मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही चित्रपट आणि त्यातील काही प्रसंग असे असतात, जे केवळ पडद्यावर घडत नाहीत, तर प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतात. संजय सूरकर दिग्दर्शित 'तू तिथे मी' हा चित्रपट अशाच अनेक संवेदनशील आणि अंगावर शहारे आणणाऱ्या प्रसंगांनी नटलेला आहे. या चित्रपटातील एक नितांत सुंदर, तितकाच अंतर्मुख करायला लावणारा प्रसंग म्हणजे—सेवानिवृत्त झालेले सदानंद दाते (मोहन जोशी) आणि त्यांचे जुने सहकारी बुधकर (सुधीर जोशी) यांची झालेली भेट. हा प्रसंग म्हणजे केवळ दोन वृद्धांमधील संवाद नाही, तर बदलत्या काळातील एका मोठ्या सामाजिक आणि कौटुंबिक शोकांतिकेचे अत्यंत हुबेहूब रेखाटलेले चित्र आहे.
आपला पगार आणि उरलेली थकबाकी घेण्यासाठी दातेसाहेब पुन्हा एकदा ऑफिसच्या पायऱ्या चढतात. तिथे त्यांना फारसा परिचय नसलेला, पण ओळखीचा चेहरा असलेला 'बुधकर' हा गृहस्थ भेटतो. बुधकरही सेवानिवृत्त झालेला आहे. संवादाची सुरुवात करताना बुधकर दातेसाहेबांना चहाची लालूच दाखवतात आणि अत्यंत सहजतेने एक कटू सत्य बोलून जातात
"आजकाल आपलं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, तर चहा पाजावा लागतो!"हा संवाद वरकरणी साधा वाटत असला, तरी त्यामागे एकटेपणाची किती मोठी दरी आहे, हे लगेच जाणवते. बुधकर दिवसभरात सात-आठ चहा पितात, कारण त्यांना स्वतःचे मन हलके करण्यासाठी, स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कोणाशीतरी बोलणे गरजेचे असते. दिग्दर्शकाने या प्रसंगात दोन वेगवेगळ्या परिस्थितीतील वृद्धांची तुलना अत्यंत प्रभावीपणे केली आहे.सदानंद दाते यांचे आयुष्य कौटुंबिक जिव्हाळ्याने समृद्ध आहे; दोन मुले, सुना आणि लाडक्या नातवंडांच्या किलबिलाटात त्यांचा अत्यंत सुखी परिवार नांदत आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सदानंद दाते यांना त्यांच्या पत्नीची अत्यंत खंबीर आणि प्रेमाची साथ लाभली, ज्यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन आदर आणि समाधानाने बहरून गेले. दुसरीकडे बुधकर यांची परिस्थिति अत्यंत विदारक आहे; त्यांची सहचारिणी म्हणजेच पत्नी नुकतीच निवर्तल्यामुळे त्यांच्या आयुष्यात एक सुन्न करणारी शांतता पसरली आहे. बुधकरांचा एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला आहे, तर इथे भारतात मात्र घरात केवळ त्यांची वृद्ध, आजारी आई आणि तिची सेवा करणारे बुधकर उरले आहेत. ज्या घरात कधी काळी आनंदाचे वातावरण होते, तिथे आता दिवसभर केवळ औषधांचा उग्र वास आणि मनाला पोखरून काढणारा असह्य एकटेपणा उरला आहे.बुधकरांचा मुलगा परदेशात आहे. जेव्हा तो भारतात येतो, तेव्हा तो स्वतःच्या घरी न राहता हॉटेलमध्ये राहतो. पाहुण्यासारखा येतो, दोन-चार दिवस राहतो आणि निघून जातो. मुलाचा हा परकेपणा आणि 'पाहुणचार' बुधकरांना आतून पोखरत असतो, पण ते तो राग मुलावर काढत नाहीत. उलट, "अशा औषधांचा वास असलेल्या घरात त्याने तरी का राहावे?" असे म्हणत ते मुलाची बाजू समजून घेतात. हा त्यांचा समजूतदारपणा त्यांच्यातील लाचारी आणि अगतिकता अधिक गडद करतो.९० च्या दशकातील हा तो काळ होता, जेव्हा भारतीय तरुणांमध्ये परदेशी जाण्याची लाट नुकतीच सुरू झाली होती. पालकांना आपल्या मुलांच्या यशाचा, त्यांच्या परदेशात असण्याचा सार्थ अभिमान असायचा. पण या 'अभिमानाच्या कवचाखाली' एकटेपणाचे जे दुःख धगधगत होते, ते समाज उघडपणे मान्य करायला तयार नव्हता.बुधकर हे याच पिढीचे प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या चेहऱ्यावर सतत हसू ठेवतात, लोकांशी थोडे 'लोचट' होऊन गप्पा मारतात, जेणेकरून मनावरचा ताण हलका व्हावा. त्यांचे हे हसरे दुःख म्हणजे 'रबरी चेंडू पाण्यात दाबण्याच्या खेळासारखे' आहे. एखादा रबरी चेंडू आपण कितीही ताकदीने पाण्यात दाबून धरण्याचा प्रयत्न केला, तरी तो उसळी मारून वर येतोच. बुधकरांचे दुःखही असेच आहे. ते चेहऱ्यावर हसू आणून, सभ्यपणे संवाद साधून ते दुःख लपवण्याचा कितीही प्रयत्न करत असले, तरी त्यांच्या डोळ्यांतील आणि आवाजातील वेदना दातेसाहेबांना (आणि प्रेक्षकांनाही) स्पष्ट जाणवते.हा प्रसंग केवळ संवादांमुळे नाही, तर दोन दिग्गज कलावंतांच्या অভিনयामुळे अजरामर झाला आहे. सुधीर जोशी यांनी बुधकरांची ती अगतिकता, चहा पिण्याची घाई, आणि हसता हसता डोळ्यांत येणारे पाणी ज्या ताकदीने उभे केले आहे, त्याला तोड नाही. तर दुसरीकडे, मोहन जोशी यांनी संयत, स्थितप्रज्ञ आणि अंतर्मुख होत, केवळ चेहऱ्यावरील भाव आणि शांततेच्या माध्यमातून दातेसाहेबांची अस्वस्थता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.हा प्रसंग आजच्या काळातही तितकाच जिवंत वाटतो, कारण आज आपल्या अवतीभवती अशी अनेक 'बुधकर' आपल्याला पाहायला मिळतात. मुलांच्या प्रगतीसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारी आणि शेवटी रिकाम्या घरट्यात एकटेपणाशी झुंजणारी ही पिढी आजही हा 'रबरी चेंडू पाण्यात दाबण्याचा खेळ' रोज खेळत आहे. 'तू तिथे मी' चित्रपटातील हा प्रसंग मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला आहे, जो पाहताना डोळे नकळत ओलावतात आणि मन सुन्न होते.
लेखक: अमित अशोक परब #CinemaGully
No comments:
Post a Comment