Sunday, July 26, 2020

सखी सहचारिणी

 
प्रिय.... 
आज आपल्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली. सात या आकड्याला तसे पाहता खूप महत्व.संगीतातल्या सरगमचे सूर सात,पावसाळ्यात दिसणारे मनमोहक इंद्रधनूचे रंग ही सात.आपल्या कुंडलीत जर सातव्या स्थानात जर शुभ ग्रह असेल तर ते अत्यंत भाग्याचे लक्षण मानले जाते. वटपौर्णिमेला सात जन्म हाच पती मिळावा असे म्हणत सुवासिनी वडाची पूजा करतात. लग्नामध्ये पण सप्तपदी असतेच.अशीच सप्तपदी पूर्ण करून तू माझ्या आयुष्यात आलीस. खरं सांगायचं तर ती वचने माझ्यापेक्षा तूच जास्त चांगली निभावली आहेस नव्हे निभावत आहेस.
काही वर्षांपूर्वी सावित्री बनून तुझ्या सत्यवानाला यमाच्या दारातून परत घेऊन आलीस.त्या आघातातून तन सावरले पण मन अजून सावरते आहे.याची जाण तुलाही आहे म्हणून तू केवळ माझी पत्नी म्हणून न राहता माझी आई पण झालीस.तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला जपलेस आणि अजूनही जपतेस.माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटतेस. माझ्या आवडी निवडी जपतेस .माझे राग लोभ सांभाळतेस.... कोणताही आव न आणता!! नाहीतर असे आपल्या माणसांसाठी झटणाऱ्या लोकांमध्ये "मी"पणा येऊ लागण्याची शक्यता असते,"मी नसतो किंवा नसते तर तुमचे काय झाले असते" हे आणि अशाच प्रकारची वाक्ये सारखी ऐकू येतात,अशी माणसे मग मोकळेपणाने हसत बोलत नाहीत,सतत कसल्यातरी ओझ्याखाली दबलेली वाटतात,सुदैवाने असे कोणतेही लक्षण तुझ्यात नाही.अगदी मोकळेपणाने तू माझ्याशी बोलतेस,भांडतेस,रुसतेस.तुझे धबधब्यासारखे मनमोकळे हास्य तुझे स्वभाववैशिष्ठ्य अधोरेखित करून जाते .जितका टोकाचा तुझा राग आहे, तितकेच उत्कट प्रेम तुझे माझ्यावर आहे.आपल्या सासूशी शिळोप्याच्या गप्पा मारणे हा तर आवडता छंद.आपल्या माणसांना घट्ट धरून आहेस तू.
आतापर्यंतच्या संसारीक वाटचालीत तुझी खंबीर साथ मला जगण्याचे,संकटांशी लढण्याचे बळ देत आलीय.
अशा या माझ्या सखी सहचारणीसह लग्नाचा ७वा वाढदिवस आज मी साजरा करत आहे.आम्हा दोघांच्या परिवारातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद,मित्रपरिवाराच्या शुभेच्छा आणि आम्हा दोघांपेक्षा (वयाने) लहान असलेल्या मंडळींचे प्रेम आम्हाला लाभो हीच याप्रसंगी स्वामीचरणी प्रार्थना..

No comments:

Post a Comment