Saturday, October 31, 2020

"अलविदा सर शाॅन"

बॉंडपटाच्या इतिहासातला सर्वप्रथम बॉण्ड आज काळाच्या पडद्याआड गेला....
"सर शॉन कॉनरी" या स्कॉटीश अभिनेत्याचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन झालं. "ईयान फ्लेमींग" या ब्रिटिश लेखकाने "MI6" या खर्‍याखुर्‍या ब्रिटिश गुप्तहेर संघटनेतील हे "जेम्स बॉण्ड 007" नावाचे काल्पनिक पात्र निर्मिले.हा नायक रांगडा होता, तितकाच तो रोमँटिक होता,दिसायला देखणा, उंचापुरा, बोलायला चतुर आणि पिस्तूल चालवण्यात वाकबगार असा होता.शॉन कॉनरीच्या व्यक्तिमत्त्वात हे सारे गुण बॉंडपटाच्या निर्मात्यांना ठळकपणे दिसून आले आणि तो अजरामर व्यक्तिरेखेचा पहिला मानकरी बनला. त्याने एकूण सात चित्रपटात बॉंड साकारला.एवढी अमीट छाप त्या भूमिकेवर सोडणे त्याच्यानंतर ही भुमिका साकारणारया  दुसर्या  कुठल्याही अभिनेत्याला जमले नाही.पण म्हणून बॉण्ड साकारणारा अभिनेता या चाकोरीत अडकवणे हे शॉन कॉनरीचा अपमान ठरेल. "हंट फोर रेड ऑक्टोबर" यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले.अत्यंत गाजलेल्या "अनटचेबल्स" या ब्रायन डी पाल्मा दिग्दर्शित  माफियापटात त्याने साकारलेला पोलीस ऑफीसर जिमी मलोन कमालीचा प्रभावी होता.अभिनेत्यांचा अभिनेता असे ज्याचे वर्णन केले जाते असा "रॉबर्ट डी निरो",तत्कालीन हॉलीवूड सुपरस्टार "केविन कॉस्टनर",आपल्या सहज अभिनयासाठी  प्रसिध्द असलेला "अँडी गर्सिया" अश्या तगड्या अभिनेत्यांची फौज या चित्रपटात असून देखील कॉनरीने आपल्या भूमिकेसाठी त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्याचे ऑस्कर पटकावले हा एव्हढा पुरावा तो किती चांगला अभिनेता होता हे सांगायला पुरेसा ठरतो.ऑस्कर मिळवणारा तो पहिला(आणि एकमेव) "बॉण्ड" ठरला आणि त्याचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे." इंडियना जोन्स अँड द लास्ट कृसेड"  चित्रपटातली नायकाच्या पित्याची भूमिकाही विशेष गाजली. "फाईंडिंग फोरेस्टर" या गस वॅन सांट दिग्दर्शित चित्रपटातील त्याची "विल्यम फॉरेस्टर" या विस्मृतीत गेलेल्या साहित्यिकाची भूमिकाही मला फार आवडली होती.2000 साली त्याला "सर" या पदवीने सन्मानित करण्यात आले.आपण स्कॉटीश असण्याचा कमालीचा अभिमान त्याला होता.आणि "बॉंड" च्या व्यक्तिरेखेला कोणी न्याय देऊ शकेल तर तो केवळ एखादा स्कॉटीश ,आयरिश अथवा ब्रिटिश अभिनेताच देऊ शकेल;अमेरीकन किंवा अन्य कोणी त्याला न्याय देऊ शकणार नाही असे तो जाहीरपणे सांगायचा.त्याची ही भविष्यवाणी खरी ठरली कारण त्याच्यानंतर बॉंड साकारणारे "रॉजर मूर","तिमोथी दाल्तन", "डैनिएल क्रेग" हे ब्रिटिश अभिनेते तर "पियर्स ब्रॉस्सनान" हा आयरिश अभिनेता कमालीचे लोकप्रिय ठरले तर "जॉर्ज लेसेंबी" या ऑस्ट्रेलियन अभिनेत्याला प्रेक्षकानी नाकारले ही वस्तुस्थिती आहे. अशा या हरहुन्नरी आणि "जेम्स बॉण्ड" या सर्वमान्य लोकप्रिय अशा गुप्तहेराच्या व्यक्तिमत्वाला पुरेपूर न्याय देणाऱ्या या नटश्रेष्ठाला भावपूर्ण श्रद्धांजली.

