Sunday, July 26, 2020

एका आर्य पुरुषाची निवृत्ती

एखाद्या ललनेला सहज आकर्षित करू शकेल अश्या रांगड़या पुरुषार्थाची सर्व लक्षणे मिरवणारया आणि अतिशय सुदृढ प्रजनन क्षमतेच्या पुरुषाला आपल्या संस्कृतीमध्ये आर्यपुरुष म्हणून संबोधतात.अश्या पुरुषाकडे अशी काहीतरी दैवी असते की कुठल्यातरी अनामिक ओढीने स्त्रिया चुंबकासारख्या ह्या पुरुषाकडे ओढल्या जातात.अश्याच कासवातल्या आर्यपुरुषाच्या गेल्या महिन्यातल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले.
"डिएगो" नावाचं कासव आपल्या वयाच्या शंभरीमध्ये निवृत्त झाले आणि ही त्याची निवृत्ती सर्वार्थाने गाजली.त्याला एका राष्ट्र वीराच्या सन्मानाने परत त्याच्या मूळ जन्मस्थानी सोडण्यात आले.आता ह्या डिएगोने काय एवढे मोठे कार्य केले ते आपण जाणून घेणे इथे फार महत्त्वाचे ठरते.त्यासाठी आपण आधी ह्या कासवाचा इतिहास जाणून घेऊ.
डिएगोचा जन्म 1920 सालातला एस्पाओला बेट, गॅलपागोस,स्पेन येथला. तेथील नैसर्गिक वातावरणात आपल्या आयुष्याची काही वर्षे आनंदात घालवल्यानंतर नंतर 1940 झाली डिएगो पकडला गेला आणि त्याची रवानगी झाली अमेरिकेतल्या कैलिफ़ोर्निया राज्यातील सॅन डिएगो राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात.तेथे ही स्वारी खूपच चांगली रमली आणि 1970 सालापर्यंत तिथे अत्यंत आनंदात डिएगो जगत होता.कस्तुरीमृगाला ज्याप्रमाणे आपल्या नाभीमध्ये कस्तुरी आहे हे जसे माहिती नसतं तसंच डिएगोलाही आपण कुठल्या कार्यासाठी जन्माला आलोय आणि आपल्याकडे काय आहे याची काहीच कल्पना नव्हती. रोजच्याप्रमाणे खाणे,आपल्या प्राणिसंग्रहालयात जिथे त्याला ठेवलं होतं त्या जागेत मनसोक्त विहार करणे एवढेच त्या बिचारयाला माहित. पण डीएगो खऱ्या अर्थाने प्रकाशात आला तो 1970 साली.त्याचे कारण असे की निसर्गनियमाप्रमाणे आणि मुख्यतः मानवनिर्मित घटनांमुळे अनेक प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हूड आयलँड कासव(प्रजाती:-Chelonoidis hoodensis ) हेही त्यातलेच एक. या कासवांची शिकार मुख्यतः शेळीऐवजी पर्यायी अन्न म्हणून आणि त्याचे मोठे पाठीवरचे कवच यासाठी प्रामुख्याने केली गेली.स्पेन मध्ये प्रामुख्याने विकसित झालेल्या आणि तिथेच वाढत असलेल्या प्रजातीला अनेकांच्या क्षुधाशांतीसाठी प्रामुख्याने वापरले गेले; इतके की शेवटी या प्रजातीची फक्त बाराच कासवे शिल्लक राहिलीत असे तेथील स्थानिक वनअधिकार्यांना जाणवले.या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या कासवाची मान लांब असते आणि पूर्ण वाढ झालेले कासव हे पाच फुटापर्यंतही असू शकते. ही प्रजाती पूर्णतः शाकाहारी आहे.असो!! नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ह्या कासवांच्या प्रजातीकडे वन्य विशेषकांचे लक्ष गेले नसते तरच नवल होते.