Saturday, October 1, 2022

अभिष्टचिंतन

प्रिय उदय दादा, 

सप्रेम नमस्कार, 

आज तुझ्यासाठी खास दिवस आहे आणि याप्रसंगी तुला एका अलिखित वैश्विक सत्याची आठवण नक्कीच झाली असावी. माणसाला आपले पहिले प्रेम कधीच विसरता येत नाही आणि ते ज्या क्षणी त्याच्यापासून दूर जाते तो क्षण फार त्रासदायक असतो.आपण कितीही स्थितप्रज्ञतेचा आव आणला तरी मन भरून येते,डोळे झरू लागतात,सगळ्या जुन्या आठवणींची रिळं एकामागून एक मनाच्या पटलावर चालतात.तुझ्यासाठी फारच भावनिक क्षण असेल तो.... नक्कीच!!!
आज तुझे पहिलं प्रेम,तुझी कंपनी,ज्या कंपनीमध्ये ( तुझ्या आजच्या वयाच्या हिशेबाने) जवळजवळ आपलं अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केलंस,त्या "LARSEN & TOUBRO" कंपनीच्या मोठ्या पदावरून तू सेवानिवृत्त होतोयस..
खरंतर सेवानिवृत्ती ही सुद्धा एक नवीन सुरुवात असते.पण प्रत्येकाला असं "पुनःश्च हरी ओम्" करणं जमत नाही.त्या कंपनीशी, तिथल्या माणसांशी ऋणानुबंध जुळलेले असतात.त्या सर्व वातावरणाची सवय जडलेली असते;नव्हे तो आपल्या जीवनशैलीचाच एक भाग झालेला असतो.म्हणून जेंव्हा केंव्हा असा प्रसंग वाट्याला येतो तेंव्हा ते कटू वास्तव स्वीकारणं बऱ्याच जणांना जड जाते.निवृत्तीपश्चात अशी माणसं मग उगीचच कटू आणि कटकटी बनतात.त्यात तू  "L & T"मधील "HEAVY MACHINE SHOP"मध्ये कामाला!!! त्यामुळे आजूबाजूला असलेले रूक्ष धातू आणि विविध वाणाच्या मशीनींच्या सानिध्यात बराच काळ असलेल्या माणसाला त्यांचा गुण लागायची शक्यता असते पण तुझ्या बाबतीत असं काही घडायची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण तुझी रसिक कलाकारवृत्ती आणि तू जोपासलेले छंद.
                        तू एक चांगला गायक आहेस,फार वरच्या दर्जाचा चित्रकार-छायाचित्रकार आहेस,इंग्रजी भाषेवर तुझे प्रभुत्व आहे;या साहेबाच्या भाषेत तू केलेले लिखाण वाचनीय असते.शिवाय तुझ्या मनातला नवीन हळवा कोपरा,तूझे कोकणातले टुमदार घर "अद्वैत" आहेच.त्यामुळे आमच्यासारख्या तुझ्या सुह्रुदांना तू सेवानिवृत्त झाल्यावर काय करणार याची चिंता नाही.
                 आपल्या तारुण्यात तू एक चांगला फलंदाज म्हणूनही लोकप्रिय होतास.आपले जुने घर,मुलुंड(पूर्व)ला असलेल्या जीवन नगर सोसायटीच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये तू लगावलेले षटकार अजूनही लोकांच्या लक्षात आहेत;त्यामुळे या तुझ्या 2ND INNINGमध्येही तू चांगली बॅटिंग करशील याची खात्री आहे.
निरोपाचे भाषण करताना आपल्या घरच्यांचे आणि सुह्रुदांचे आभार मानायचे शास्त्र असते,ते जरूर पाळ.कंपनीत २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कंपनीकडून मिळालेले घड्याळ नक्की घाल आणि जर भावना अनावर झाल्या तर मोकळ्या मनाने अश्रूंना वाट करून दे.तिथे उगीचच स्थितप्रज्ञतेचा आव आणू नकोस.
दादा तू त्या भावनिक पिढीचा प्रतिनिधी आहेस ज्यांनी मिळालेली नोकरी आणि जिच्याशी लग्न झालं त्या छोकरीशी आयुष्यभर इमाने इतबारे निभावलं.अंगावर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलल्या.भाऊ,मित्र,मुलगा,पिता अशी नातीही मनापासून जपली. 
सुचिता वहिनीचे आभार मानायला विसरू नकोस,कारण तुझ्या आजवरच्या गृहस्थाश्रमाच्या प्रवासामध्ये तिची खंबीर साथ तुला होती,आहे आणि या पुढेही असणार आहे.
तुझ्या या सन्मानजनक निवृत्तीबद्दल उदय दादा तुझं अभिष्टचिंतन!!! आणि तुझी आतुरतेने वाट बघणार्या तूझ्या 2ND INNINGसाठी तुला डोंगराएवढा शुभेच्छा!!! 

