Sunday, July 26, 2020

प्रिय मैत्रिणी

तसे बघितले तर आमच्या मैत्री १ दशकाहून जास्त जुनी आहे.एखाद्याला अचानक चांगला काही लाभ व्हावा तशी हिची मैत्री मला लाभली.माझी प्रिय सखी मैत्रीण. असे म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हिचे मनमोकळे स्मितहास्य तिच्या आई वडिलांना पाळण्यात दिसले असावे म्हणूनच तिचे नाव "स्मिती" ठेवले असावे.मी सदैव तिला आपले नाव सार्थ करतानाच पाहिले आहे.सदैव हसतमुख.हिंदीत एक वचन आहे "दुख अपने लिए रख,सुख सबके लिए" हे वचन म्हणजे स्मिती.माझी खूप जवळची मैत्रीण आहे ती.आम्ही खरेतर वळीवाच्या पावसासारखे भेटतो अचानक कुठेतरी न ठरवता.पण त्या पावसासारखीच आमची भेट असते.सुंदर,जुन्या आठवणींनी चिंब भिजलेली,नव्या चांगल्या आठवणी देऊन जाणारी.तिच्याशी बोलताना,व्यक्त होताना मला पुरुषाठायी स्त्रीप्रती असलेले अनाम अवघडलेपण कधीच जाणवले नाही.एखाद्या जिवलग मित्राच्या खांद्यावर हात ठेवत आपण ज्या सहजतेने संवाद साधतो तितक्याच सहजतेने मी स्मितीशी बोलू शकतो.आपल्या सहजसुंदर वागण्याने,प्रेमळ स्वभावामुळे तिने प्रचंड मोठा मित्रपरिवार जोडला आहे,तो ही असा की तिच्या एका हाकेवर हा मित्र परिवार धावत येईल.जीवनाचा संघर्ष कोणाला चुकलेला नाही पण स्मितीच्या वाटेला आलेला संघर्ष किती कठीण होता त्याचा मी साक्षीदार आहे आणि तो कठीण होण्यात तिने घेतलेले काही चुकीचे निर्णय जबाबदार आहेत.मी तिचा मित्र जरी असलो तरी मी तिने तिच्या आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे अजिबात समर्थन करणार नाही.पण तिच्या चुकांचे खापर तिने कधीही नशिबाच्या किंवा इतर कोणाच्याही माथी मारले नाही.परिस्थिती मान्य करून त्या परिस्थितीचा सामना करून ज्या खंबीरपणे ती आज उभी आहे ते खरंच कौतुकास्पद आहे.एक कुशल नृत्यांगना,आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आई,एक यशस्वी "BEAUTICIAN","TALENTZIA" ची सर्वेसर्वा,पार्ले महोत्सवाच्या नृत्य स्पर्धेची प्रमुख अशा अनेक भूमिका ती सुहास्य वदनाने लीलया पार पाडत आहे.आज तीचा वाढदिवस.तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक जुना मित्र म्हणून मला एकच सांगावेसे वाटते,आपण खूप चांगले आहोत म्हणून हे सगळे जग चांगले आहे असे नसते आणि संघर्ष करणे सोडू नकोस कारण तिच तुझी खरी ताकद आहे.
"HAPPY BIRTHDAY MY DEAR FRIEND"

No comments:

Post a Comment