Sunday, July 26, 2020

आभार

आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी खरच खुप सर्वांचा ऋणी आहे आणि भारावून गेलोय.🙂 माझे अत्यंत आवडते लेखक आणि महाराष्ट्राचे दैवत पु.ल. देशपांडे यांनी असे लिहून ठेवले आहे की माणूस किती श्रीमंत आहे हे त्याच्याकडे असलेल्या धन दौलतीने मोजू नका त्याने कमावलेल्या माणसांनी मोजा असं मानलं तर खरच मी खूप श्रीमंत आहे, की मला अशी प्रेमळ माणसे मिळाली आहेत. आपली पूर्वपुण्याई जबर असल्याशिवाय अशी माणसे भेटणे केवळ अशक्य आहे.माझा पार्ले मित्र परिवार ,माझ्या जुन्या ऑफिसमधले माझे सहकारी, माझ्या बालमोहन शाळेतले माझे मित्र मैत्रिणी,माझ्या कॉलेजचे माझे मित्र मैत्रिणी, माझे नातेवाईक, आप्तेष्ठ ज्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानतो.मी खरच स्वतःला भाग्यवान समजतो.कारण मला सर्व स्तरातले,वयोगटातील मित्र मिळाले मग ते ऐंशीची झुळुक लागलेले किरणे काका असोत व नुकतीच साठी ओलांडलेले शहाणे काका असोत,दादा भिसे असोत वा ज्याना मी आदराने गुरुजी म्हणतो ते आमचे चरण सर असोत.किंवा आज सकाळी सकाळी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला माझ्या इमारतीचा आमचा नेपाळी वाचमन करण बहादूर असो. या माझ्या सर्व मित्रांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. कारण या वर्षी माझ्या वाढदिवसाला दुःखाची दुहेरी किनार होती.पहिली म्हणजे जगात पसरलेला करोना आणि दुसरा केवळ वीस दिवसांपूर्वी माझ्या पार्ले परिवारातील एक उमदा सदस्य अभिषेक भार्गव ज्याला आम्ही प्रेमाने अबू म्हणायचो त्याचे झालेले अकाली निधन.पण तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्यात आणि माझा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहील असा बनवलात.माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

त्रिकोणातला एक कोन

त्रिकोणाच्या नेहमी तीन बाजू असतात अशाच माझ्या माहितीतल्या घाग,मोरे आणि सूर्यवंशी या अभेद्य त्रिकोणाचा एक कोन म्हणजे श्री विश्वनाथ घाग म्हणजे आमचे सर्वांचे लाडके घाग काका यांचे आज दुर्दैवी निधन झाले. तसे हे वर्ष 2020 हे काही सुखद वर्ष नाहीच आहे. एकावर एक धक्के बसत आहेत पण हा धक्का निश्चितच अनपेक्षित होता कारण घाग काका तसे काटक होते,आनंदी होते.मला अजूनही आमच्या वैष्णोदेवी सहलीतले,सर्वांना सांभाळून घेणारे,सगळ्यांची काळजी करणारे,आनंदी घाग काका आठवतात.आपल्या तिन्ही मुलांवर निरतिशय प्रेम करणारे असे आमचे काका.नुकताच त्यांना नातू झाला होता.खूप आनंदात होते ते.
घाग,सूर्यवंशी आणि मोरे हे अद्वैत अगदी जुने. या तिघांची मैत्री चाळीस वर्षांपेक्षाही जुनी असावी.एकाच कार्यालयातले हे तिघे.राहायचे ही एकत्रच. एकाच वडाळा विभागातल्या कार्यालयीन निवासी संकूलात.नंतर निवृत्तीनंतरही नेहमी एकत्रच राहिले. आजही बदलापूरमध्येही हे तिघेही एकाच इमारतीत राहतात. एवढी जुनी मैत्री एवढा जुना ऋणानुबंध.पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हे मात्र खरे.
 घाग,मोरे आणि सूर्यवंशी या अभेद्य त्रिकोणातला एक कोन आज कायमचा भंगला.घाग काका तुम्ही आमच्या मनात तुमच्या चांगल्या आठवणींच्या रुपाने सदैव राहाल.
तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...
We All Miss You....