Saturday, October 10, 2020

महानायक ७८

सरस्वतीमातेचा वरदहस्त असलेल्या एका बहुश्रुत कुटुंबातून आलेला तरुण अभिनय क्षेत्राची वेगळी वाट निवडतो.अनेकदा पडतो.पण चालत राहतो कधी त्याच्या उंचीवरून कधी त्याचा सामान्य चेहरा पाहून त्याला अनेकांकडून अवहेलना सहन करायला लागते.निराशा होते, एकांतात रडणे होते.ही वाट सोडून द्यावी असे ही वाटते.पण त्याचे कलासक्त माता पिता त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतात.एक छोटीशी भूमिका मिळते.सुनिल दत्तच्या मुक्या भावाची. चित्रपट "रेश्मा और शेरा".वाटचाल सुरु होते. "सात हिन्दूस्थानी" मधला सैनिक सगळ्याना भावतो.हा लंबी रेस का घोडा आहे हे जाणवते पण हा सगळ्या समकालीन पुरुष नटांची छुट्टी करून टाकणार आहे हे कोणाला जाणवत नाही;कारण याचे समकालीन नट एक से बढकर एक होते.देखणा विनोद खन्ना,जंपींग जैक जितेंद्र,सुपरस्टार राजेश खन्ना,राजस शशी कपूर,अभिनय सम्राट संजीव कुमार,ही मैन धर्मेंद्र यांच्या खिजगणतीत ही हा नव्हता.तो काही विनोद खन्ना किंवा राजेश खन्ना सारखा देखणा नव्हता,शशी कपूर सारखा राजबिंडा नव्हता.धर्मेन्द्रसारखा रांगडा नव्हता की जितेन्द्र सारखा नृत्य निपुण नव्हता.सुरुवातीच्या काही चित्रपटांत तर अभिनय ही ठिक ठाक होता.पण असे काय होते याच्याकडे ते की त्याच्या जोरावर तो या सर्व त्याच्या समकालीनांना मात देऊन त्यांच्या दशांगुळे वर राहिला.तो होता प्रचंड आत्मविश्वास अन् सतत आपल्या चुकांतून शिकण्याची वृत्ती.याच जोरावर तो आज वयाची सत्यात्तरी उलटली तरी या अभिनयाच्या क्षेत्रात टिकून आहे नव्हे त्याच्यावर राज्य करतोय.ज्याला त्याच्या एका चित्रपटात मुक्याची भुमिका करावी लागली होती.आज त्याचा आवाज ही त्याची USP आहे.त्याच्यासारखा आवाज काढून आज कितितरी नकलाकार आपले पोट भरतायत.सुरुवातीला ठिक ठाक असलेले अभिनयाचे नाणे त्याने प्रचंड मेहनतीने आणि नेहमी सतत शिकत रहाण्याच्या वृत्तीच्या अर्काने घासून लखलखते ठेवलय.म्हणून तर ते अजून खणखणीत वाजतेय.किती वेगवगळ्या भुमिका निभावल्यात चटकन आठवायला गेले तर "चुपके चुपके"मधला सरळ साधा प्रोफेसर सुकुमार सिन्हा,"अभिमान" मधला गायक सुबीर कुमार अश्या अनेक....हे झाले सहज सुंदर अभिनयाबाबत पण हाणामारीच्या चित्रपटांत ही कमालीची मास्टरी.काय होते हयाच्याकडे..ना धर्मेंद्र सारखे कमावलले शरीर होते ना विनोद खन्ना सारखा रांगडेपणा. साधी किडकिडित शरीरयष्टी.पण जे आपल्याकडे नाही ते आपल्याकडे जे आहे त्यांचा वापर करून सादर करणे म्हणजे अभिनय हे त्याने जाणले आणि नसलेल्या गोष्टींची सर त्याने त्याच्याकडे असलेल्या गोष्टींनी भरून काढली ती म्हणजे उत्तम अभिनय,भारदस्त आवाज आणि भेदक डोळे.याच जोरावर तो चित्रपटसृष्टीतला अभिनयाचा शेहेनशाह बनला.मला तर त्याच्या अभिनयातल्या अनेक लखलखीत तुकड्यांमधले काही तुकडे आठवतात."दिवार" मधला तो हॉटेल मधला प्रसंग!! परवीन बाबी त्याची कंपनी मिळावी म्हणून त्याच्याशी लगट करते.तेंव्हा "किसको मरना है!! जो आज मेरे साथ होगा!!" हे तो ज्या पद्धतीने म्हणतो. एका क्षणात एका आपल्या मस्तीत जगणारया,मरणाचीपण परवा नसलेल्या माणसाची व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.त्यानंतर हॉटेल मधून त्याच्या गाडीपर्यंत त्याचा walk.....