तुझा लाडका भाऊ 

अमित

Sunday, September 18, 2022

अंतिम क्षण


झाडावरून ओघळणाऱ्या फुलासम
माझा अंतिम क्षण असावा
हे जग सोडून जात असताना
कसलाही आवाज न व्हावा

अमित अशोक परब 


सध्या पितृपंधरवडा चालू आहे आणि माझ्या वडिलांचा आज दिवस आहे. त्यानिमित्ताने सुचलेली ही चारोळी.👆
माझ्या वडिलांची शिकवण,त्यांचं प्रेम आणि इतरही अनेक 
त्यांच्या चांगल्या गोष्टी जश्या आयुष्यभर माझ्या लक्षात राहतील तसाच कायम स्मरणात राहील त्यांचा अंतिम क्षण!!!! कारण तो झाडावरून ओघळणाऱ्या फुलासारखा होता.
झाडावरून जेव्हा एखादं फुल ओघळतं तेव्हा त्याचा कसलाही आवाज होत नाही आणि त्यामुळे ते ओघळल्याचे समजतही नाही.तसंच काहीसं झालं.
पप्पांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हतं.तरुण वयात अंगमेहनतीची काम केल्यामुळे आणि व्यायामाची मुळातच आवड असल्यामुळे वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांची प्रकृती वर्धिष्णू होती. पण २४ मे २०१८चा तो दिवस आणि तो क्षण चुकला नाही.कसल्याही मोठ्या आजारपणाचा सामना करावा लागला नाही वा अंथरुणात पडून राहावं लागलं नाही.स्वतःला आणि दुसऱ्यालाही नकोसं असणारे म्हातारपण त्यांच्या नशिबात आलं नाही.शांतपणे झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.असा अंतिम क्षण ज्याच्या नशिबात त्याला पुण्यवान माणूस असं म्हणतात.आज हे सगळे विचार मनात डोकावत असताना क्षणभर वाटून गेलं माझ्याही नशिबात असा अंतिम क्षण असेल काय?बहुदा नसावा!! कारण तेवढं पुण्यही गाठीशी असावं लागतं.........😔



