Sunday, July 26, 2020

पार्ल्याचा "नारायण"

ख्यातनाम लेखक आणि अस्सल पार्लेकर पू.ल.देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून अनेक व्यक्तिचित्रे प्रसवली.त्यातलेच एक म्हणजे "नारायण".हे एका अशा व्यक्तीचे चित्रण होते की एरवी ती व्यक्ती शांत असते पण प्रसंगी अनेक कामे तडीस नेते आणि ते कार्य पार पडेपर्यंत जीव तोडून काम करत असते पण जेंव्हा कौतुकाची वेळ येते तेंव्हा ती स्वत:ला कुठेतरी लपवते,दूर कुठेतरी उभी राहून तो कौतुक सोहळा बघत असते ज्याच्या पूर्णतेसाठी ती राबलेली असते.आपली आई आपल्यासाठी खूप प्रेमाने कष्टाने जेवण बनवते आणि ते जेवण जेवताना जेवणार्या बाळाच्या चेहर्यावरला आनंद बघून जसे आईला समाधान मिळते तसेच समाधान या 'नारायणा'च्या चेहर्यावर असते.पार्ल्याचा असा 'नारायण' म्हणजे आमचे सुधीर भाऊ रेवाळे.मी नेहमी म्हणत आलो आहे परागजींच्या चुंबकीय व्यक्तिमत्वामुळे अनेक जीवाभावाचे सहकारी त्यांना लाभले,सुधीर भाऊ त्यातलेच एक.पार्ल्यावर अतोनात जीव असणार्या परागजींसारख्या 'नरश्रेष्ठा'ला साथ आहे ती या 'नारायणा'चीच.महानगर पालिका असो वा एखाद्या कार्यक्रमासाठी परवानगी मिळवणे,महत्वाच्या कागदपत्रांची ने आण असो वा पार्ले महोत्सवाच्या पत्रकांचे काम,परागजींनी एकदा का सुधीरभाऊंना काम सांगितले की ते निश्चींत असतात कारण ते काम होणारच ही खात्री असते.भाऊंना ते काम पूर्ण केल्यानंतर परागजींच्या चेहर्यावर पसरलेला आनंद बघीतला की 'याचसाठी केला अट्टाहास' असे वाटून जाते. परागजींच्या अथवा ज्योतिवहिनींच्या प्रयत्नांनी सुरु झालेले पार्ल्यातले महानगरपालिकेचे काम सुधीर भाऊंच्या देखरेखीखालीच पूर्ण होते.मग ते रस्ता दुरुस्ती असो वा जलवाहीनीचे काम असो वा आणखी काही.सतत 'नारायण नारायण' करणारया नारदासारखा संपूर्ण पार्ल्यात सुधीर भाऊंचा सर्वत्र संचार सुरु असतो.तसा हा माणूस मितभाषी आहे.त्यात मुखी १२० चा रोल असतो.पार्ल्यातले तमाम पानवाल्यांचे बाकी कोणी नसू दे पण हे गिर्हाईक पक्के आहे.पार्ल्यात कुठे ही काम चालू असू दे आणि जर भाऊ तेथे उभे असतील बस्स भाऊंनी क्रिकेट मधला अंपायर जशी 'OUT'ची खूण करतो तसे आपले बोट वर केले की त्या नाक्यावरचा पानवाला लगेच कामाला लागतो.आपले काम झाले की त्या पानवाल्याकडून घेतलेला १२०चा रोल मुखात सरकवून स्वारी पुढच्या कामाला रवाना.त्यांची ही माव्याची सवय सुटावी म्हणून आम्ही सर्वानी आणि विशेषतः त्यांच्या 'बाय'ने खूप प्रयत्न केले.पण ही सवय काही सुटली नाही.याव्यतिरीक्त आणखी ही काही वाईट खोडी या माणसाला आहेत त्या म्हणजे समोरच्याला उगीचच फालतू प्रश्न विचारून भंडावून सोडण्याची जाम खोड ह्याना आहे आणि नारदाप्रमाणे सर्वत्र संचाराची कला आहेच पण त्याच नारदाप्रमाणे मित्रांमध्ये काड्या टाकून मजा बघायची पण खोड आहे.दीपा ताई हे आवडते लक्ष.पण बाकी अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव.मित्रांसाठी काहीपण करायची तयारी हे ही खास.बामणोली या कोकणातल्या आपल्या गावावर त्यांचे खूप प्रेम.इतरवेळी रविवारी देखील सुट्टी न घेणार्या भाऊंची गणपतीची आठवडाभराची सुट्टी मात्र नक्की असते.आपल्या सहकार्यांची नेहमीच काळजी घेणार्या परागजींनी सुधीरभाऊंच्या विनंतीला मान देऊन खास पार्ल्यातून कोकणात गणपती साठी एस.टी.सेवा सुरु करून घेतली;त्यायोगे पार्लेकर कोकणी माणसांना गणपतीत कोकणात जाता यावे.त्या गावच्या वातावरणात राहून,ताजेतवाने होऊन परत आले की भाऊंची पुन्हा कामाला सुरुवात.आपले काम झाले की शांतपणे कुठेतरी एका कोपरयात गर्दीपासून लांब उभा राहिलेला हा 'नारायण' आम्ही मित्रांनी नेहमी बघितला आहे.भाऊ आज तुमचा वाढदिवस.तुम्हाला दीर्घायुष्य लाभो,तुमची १२०ची सवय सुटो हीच याप्रसंगी माझी स्वामीचरणी प्रार्थना.

No comments:

Post a Comment