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विवेकजी

व्यवसायाने सनदी लेखापाल असल्याने सतत आकड्यांच्या खेळात गुंतलेले असतानाही अजिबात रूक्ष न झालेले, स्वभावाने खेळकर, प्रवृत्तीने शिक्षक असलेले आमचे मित्र माननीय विवेक रानडे ज्यांना सर्व त्यांचे मित्र परिवार प्रेमाने रॉनी असे म्हणतात त्यांचा आज वाढदिवस.विवेकजींची आणि माझी मैत्री झाली आमचे एक मित्र श्री गुरुचरणसिंग संधू यांच्यामुळे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले विवेकजी तसेच शिस्तशीर आहेत आणि संघाशी संबंधित असलेला माणूस हा सदैव गंभीर असतो असा एक उगीचच (गैर)समज आहे. असा (गैर)समज कदाचित विवेकजींच्या बाबतीतही असावा; पण या माणसाच्या चेहऱ्यावर सतत एक मिश्किल हसू विलसत असते.बोलता-बोलता कधी समोरची विकेट काढतील सांगता येणार नाही. 2019 मध्ये आम्ही GST कार्यशाळेचे आयोजन केले होते.एक महिन्याची ती कार्यशाळा होती त्याच्यामध्ये काही वर्ग विवेकजींनी  घेतले आणि मीही त्या कार्यशाळेचा एक भाग असल्याने एक शिक्षक म्हणून विवेकजी किती चांगले आहेत याचा मला अनुभव मिळाला आणि आपल्या विषयात त्यांची काय जबरदस्त पकड आहे हे त्यावेळी जाणवलं.GSTसारखा क्लिष्ट विषय त्यांनी अतिशय खेळकरपणे समजावून सांगितला.शिकवीत असताना मध्येच एखाद्याने प्रश्न विचारला तर मात्र त्यांना अजिबात आवडत नसे.त्यांचे म्हणणे असे की मी शिकवून झाले की तुम्ही प्रश्न विचारा किंवा त्यांच्याच वर्गातला एखादा विद्यार्थी दुसऱ्या कोणाला ते शिकवत असताना एखादा भाग समजला नसेल तर सांगत असेल तर तेही त्यांना आवडत नसे आणि त्यांचे म्हणणे रास्त होते.कारण असे परस्पर विद्यादान झालेले त्यांना पटत नसे आणि मग ते रुद्रावतार धारण करीत, पण तोही लोभस असे. माझ्याशी त्यांची मैत्री केवळ  2 वर्षेच जुनी असेल पण ते माझ्याशी मी खूप त्यांचा जुना मित्र असल्यासारखे वागतात.खरेतर मी त्यांच्या वयाने खूप लहान आहे; हाही त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे. तर अशा आमच्या अष्टपैलू,हरहून्नरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