Thursday, August 12, 2021

अण्णा पन्नाशी

मी माझ्या आई-वडिलांचा एकुलता एक!!! मला सख्खे भावंडं नाही.पण मला माझ्या नात्यातल्या भावंडांचे खूप प्रेम लाभले आहे.त्या बाबतीत मी खूपच भाग्यवान आहे.त्यातही माझ्या सख्ख्या आत्येभावांचे म्हणजे तीनही कुडतरकर बंधूंचे प्रेम मला जरा जास्तच लाभले आहे.माझे सख्खे भाऊ वाटावेत असे हे तिघे. याच माझ्या तीन भावांपैकी सर्वात धाकट्या पातीचा म्हणजे माझ्या अजित अण्णाचा आज सुवर्ण महोत्सवी अर्थात ५०वा वाढदिवस.
मी त्याला "अण्णा" अशी हाक का आणि कधी मारायला लागलो मलाच माहीत नाही. (पुढे जाऊन तो दक्षिण भारताचा जावई होणार आहे असं मला कुठेतरी दिसलं असावं म्हणून असेल कदाचित!!! दक्षिण भारतीय लोक मोठ्या भावाला "अण्णा" म्हणतात म्हणून मी त्यालाही अण्णा म्हणायला सुरुवात केली असावी.) खरं तर त्याला अण्णा म्हटलेलं अजिबात आवडायचं नाही.तो नेहमी मला दरडावून सांगायचा "ए मला अजित म्हण!! "अण्णा" म्हणून हाक मारू नकोस!!!" मग मी पण मुद्दाम तो चारचौघात विशेषतः त्याच्या खास मित्रांच्या गोतावळ्यात असला की त्याला चिडवायला लांबून त्याला "अण्णा" म्हणून हाक मारायचो. सुट्टी पडली की मामाच्या गावाला जाऊया असे आपल्या लहानपणी म्हणायचे माझ्या बालपणीतल्या बहुतेक सुट्ट्या ह्या मुलुंडला माझ्या आत्याच्या घरी जीवन नगर सोसायटीत गेल्यात. माझा सर्वात मोठा दादा उदय माझे सर्व लाड पुरवायचा.दोन नंबरचा भाऊ ऋतुराज माझी खूप काळजी घ्यायचा.पण अण्णा माझा यार होता. खेळातला सवंगडी होता.त्याचे कितीतरी क्रिकेटचे सामने मी केवळ प्रेक्षक म्हणून बघायला जायचो.त्याची गोलंदाजी इतकी भन्नाट होती की त्याच्या गोलंदाजीला त्याच्या एरियातले तत्कालीन भले भले फलंदाज घाबरायचे.भन्नाट वेगाने चेंडू टाकणारा सहा फूट उंच माझा अण्णा पाहणे म्हणजे एक पर्वणी असायची आणि आपल्या पहिल्याच षटकात समोरच्या संघातला गडी बाद करण्यात त्याचा हातखंडा होता.त्या क्षेत्रात पुढे गेला असता तर तो खरंच एक नावाजलेला गोलंदाज झाला असता यात काही शंकाच नव्हती.पण त्याने वेगळे क्षेत्र निवडले.त्यातही आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर तो आज खूप मोठ्या पदावर आहे.
त्याचा जन्म १३ तारखेचा!! तेरा ही अशुभ तारीख समजली जाते. पण आपल्या कर्तृत्वाने अण्णाने ही तारीख किती शुभ असू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे.तीन भावंडांत तो सर्वात धाकटा!!! पण या तिन्ही भावंडांमध्ये बऱ्याच बाबतीत त्याने पहिला नंबर लावला आहे. मुंबईच्या बाहेर नोकरी करायला गेलेला या तीन भावांतला तो पहिला.नोकरीनिमित्ताने परदेशवारी करणाराही पहिला तोच आणि या तीन भावंडांपैकी चार चाकी गाडी घेणाराही तोच पहिला.
असं म्हणतात की नशीब हे कर्तुत्ववान माणसालाच नेहमी साथ देते.आयुष्यभराचं जोडीदार हा चांगला मिळणे हा सुद्धा एक नशिबाचाच भाग असतो.त्याबाबतीत अण्णा खरंच नशीबवान आहे की दिव्या वहिनीसारखी साक्षात लक्ष्मी त्याच्या आयुष्यात आली.आता त्यांच्या आयुष्यात "अध्यन"चाही प्रवेश झाला आहे.अण्णाच्या मुळच्या भ्रमरवृत्तीमुळे,मनस्वी स्वभावामुळे त्याचे कसे होणार??? अशी त्याच्या आईला म्हणजे माझ्या सुहासिनी(मंदा)आत्याला नेहमी काळजी असायची.त्याच आमच्या अण्णाला आज एक उच्चपदस्थ अधिकारी ,उत्तम गृहस्थ, एक अतिशय चांगला पिता आणि प्रेमळ नवरा अश्या विविध भूमिकांमध्ये सहज वावरताना बघून आत्याला खूप आनंद झाला असता.
असा माझा अण्णा आज त्याच्या आयुष्यातले सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.त्याबद्दल त्याला अनेक शुभेच्छा.......
Happy Birthday अण्णा!!!


Sunday, April 4, 2021

एकमेकांचे व्हा कायमचे!!!