मग त्यातली काही कासवे ही अमेरिकेतील सांताक्रूझ आयलँड येथील प्रजनन केंद्रात आणली गेली. हेतू हा की तेथे संरक्षित परिस्थितीमध्ये त्यांचे प्रजनन व्हावे आणि त्यांची संख्या वाढावी. तिथे या सर्व कासवांची शारीरिक तपासणी केली गेली पण असे लक्षात आले की तिथे प्रजननयोग्य नरांची संख्या कमी आहे. मग हा शोध पुन्हा सुरू झाला आणि डिएगो वर येऊन थांबला. डिएगोची पूर्णतः शारीरिक तपासणी करण्यात आली.त्याच्या जनुकीय बनावटीचाही अभ्यास केला गेला;त्यावरून असे लक्षात आले की डिएगो हाही हुड आयलंड प्रजातीला कासव आहे आणि प्रजनन योग्यही आहे.मग डिएगोची रवानगी सांताक्रुज़ आयलँड मधील प्रजनन केंद्रात करण्यात आली. ते साल होतं 1970 आणि त्यावेळी डिएगो होता पन्नास वर्षांचा. डिएगोप्रमाणेच आणखी दोन नर कासवे E 5 आणि E 3 यानांही याच कामासाठी प्रजनन केंद्रात आणले गेले.या तिघांनी मिळून आतापर्यंत २५००हून अधिक पिलांना जन्माला घालायचे सत्कर्म केले आहे.यात एकट्या डिएगोचा वाटा 900 पेक्षा अधिक पिलांचा म्हणजे या एकूण प्रजननातील तब्बल ४०% भार या कासवातील आर्यपुरुषोत्तमाने एकट्याने उचलला आहे.या प्रजनन केंद्रातील तज्ञांनी आपली निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्यानुसार डिएगोच्या प्रजातीतील बहुसंख्य माद्यांनी E5 आणि E3 या दोन नरांपेक्षा डिएगोला मिलनासाठी सर्वात जास्त पसंती दिली.याचं कारण E5 आणि E3 दोघेही प्रजनन करणे हे केवळ कार्य समजून ते कार्य करायचे आणि एवढे मिलनोत्सुक नसत.पण डीएगो मात्र मीलनाच्याबाबतीत आक्रमक,बोलका आणि आग्रही असायचा.त्यामुळे अश्या नरोत्तमाकडे माद्या आकर्षिल्या गेल्या यात नवल ते काय?? डिएगोही अपेक्षेपेक्षा जास्तच उत्साही निघाला.अगदी आताआतापर्यंत म्हणजे 2020 सालापर्यंत आपल्यावर सोपवलेले आपल्या प्रजातीच्या वाढीचे काम तो इमानेइतबारे करत होता.हुड आयर्लंड प्रजातीच्या कासवांची संख्या आता व्यवस्थीत वाढली आहे असे लक्षात आल्यावर सांताक्रुज़ आयलँड प्रजनन केंद्रातील अधिकार्‍यांनीही आपल्या प्रजातीच्या पुनरुथ्थानासाठी गेली पन्नास वर्ष झटलेल्या या कासवा मधल्या आर्या पुरुषाला त्याला शोभेल असाच निरोप द्यायचे ठरवले आणि पूर्ण सन्मानाने एखाद्या राष्ट्र वीराच्या मानाने डिएगोला नैसर्गिक वातावरणात परत नेऊन सोडण्यात आले जेणेकरून तो आपले उर्वरित आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात सुखाने,समाधानाने घालवू शकेल.अर्थात तिथे सोडण्याआधी डिएगोची पूर्ण शारीरिक चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली. निवृत्तीच्या वेळी शंभर वर्षाचा असलेला डिएगो शारीरिक चाचणीत सुदृढ आढळला.जर नैसर्गिक वातावरणात डिएगो कोणाकडून काही अपाय झाला नाही तर आणखी पन्नास वर्ष सहज जगू शकेल अशी त्याची शारिरीक तंदुरुस्ती सांगते.अशा या कासवातल्या आर्य पुरुषाला निवृत्तीच्या शुभेच्छा.आजच्या तरुण पिढीच्या फेसबुकी भाषेत बोलायचं तर या दिएगोसाठी एक लाईक तो बनता है.

2 comments:

  1. अत्यंत माहितीपूर्ण आणि ओघवत्या लेखणीने लिहिलेला हा लेख फारच आवडला

    ReplyDelete