गणेश अण्णा 50

बहुतेकांच्या घराला आढळणाऱ्या हॅपी बुद्धा सारखे सदैव आनंदी असणारे आणि निवांतपणा हा स्थायीभाव असणारेआमचे सर्वांचे लाडके बंधू माननीय श्री गणेश
अण्णा चव्हाण यांनी या वर्षी आपल्या वयाची 50 वर्षे पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.अत्यंत अगत्यशील,सदैव हसरा चेहरा आणि लहानपणापासूनच मोठ्या कुटुंबात राहिल्यामुळे अत्यंत गर्दीप्रिय असे हे व्यक्तिमत्व. माणसांच्या गोतावळ्यात राहायला आवडते म्हणूनच असेल,वेळ मिळाला की आपल्या बहिणींच्या कुटुंबासमवेत नवीन घेतलेल्या गाडीतून भटकंती करायला प्रचंड आवडते .खरेतर गाडी घेऊन त्यांना दोन एक वर्ष झाली असतील पण त्यांनी गाडी पुढच्या दहा वर्षात जेवढे धावेल एवढं दौडवीली आहे यावरून तुम्हाला कल्पना यावी.अण्णाकडे जर कधी जावे तर त्याच्या अगत्याने तुम्हाला गुदमरायला होते.हॉटेलमध्ये काय घेऊन जाईल,काय काय नवीन नवीन खाण्याच्या डिशेस मागवेल.घरच्या जेवणात पण खास बेत ठरलेला. त्यात आमची वहिनीपण सुग्रण आहे मग तर काय विचारायलाच नको.त्यामुळेच कदाचित अण्णाची तब्येत आता त्या हॅपी फेस बुद्धा सारखीच होत चालली आहे.बुद्धीच्या देवतेचे नाव लाभल्याने अत्यंत बुद्धिमान तर आहेतच आणि गोड खाण्याची आवड असल्यामुळे तो गोडपणा बोलण्यातही उतरलाय.आदर्श पती,आदर्श पिता,आदर्श पुत्र आणि आदर्श भाऊ अशा सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलणारे आमचे बंधुराज; चेहर्‍यावरची लकाकी अजून वय तिशीतच थांबलेय असे वाटावे इतकी चांगली. मिशांची ठेवण थेट "भाऊजी" आदेश बांदेकरांसारखी,म्हणून पर्वतीचा आदेश बांदेकर असेही यांना म्हणतात.अश्या ह्या आमच्या सदैव आनंदी आणि गोड स्वभावाच्या भावाला सुवर्णमहोत्सवी जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

द ग्रेट मराठा सरदार

आजच्या दिवसाचे मानकरी आहेत ज्यांचा उल्लेख मी नेहमी "मराठा सरदार" असा करतो ते पार्ले महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.गुरचरणजितसिंग संधू अर्थात सर्वांचे लाडके "चरण सर".एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढण्यात अत्यंत तरबेज असलेले आणि सरदार असल्याने प्रत्येक आघाडीवर विजय मिळवण्याच्या जिद्दीने लढणारा हा लढवय्या. "जसा रोगी तसा इलाज " या कलेत तर ह्या माणसाचा कोणी हाथ पकडू शकत नाही त्यामुळे कोणाला कुठली मात्रा लागू पडेल याचा ह्यांचा अंदाज तर वाखाणण्याजोगा.जन्माने मराठी असलेल्यानांदेखील आश्चर्य वाटेल इतके सुंदर मराठी हा जन्माने मराठी नसलेला माणूस बोलतो.विले पार्ले म्हणजे मुंबईची सांस्कृतिक राजधानी,त्यामुळे इथे सतत काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते ह्यातल्या बहुतेक कार्यक्रमांत खारीचा का होईना वाटा घेऊन कोणत्याही वय्यक्तिक फायदा न बघता केवळ तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असलेला हा सच्चा पार्लेकर.औदुंबराला जेव्हढ्यावेळा फूल येत असेल त्यापेक्षा कमी वेळा ह्यांच्या चेहर्यावर हसू असते बाकी वेळी (उगीचच) गंभीर चेहरा. पण ह्या गंभीर चेहर्याच्या माणसाकडे (फक्त चेहराच गंभीर आहे,बोलता बोलता कधी समोरच्याची फिरकी घेतील याचा नेम नाही) अत्यंत कलासक्त मन आहे.सुप्तावस्थेत असलेली  "WAFS" पुनरुज्जीवित करण्याचे आणि त्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ते जोडण्याचे श्रेय फक्त या माणसाला जाते.त्यासाठी त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न आम्ही पाहिले आहेत.विद्यार्थीदशेत असल्यापासून नृत्य,अभिनय ,राजकारण अशा अनेक क्षेत्रात मनसोक्त मुशाफिरी केलेला,त्यामुळेच आलेल्या अनुभवसंपन्नतेमुळे प्रवृत्तीने स्थिप्रद्न्य असलेला आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने निघालेल्या बाणाप्रमाणे सरळ गतिमान चालीसारख्या सरळ स्वभावाचा ,आयुष्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची झुळूक लागलेला हा आमचा चिरतरुण मित्र..... चरण सर तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.सुरु झालेले २०१८ साल तुम्हाला अत्यंत यशस्वी कारकिर्दीचे जावो ही स्वामीचरणी प्रार्थना......