ह्या दोघांची छोट्या पडद्यावरची chemistry अफलातून होती.परवा एका पुरस्कार सोहळ्यासाठी दोघे एकत्र अवतरले.खरे तर त्यांची अतिशय गाजलेली मालिका केंव्हाच संपली होती.या सोहळ्यात तर त्यांना नामांकनही नव्हते.पण सर्व आलेल्या आमंत्रितांपेक्षा हे दोघेच जास्ती "छाये हूवे" थे.
social media वर तर ह्यांच्या ह्या नव्या look ची, त्यांच्या एकत्र असण्याची बेफाट चर्चा चालू होती कारण होते तिने आपल्या Instagram account वर share केलेला त्या दोघांचा एक video.या सोहळ्यादरम्यान झालेल्या मुलाखतीत दोघेही एकमेकांबद्दल,त्यांना या मालिकेनिमित्ताने आलेल्या अनुभवांबद्दल भरभरून बोलले.दोघांच्या मैत्रीबद्दल विचारले असता त्याने त्याच्या नेहमीच्या सरळ आणि रांगड़या स्वभावाला अनुसरून "ही मैत्री आयुष्यभर अशीच राहील" असे सांगून टाकले.तिनेही सावधपणे का होईना पण त्याला हसत हसत "मम" म्हटले.पण तिनेच आपल्या"Instagram"वरच्या एका चित्राला दिलेल्या caption चाच वापर करून म्हणायचे तर "मुस्कुराते चेहरे,राज गेहेरे".
ही मालिका आता काही दिवसांपूर्वी मी पुन्हा एकदा ZEE5 APPवर बघितली.सलग नाही; पण "राणा-अंजली"चे काही निवडक प्रसंग म्हणा, एखादा Track आवडला म्हणून बघितला असे झाले. "दैनंदिन मालिका म्हणजे सिताफळ खाण्यासारखे असते. किती ही सांभाळून खायचे म्हटले तरी बरबट ही होतेच"- इति महान नट ॠषिकेश जोशी.
ह्या मालिकेचीही बरबट तर झालीच पण ही मालिका खूपच लोकप्रियही झाली.हे दोघे तर एव्हढे आपल्या भूमिकांमध्ये विरघळून गेले होते;जणू काही ही भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली होती.पुढे पुढे तर हे दोघे अभिनय करतायत की खरंच एकमेकांच्या प्रेमात आहेत असे वाटावे इतकं या दोघांचे tunning जमलेले वाटत होते.दोघांची व्यक्तिमत्वेही त्या भूमिकेला पूरक होती.अगदी आदर्श जोडपे वाटावे अशी.त्यामुळेच की काय या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांची साथ द्यावी असेच या दोघांवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना वाटले तर त्यात नवल ते काय?? आपण प्रेक्षक खूपच भाबडे असतो.नको नको म्हणत असताना पण एखाद्या मालिकेमध्ये, त्या व्यक्तिरेखांमध्ये गुंतत जातो मग हे असे होते.पण सगळेच प्रेक्षक काय भाबडे नसतात त्याना या व्यक्तिरेखांच्या अभिनयापलीकडचेही काही दिसत असतं.कारण दैनंदिन मालिकेमध्ये अशा अनेक जोड्या असतात. हजार हजार भाग करतात पण त्यांच्यामधले tunning, त्यांच्यामधली chemishtry पडद्यावर औषधालाही आढळून येत नाही. केवळ एखाद्याच्या बाबतीतच असे होते आणि त्यांच्याबाबतीत जेंव्हा प्रेक्षक असे म्हणू लागतात की या दोघांनी वैयक्तिक आयुष्यातही असेच एकत्र रहावे ही या जोडीवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.
अर्थात हे दोघेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल निर्णय घेणारे आपण कोण??? पण हे दोघे एकमेकांना शोभतात, पुरक वाटतात एवढे मात्र नक्की.
एक भाबडा प्रेक्षक म्हणून एवढे मात्र वाटते या दोघांनी त्यांच्या पडद्यामागील वैय्यक्तीक आयुष्यातही सदैव एकत्र राहावे....कायमचे...
#RanaDaAnjaliBaai
#HardeekAkshaya
#togetherforever
#BestCoupleInWorld

