण"वाले गंगाराम गवाणकर,मालवणी नटसम्राट मश्च्छिन्द्र कांबळी ,दिगंबर नाईक अशा अनेकांनी हाय भाषेचा महत्व टिकवून  ठेवलेला आसा पण माका वाटता कोकणात तर हि भाषा बोलली जाताच पण शहरात रवणाऱ्या आपल्यासारख्या लोकांची पण हि जबाबदारी आसा की आपल्या भाषेचो मान आणि अभिमान आपणांकच टिकवूचो लागतालो दोन गुजराथी म्हणा किंवा मद्रासी,केरळी,पंजाबी माणसा समोरासमोर असली कि हटकून आपल्या भाषेत बोलतत पण मालवणी माणसा नाय बोलत... ती बोलूक व्हयी.. आपल्या ह्या भाषेचो गोडवो आपणच सर्वांका दाखवून देवूचो लागतलो.... आपल्या पुढच्या पिढीक ह्यो भाषेचो वारसो देऊची जवाबदारी आपलीच आसा नायतर आपली पुढची पिढी ही भाषा बोलुनी नाय आणि मालवणी भाषा नामशेष होवूक वेळ लागायचो नाय. आधीच कोकणात गुजराती ,मारवाड्यान आणि इतर अनेक परप्रांतियान हातपाय पसरलेले आसत आपली भाषाही सहज बोलतत,पण आपापसात बोलताना आप्ल्याच भाषेत बोलतत;मग आपण कीत्या मागे रवायचा???कोकणावर,त्याच्या भाषेवर आपला मनापासून प्रेम आसात तर ह्यो  अक्षयतृतीयेचो मुहूर्त चांगलो आसा रे म्हाराजा..... या मुहूर्तावर मी तुका गाऱ्हाणा घालतंय कि आपल्या शहराकडल्या मालवणी माणसांका मालवणीतून बोलण्याची बुद्धी लाभू दे रे म्हाराजा.... मी तुका सांगताय रे म्हाराजा कि मी माझ्या आवशीबापाशीवांगडा ,माझ्या नातलगांवांगडा ,माझ्या बायले वांगडा मालवणीतूनच बोलतलय.आणि माझी तुमका सर्वांक विनंती आसा शक्य असतात तेंव्हा मालवणीतून बोलत रवा;चुकलात तरी चालात...चला आज संकल्प करूयात.आपण मालवणीतूनच बोलतलव कोणाची फिकीर न करता .... बोला व्हय म्हाराजा.