Happy Birthday Uday Dada

शुभेच्छा.. नमस्कार मंडळी ..... तर आजच्या शुभेच्छांचे मानकरी आहेत L & T रत्न श्री.उदय कुडतरकर ...... (टाळ्या).ह्या माणसाबद्दल काय सांगावे महाराजा. "Live Life King Size" हे जगण्याचे ब्रीदवाक्य असलेले हे महाभाग. खरे तर आपण आजच्या जमान्याचे "लिओनार्दो द विंची " च व्हायचे पण पदरी ( L & T) पडले आणि पवित्र झाले या उक्तीनुसार गेली तीस वर्षे इमाने इतबारे नोकरी केली,अजून करतात . पोलाद कंपनीत कामाला असून देखील (एकेकाळी) पोलादी शरीराच्या ह्या माणसाची कुंचल्यावरची पकड तितकीच नाजूक आणि नज़ाकतभरी आहे. रंगाच्या दुनियेत मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्या उदयजींनी अनेक सुंदर सुंदर चित्रे काढली आहेत.ह्याच्या जोडीला अत्यंत सुंदर गाता गळा ह्यांना लाभलेला आहे. अनेक गाण्याच्या मैफिली गाजवल्या आहेत. तर असे हे "गाणे ,चित्रकला ,छायाचित्रण,प्रवास" असे चांगले तर "अवाढव्य आणि वायफळ खरेदी,दुसऱ्याला उगीचच ज्ञानामृत पाजणे आणि प्रचंड झोप " असे भलते सलते षौक बाळगणारे,एक नुकतीच मिसरूड फुटलेला आणि नेहमी ह्यांच्याशी मान खाली घालून बोलणारा मुलगा (कारण तो ह्यांच्यापेक्षा उंचीने जास्त आहे ),एक निळ्या बटांचे केस असलेली मुलगी आणि मासे व चहा ह्या दोन गोष्टींवर नवऱ्याइतकेच प्रेम असणारी ह्यांची सुविद्य,गृहकृत्यदक्ष पत्नी ह्यांच्यात रमलेले एक बहुआयामी रुबाबदार व्यक्तिमत्व. एकाच वेळी अनेक मोबाईल चार्ज करायची सुविधा असलेला "बहुपिनी " चार्जरच जणू .....पण हा चार्जर स्वतः ला चार्ज करायला त्याच्या कोकणातल्या घरी जेंव्हा सुट्टी मिळेल तेंव्हा रवाना होतो ,तेथील निसर्गाच्या सान्निध्यात रमतो ,मनसोक्त गातो आणि खातो (म्हणून बऱ्याचदा एकटाच जातो )... डोक्यावरची कौले उडायला लागल्यावर विचार आला कोकणात एक कौलारू घर असावे आणि "अद्वैत "निर्मिती झाली. ते आता त्याचे "Most Favourite Destination " बनले आहे . आजूबाजूच्या मालवणी लोकांमध्ये आता चांगली उठबस होऊ लागली आहे .. तिकडच्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहमी बोलवणे असते,स्थानिक मालवणी भाषाही लीलया बोलू शकतो.माझ्या आई वडिलांनी पुरविले नसतील एव्हडे लाड माझ्या ह्या भावाने माझे पुरविले आहेत  .तर अशा या कुडतरकर घराण्याच्या दुसऱ्या पिढीच्या नायकाला माझ्या तर्फे आणि संपूर्ण परब परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. "HAPPY BIRTH DAY UDAY DADA "