Friday, February 12, 2021

वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कल्पवृक्ष म्हणून एक काल्पनिक संकल्पना आहे हा कल्पवृक्ष म्हणजे असा एक वृक्ष असतो की त्याच्या पुढे उभे राहून कोणी काही मागितले तर त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि हा कल्पवृक्ष नेहमी आपल्या प्रेमाची, वात्सल्याची सावली आपल्या आश्रयास आलेल्या लोकांवर धरत असतो. गावडे घराण्याचा असाच एक वात्सल्यमूर्ती कल्पवृक्ष आज कायमचा कोमेजला!!!
गावडे घराणातल्या वरिष्ठ फळीमधली आम्हा सर्वांची लाडकी जयश्री आजी ,आमच्या विजय मामाची आई, सर्वाची लाडकी काकीचे आज निधन झाले.वात्सल्याचे कुठलं रूप असे जर आपण मनामध्ये त्याचं चित्र काढलं तर ते बहुतेक आमच्या आजीच्या रूपातच असावं.आपल्या वात्सल्यपूर्ण  प्रेमाची छाया तिने संपूर्ण कुटुंबावर गेली साठ वर्षे धरली होती. एक आदर्श गृहिणी तर होतीच पण त्याबरोबर ती एक आदर्श शिक्षिका ही होती. आदर्श शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका म्हणून एका प्रतिष्ठित शाळेतून निवृत्त झाल्यानंतर वानप्रस्थाश्रमही तिने खूप चांगल्या प्रकारे जगला असंच म्हणावे लागेल.सुगरण तर इतक्या वरच्या दर्जाची होती की तिने जेवताना वाढलेले पाणी ही चविष्ट लागायचे. तिच्या घरी गेल्यावर जेवणाचा आग्रह तो नेहमीचाच. तिच्या हातच्या जेवणाने पोट भरून जायचे पण मन भरायचे नाही. हस्ताक्षर तर एखाद्या छापील अक्षरापेक्षा सुंदर आणि रेखीव होते( तिच्या लाडक्या नातवामध्ये म्हणजेच देवाशिष मध्ये हा गुण अगदी अचूक उतरला आहे).
गावडे कुटुंबाच्या सुखात आणि दुःखात या कल्पवृक्षाची वात्सल्यपूर्ण सावली नेहमीच असायची. कुटुंबाच्या प्रत्येक समारंभात तर तिची हजेरी हे विशेष आकर्षण असायचे.अतिशय साधी पण आकर्षक वेशभूषा करून एखाद्या गर्भश्रीमंत संस्थानच्या महाराणीसारखी दिसणारी; पहिल्या रांगेत बसून शांतपणे सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेत बसलेली काकी आजी यापुढे दिसणार नाही याची चुटपुट यापुढे कायमची सगळ्यांना लागेल. अगदी आताआतापर्यंत तिला एवढा मोठे आजारपण आले असतानादेखील आपल्या नातवाच्या म्हणजे माझा चुलत मामेभाऊ विनितच्या लग्नात तिची हजेरी होती. या वात्सल्यमूर्तीने किती जणांना सांभाळले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले त्याची गणतीच नाही. त्यात सख्खे रक्ताचे तर होतेच पण सख्खे नसलेले जास्त होते. आजीने सर्वांना प्रेम, आपुलकी दिली. कधी कोणाकडून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळेच तिचा प्रेमाचा गोतावळा एव्हढा मोठा आहे जो तिला या आयुष्यात तरी कधी विसरू शकत नाही. या दुष्ट आजारामुळे तीचे शेवटचे काही दिवस खूप कठीण गेले होते. गेले दोन दिवस तर ती अतिशय शांत झाली होती. समाधानी होती. कारण तिला कळलं होतं.असं कळणं आणि वास्तव स्वीकारणे फारच कमी लोकांना जमतं.जगाचा निरोपही तिने त्याच शांतपणे झोपेतच घेतला. कोणालाही त्रास न होऊ देता!!! आजी आज जरी तु आमच्यात नसलीस तरी तुझ्या आठवणींच्या रूपाने तू सदैव आमच्या मध्येच आहेस.....

Saturday, October 31, 2020

"अलविदा सर शाॅन"