एका आर्य पुरुषाची निवृत्ती

एखाद्या ललनेला सहज आकर्षित करू शकेल अश्या रांगड़या पुरुषार्थाची सर्व लक्षणे मिरवणारया आणि अतिशय सुदृढ प्रजनन क्षमतेच्या पुरुषाला आपल्या संस्कृतीमध्ये आर्यपुरुष म्हणून संबोधतात.अश्या पुरुषाकडे अशी काहीतरी दैवी असते की कुठल्यातरी अनामिक ओढीने स्त्रिया चुंबकासारख्या ह्या पुरुषाकडे ओढल्या जातात.अश्याच कासवातल्या आर्यपुरुषाच्या गेल्या महिन्यातल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले.
"डिएगो" नावाचं कासव आपल्या वयाच्या शंभरीमध्ये निवृत्त झाले आणि ही त्याची निवृत्ती सर्वार्थाने गाजली.त्याला एका राष्ट्र वीराच्या सन्मानाने परत त्याच्या मूळ जन्मस्थानी सोडण्यात आले.आता ह्या डिएगोने काय एवढे मोठे कार्य केले ते आपण जाणून घेणे इथे फार महत्त्वाचे ठरते.त्यासाठी आपण आधी ह्या कासवाचा इतिहास जाणून घेऊ.
डिएगोचा जन्म 1920 सालातला एस्पाओला बेट, गॅलपागोस,स्पेन येथला. तेथील नैसर्गिक वातावरणात आपल्या आयुष्याची काही वर्षे आनंदात घालवल्यानंतर नंतर 1940 झाली डिएगो पकडला गेला आणि त्याची रवानगी झाली अमेरिकेतल्या कैलिफ़ोर्निया राज्यातील सॅन डिएगो राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात.तेथे ही स्वारी खूपच चांगली रमली आणि 1970 सालापर्यंत तिथे अत्यंत आनंदात डिएगो जगत होता.कस्तुरीमृगाला ज्याप्रमाणे आपल्या नाभीमध्ये कस्तुरी आहे हे जसे माहिती नसतं तसंच डिएगोलाही आपण कुठल्या कार्यासाठी जन्माला आलोय आणि आपल्याकडे काय आहे याची काहीच कल्पना नव्हती. रोजच्याप्रमाणे खाणे,आपल्या प्राणिसंग्रहालयात जिथे त्याला ठेवलं होतं त्या जागेत मनसोक्त विहार करणे एवढेच त्या बिचारयाला माहित. पण डीएगो खऱ्या अर्थाने प्रकाशात आला तो 1970 साली.त्याचे कारण असे की निसर्गनियमाप्रमाणे आणि मुख्यतः मानवनिर्मित घटनांमुळे अनेक प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हूड आयलँड कासव(प्रजाती:-Chelonoidis hoodensis ) हेही त्यातलेच एक. या कासवांची शिकार मुख्यतः शेळीऐवजी पर्यायी अन्न म्हणून आणि त्याचे मोठे पाठीवरचे कवच यासाठी प्रामुख्याने केली गेली.स्पेन मध्ये प्रामुख्याने विकसित झालेल्या आणि तिथेच वाढत असलेल्या प्रजातीला अनेकांच्या क्षुधाशांतीसाठी प्रामुख्याने वापरले गेले; इतके की शेवटी या प्रजातीची फक्त बाराच कासवे शिल्लक राहिलीत असे तेथील स्थानिक वनअधिकार्यांना जाणवले.या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या कासवाची मान लांब असते आणि पूर्ण वाढ झालेले कासव हे पाच फुटापर्यंतही असू शकते. ही प्रजाती पूर्णतः शाकाहारी आहे.असो!! नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ह्या कासवांच्या प्रजातीकडे वन्य विशेषकांचे लक्ष गेले नसते तरच नवल होते.