बॉंडपटाच्या इतिहासातला सर्वप्रथम बॉण्ड आज काळाच्या पडद्याआड गेला....
"सर शॉन कॉनरी" या स्कॉटीश अभिनेत्याचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झालं. "ईयान फ्लेमींग" या ब्रिटिश लेखकाने "MI6" या खर्‍याखुर्‍या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेतील हे "जेम्स बॉण्ड 007" नावाचे काल्पनिक पात्र निर्मिले.हा नायक रांगडा होता, तितकाच तो रोमँटिक होता,दिसायला देखणा, उंचापुरा, बोलायला चतुर आणि पिस्तूल चालवण्यात वाकबगार असा होता.शॉन कॉनरीच्या व्यक्तिमत्त्वात हे सारे गुण बॉंडपटाच्या निर्मात्यांना ठळकपणे दिसून आले आणि तो अजरामर व्यक्तिरेखेचा पहिला मानकरी बनला. त्याने एकूण सात चित्रपटात बॉंड साकारला.एवढी अमीट छाप त्या भूमिकेवर सोडणे त्याच्यानंतर ही भुमिका साकारणारया  दुसर्या  कुठल्याही अभिनेत्याला जमले नाही.पण म्हणून बॉण्ड साकारणारा अभिनेता या चाकोरीत अडकवणे हे शॉन कॉनरीचा अपमान ठरेल. "हंट फोर रेड ऑक्टोबर" यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले.अत्यंत गाजलेल्या "अनटचेबल्स" या ब्रायन डी पाल्मा दिग्दर्शित  माफियापटात त्याने साकारलेला पोलीस ऑफीसर जिमी मलोन कमालीचा प्रभावी होता.अभिनेत्यांचा अभिनेता असे ज्याचे वर्णन केले जाते असा "रॉबर्ट डी निरो",तत्कालीन हॉलीवूड सुपरस्टार "केविन कॉस्टनर",आपल्या सहज अभिनयासाठी  प्रसिध्द असलेला "अँडी गर्सिया" अश्या तगड्या अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असून देखील कॉनरीने आपल्या भूमिकेसाठी त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचे ऑस्कर पटकावले हा एव्हढा पुरावा तो किती चांगला अभिनेता होता हे सांगायला पुरेसा ठरतो.ऑस्कर मिळवणारा तो पहिला(आणि एकमेव) "बॉण्ड" ठरला आणि त्याचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे." इंडियना जोन्स अँड द लास्ट कृसेड"  चित्रपटातली नायकाच्या पित्याची भूमिकाही विशेष गाजली. "फाईंडिंग फोरेस्टर" या गस वॅन सांट दिग्दर्शित चित्रपटातील त्याची "विल्यम फॉरेस्टर" या विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकाची भूमिकाही मला फार आवडली होती.2000 साली त्याला "सर" या पदवीने सन्मानित करण्यात आले.आपण स्कॉटीश असण्याचा कमालीचा अभिमान त्याला होता.आणि "बॉंड" च्या व्यक्तिरेखेला कोणी न्याय देऊ शकेल तर तो केवळ एखादा स्कॉटीश ,आयरिश अथवा ब्रिटिश अभिनेताच देऊ शकेल;अमेरीकन किंवा अन्य कोणी त्याला न्याय देऊ शकणार नाही असे तो जाहीरपणे सांगायचा.त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली कारण त्याच्यानंतर बॉंड साकारणारे "रॉजर मूर","तिमोथी दाल्तन", "डैनिएल क्रेग" हे ब्रिटिश अभिनेते तर "पियर्स ब्रॉस्सनान" हा आयरिश अभिनेता कमालीचे लोकप्रिय ठरले तर "जॉर्ज लेसेंबी" या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याला प्रेक्षकानी नाकारले ही वस्तुस्थिती आहे. अशा या हरहुन्नरी आणि "जेम्स बॉण्ड" या सर्वमान्य लोकप्रिय अशा गुप्तहेराच्या व्यक्तिमत्वाला पुरेपूर न्याय देणाऱ्या या नटश्रेष्ठाला भावपूर्ण श्रद्धांजली.