मग त्यातली काही कासवे ही अमेरिकेतील सांताक्रूझ आयलँड येथील प्रजनन केंद्रात आणली गेली. हेतू हा की तेथे संरक्षित परिस्थितीमध्ये त्यांचे प्रजनन व्हावे आणि त्यांची संख्या वाढावी. तिथे या सर्व कासवांची शारीरिक तपासणी केली गेली पण असे लक्षात आले की तिथे प्रजननयोग्य नरांची संख्या कमी आहे. मग हा शोध पुन्हा सुरू झाला आणि डिएगो वर येऊन थांबला. डिएगोची पूर्णतः शारीरिक तपासणी करण्यात आली.त्याच्या जनुकीय बनावटीचाही अभ्यास केला गेला;त्यावरून असे लक्षात आले की डिएगो हाही हुड आयलंड प्रजातीला कासव आहे आणि प्रजनन योग्यही आहे.मग डिएगोची रवानगी सांताक्रुज़ आयलँड मधील प्रजनन केंद्रात करण्यात आली. ते साल होतं 1970 आणि त्यावेळी डिएगो होता पन्नास वर्षांचा. डिएगोप्रमाणेच आणखी दोन नर कासवे E 5 आणि E 3 यानांही याच कामासाठी प्रजनन केंद्रात आणले गेले.या तिघांनी मिळून आतापर्यंत २५००हून अधिक पिलांना जन्माला घालायचे सत्कर्म केले आहे.यात एकट्या डिएगोचा वाटा 900 पेक्षा अधिक पिलांचा म्हणजे या एकूण प्रजननातील तब्बल ४०% भार या कासवातील आर्यपुरुषोत्तमाने एकट्याने उचलला आहे.या प्रजनन केंद्रातील तज्ञांनी आपली निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्यानुसार डिएगोच्या प्रजातीतील बहुसंख्य माद्यांनी E5 आणि E3 या दोन नरांपेक्षा डिएगोला मिलनासाठी सर्वात जास्त पसंती दिली.याचं कारण E5 आणि E3 दोघेही प्रजनन करणे हे केवळ कार्य समजून ते कार्य करायचे आणि एवढे मिलनोत्सुक नसत.पण डीएगो मात्र मीलनाच्याबाबतीत आक्रमक,बोलका आणि आग्रही असायचा.त्यामुळे अश्या नरोत्तमाकडे माद्या आकर्षिल्या गेल्या यात नवल ते काय?? डिएगोही अपेक्षेपेक्षा जास्तच उत्साही निघाला.अगदी आताआतापर्यंत म्हणजे 2020 सालापर्यंत आपल्यावर सोपवलेले आपल्या प्रजातीच्या वाढीचे काम तो इमानेइतबारे करत होता.हुड आयर्लंड प्रजातीच्या कासवांची संख्या आता व्यवस्थीत वाढली आहे असे लक्षात आल्यावर सांताक्रुज़ आयलँड प्रजनन केंद्रातील अधिकार्‍यांनीही आपल्या प्रजातीच्या पुनरुथ्थानासाठी गेली पन्नास वर्ष झटलेल्या या कासवा मधल्या आर्या पुरुषाला त्याला शोभेल असाच निरोप द्यायचे ठरवले आणि पूर्ण सन्मानाने एखाद्या राष्ट्र वीराच्या मानाने डिएगोला नैसर्गिक वातावरणात परत नेऊन सोडण्यात आले जेणेकरून तो आपले उर्वरित आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात सुखाने,समाधानाने घालवू शकेल.अर्थात तिथे सोडण्याआधी डिएगोची पूर्ण शारीरिक चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली. निवृत्तीच्या वेळी शंभर वर्षाचा असलेला डिएगो शारीरिक चाचणीत सुदृढ आढळला.जर नैसर्गिक वातावरणात डिएगो कोणाकडून काही अपाय झाला नाही तर आणखी पन्नास वर्ष सहज जगू शकेल अशी त्याची शारिरीक तंदुरुस्ती सांगते.अशा या कासवातल्या आर्य पुरुषाला निवृत्तीच्या शुभेच्छा.आजच्या तरुण पिढीच्या फेसबुकी भाषेत बोलायचं तर या दिएगोसाठी एक लाईक तो बनता है.