Saturday, October 10, 2020

महानायक ७८

सरस्वतीमातेचा वरदहस्त असलेल्या एका बहुश्रुत कुटुंबातून आलेला तरुण अभिनय क्षेत्राची वेगळी वाट निवडतो.अनेकदा पडतो.पण चालत राहतो कधी त्याच्या उंचीवरून कधी त्याचा सामान्य चेहरा पाहून त्याला अनेकांकडून अवहेलना सहन करायला लागते.निराशा होते, एकांतात रडणे होते.ही वाट सोडून द्यावी असे ही वाटते.पण त्याचे कलासक्त माता पिता त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात.एक छोटीशी भूमिका मिळते.सुनिल दत्तच्या मुक्या भावाची. चित्रपट "रेश्मा और शेरा".वाटचाल सुरु होते. "सात हिन्दूस्थानी" मधला सैनिक सगळ्याना भावतो.हा लंबी रेस का घोडा आहे हे जाणवते पण हा सगळ्या समकालीन पुरुष नटांची छुट्टी करून टाकणार आहे हे कोणाला जाणवत नाही;कारण याचे समकालीन नट एक से बढकर एक होते.देखणा विनोद खन्ना,जंपींग जैक जितेंद्र,सुपरस्टार राजेश खन्ना,राजस शशी कपूर,अभिनय सम्राट संजीव कुमार,ही मैन धर्मेंद्र यांच्या खिजगणतीत ही हा नव्हता.तो काही विनोद खन्ना किंवा राजेश खन्ना सारखा देखणा नव्हता,शशी कपूर सारखा राजबिंडा नव्हता.धर्मेन्द्रसारखा रांगडा नव्हता की जितेन्द्र सारखा नृत्य निपुण नव्हता.सुरुवातीच्या काही चित्रपटांत तर अभिनय ही ठिक ठाक होता.पण असे काय होते याच्याकडे ते की त्याच्या जोरावर तो या सर्व त्याच्या समकालीनांना मात देऊन त्यांच्या दशांगुळे वर राहिला.तो होता प्रचंड आत्मविश्वास अन् सतत आपल्या चुकांतून शिकण्याची वृत्ती.याच जोरावर तो आज वयाची सत्यात्तरी उलटली तरी या अभिनयाच्या क्षेत्रात टिकून आहे नव्हे त्याच्यावर राज्य करतोय.ज्याला त्याच्या एका चित्रपटात मुक्याची भुमिका करावी लागली होती.आज त्याचा आवाज ही त्याची USP आहे.त्याच्यासारखा आवाज काढून आज कितितरी नकलाकार आपले पोट भरतायत.सुरुवातीला ठिक ठाक असलेले अभिनयाचे नाणे त्याने प्रचंड मेहनतीने आणि नेहमी सतत शिकत रहाण्याच्या वृत्तीच्या अर्काने घासून लखलखते ठेवलय.म्हणून तर ते अजून खणखणीत वाजतेय.किती वेगवगळ्या भुमिका निभावल्यात चटकन आठवायला गेले तर "चुपके चुपके"मधला सरळ साधा प्रोफेसर सुकुमार सिन्हा,"अभिमान" मधला गायक सुबीर कुमार अश्या अनेक....हे झाले सहज सुंदर अभिनयाबाबत पण हाणामारीच्या चित्रपटांत ही कमालीची मास्टरी.काय होते हयाच्याकडे..ना धर्मेंद्र सारखे कमावलले शरीर होते ना विनोद खन्ना सारखा रांगडेपणा. साधी किडकिडित शरीरयष्टी.पण जे आपल्याकडे नाही ते आपल्याकडे जे आहे त्यांचा वापर करून सादर करणे म्हणजे अभिनय हे त्याने जाणले आणि नसलेल्या गोष्टींची सर त्याने त्याच्याकडे असलेल्या गोष्टींनी भरून काढली ती म्हणजे उत्तम अभिनय,भारदस्त आवाज आणि भेदक डोळे.याच जोरावर तो चित्रपटसृष्टीतला अभिनयाचा शेहेनशाह बनला.मला तर त्याच्या अभिनयातल्या अनेक लखलखीत तुकड्यांमधले काही तुकडे आठवतात."दिवार" मधला तो हॉटेल मधला प्रसंग!! परवीन बाबी त्याची कंपनी मिळावी म्हणून त्याच्याशी लगट करते.तेंव्हा "किसको मरना है!! जो आज मेरे साथ होगा!!" हे तो ज्या पद्धतीने म्हणतो. एका क्षणात एका आपल्या मस्तीत जगणारया,मरणाचीपण परवा नसलेल्या माणसाची व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.त्यानंतर हॉटेल मधून त्याच्या गाडीपर्यंत त्याचा walk.....या त्याच्या नुसत्या रुबाबदार,बेफिकीर चालीसाठी मी दीवार कितितरी वेळा बघितलाय.अग्नीपथ चित्रपटातील त्याच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रसंग...गुंडांच्या अड्ड्यावर तो बहिणीला वाचवायला शिरतो. चिखलात माखलेल्या,अंगावरची वस्त्रे काही ठिकाणी फाटलेल्या,असहाय बहिणीला पाहून डोळ्यांत अंगार फुललेला पण त्याचवेळी ज्याने त्याच्या बहिणीचे अपहरण केले त्याच्याकडे पाहून रागमिश्रित तुच्छतापूर्वक हास्य त्याच्या चेहर्यावर उमटते.माझ्या अंगावर काटा उभा राहिला त्याचा अविर्भाव बघून.उगीच नाही या भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.तो खरोखरच त्यासाठी पात्र होता.आतापर्यंत 4 वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेय.त्यातली 3 तर वयाची साठी ओलांडल्यानंतर.आज ही वयाच्या 8व्या दशकाची झुळुक लागलीय तरी तोच उत्साह आहे.आज ही दिवसांतले पंधरा पंधरा तास काम चालू आहे.त्याचे सर्व समकालीन आता मोडीत निघाले पण तो आज ही आपला आब राखून आहे.आयुष्यात अनेक लढाया जिंकून,हरून झाल्यात.मग त्या राजकिय कारकीर्दीबाबतीत असो वा वैयक्तीक आयुष्याबाबतीत असो वा तब्येतीच्या बाबतीत असो.नुकतीच करोनाविरुद्धची लढाई जिंकून झालीय.आज ही कामाच्या प्रति तीच निष्ठा आहे.प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी "खाकी" चित्रपटाच्या वेळची नमूद केलेली आठवण खूप बोलकी आहे.एखादा सीन त्याला दिला की हा माणूस एखाद्या नवशिक्याप्रमाणे तो सीन समजून घ्यायचा आणि हा आपल्या आयुष्यातला पहिलाच सिन आहे असं समजून त्या तडफ़ेने तो सिन करायचा. ह्याला म्हणतात कामावर असलेली निष्ठा.वेळेच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे.मला एक प्रसंग आठवतो.अंधेरीत एका कार्यक्रमाची वेळ होती सकाळी 9 ची. तो येणार होता.पण एव्ह्ढा मोठा माणूस तो कशाला वेळेत येयील असे समजून संयोजक मंडळी गफिल होती.तो बरोबर 9 च्या ठोक्याला हजर झाला.संयोजक मंडळी चाट.रात्रभर एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून तो आला होता. पण चेहर्यावर थकावटीचा लवलेश नव्हता.गोंधळलेल्या संयोजक मंडळींवर अजिबात न चिडता थांबला. नियोजित कार्यक्रम आटपून स्वारी रवाना झाली.त्याच्या आगमनानंतर ते आतापर्यंत चित्रपट सृष्टी खूप बदलली फोफावली,वाढली.तंत्र बदलले. नव्या विचाराचे, ताज्या दमाचे लोक आले.तो पण या सर्वात अत्यंत सहजपणे सामावून गेला. याचा कारण त्याने काळानुरूप स्वतःला बदललं .म्हणूनच तर आजही नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला तो उत्सुक असतो आणि नवे दिग्दर्शकही त्याच्याबरोबर काम करणं हा एक सन्मान समजतात. नुकताच त्याचा "गुलाबो सीताबो" हा सुजीत सरकार या ताज्या दमाच्या दिग्दर्शकाबरोबरचा चित्रपट पाहिला. एका 90 वर्षाच्या कवडीचुंबक म्हाताऱ्याची व्यक्तिरेखा एवढं अप्रतिम वठवलीय की त्याला तोड नाही. त्या 90 वर्षाच्या म्हातारयाचे पोक काढून चालणे, त्याच्या आवाजात वयपरत्वे आलेला कंप, त्याचा कवडीचुंबकपणा हे सगळे एवढे अप्रतिम ह्या माणसाने दाखवलं की खरंच आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या देशात "अमिताभ बच्चन" नावाचा महानायक जन्माला आला आहे. आपण खूपदा हॉलीवुडमधल्या कलाकारांचे गोडवे गातो उदाहरणार्थ जॅक नीकोलसन, रॉबर्ट डी निरो,अल पचिनो वैगेरे. मलाही हे कलाकार आवडतात.रॉबर्ट डी निरो तर माझा खूप आवडता अभिनेता आहे.पण मला अमिताभ या कलाकारांपेक्षा कुठेही कमी नाही उलट काकणभर सरसच वाटतो.अशा या महानायकाचा आज वाढदिवस.

बच्चन साहेबाना उदंड आयुष्य लाभो हीच याप्रसंगी एक त्यांचा चाहता म्हणून प्रार्थना.