या त्याच्या नुसत्या रुबाबदार,बेफिकीर चालीसाठी मी दीवार कितितरी वेळा बघितलाय.अग्नीपथ चित्रपटातील त्याच्या बहिणीच्या अपहरणाचा प्रसंग...गुंडांच्या अड्ड्यावर तो बहिणीला वाचवायला शिरतो. चिखलात माखलेल्या,अंगावरची वस्त्रे काही ठिकाणी फाटलेल्या,असहाय बहिणीला पाहून डोळ्यांत अंगार फुललेला पण त्याचवेळी ज्याने त्याच्या बहिणीचे अपहरण केले त्याच्याकडे पाहून रागमिश्रित तुच्छतापूर्वक हास्य त्याच्या चेहर्यावर उमटते.माझ्या अंगावर काटा उभा राहिला त्याचा अविर्भाव बघून.उगीच नाही या भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनयाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले.तो खरोखरच त्यासाठी पात्र होता.आतापर्यंत 4 वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालेय.त्यातली 3 तर वयाची साठी ओलांडल्यानंतर.आज ही वयाच्या 8व्या दशकाची झुळुक लागलीय तरी तोच उत्साह आहे.आज ही दिवसांतले पंधरा पंधरा तास काम चालू आहे.त्याचे सर्व समकालीन आता मोडीत निघाले पण तो आज ही आपला आब राखून आहे.आयुष्यात अनेक लढाया जिंकून,हरून झाल्यात.मग त्या राजकिय कारकीर्दीबाबतीत असो वा वैयक्तीक आयुष्याबाबतीत असो वा तब्येतीच्या बाबतीत असो.नुकतीच करोनाविरुद्धची लढाई जिंकून झालीय.आज ही कामाच्या प्रति तीच निष्ठा आहे.प्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी "खाकी" चित्रपटाच्या वेळची नमूद केलेली आठवण खूप बोलकी आहे.एखादा सीन त्याला दिला की हा माणूस एखाद्या नवशिक्याप्रमाणे तो सीन समजून घ्यायचा आणि हा आपल्या आयुष्यातला पहिलाच सिन आहे असं समजून त्या तडफ़ेने तो सिन करायचा. ह्याला म्हणतात कामावर असलेली निष्ठा.वेळेच्या बाबतीत खूपच काटेकोर आहे.मला एक प्रसंग आठवतो.अंधेरीत एका कार्यक्रमाची वेळ होती सकाळी 9 ची. तो येणार होता.पण एव्ह्ढा मोठा माणूस तो कशाला वेळेत येयील असे समजून संयोजक मंडळी गफिल होती.तो बरोबर 9 च्या ठोक्याला हजर झाला.संयोजक मंडळी चाट.रात्रभर एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून तो आला होता. पण चेहर्यावर थकावटीचा लवलेश नव्हता.गोंधळलेल्या संयोजक मंडळींवर अजिबात न चिडता थांबला. नियोजित कार्यक्रम आटपून स्वारी रवाना झाली.त्याच्या आगमनानंतर ते आतापर्यंत चित्रपट सृष्टी खूप बदलली फोफावली,वाढली.तंत्र बदलले. नव्या विचाराचे, ताज्या दमाचे लोक आले.तो पण या सर्वात अत्यंत सहजपणे सामावून गेला. याचा कारण त्याने काळानुरूप स्वतःला बदललं .म्हणूनच तर आजही नव्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला तो उत्सुक असतो आणि नवे दिग्दर्शकही त्याच्याबरोबर काम करणं हा एक सन्मान समजतात. नुकताच त्याचा "गुलाबो सीताबो" हा सुजीत सरकार या ताज्या दमाच्या दिग्दर्शकाबरोबरचा चित्रपट पाहिला. एका 90 वर्षाच्या कवडीचुंबक म्हाताऱ्याची व्यक्तिरेखा एवढं अप्रतिम वठवलीय की त्याला तोड नाही. त्या 90 वर्षाच्या म्हातारयाचे पोक काढून चालणे, त्याच्या आवाजात वयपरत्वे आलेला कंप, त्याचा कवडीचुंबकपणा हे सगळे एवढे अप्रतिम ह्या माणसाने दाखवलं की खरंच आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या देशात "अमिताभ बच्चन" नावाचा महानायक जन्माला आला आहे. आपण खूपदा हॉलीवुडमधल्या कलाकारांचे गोडवे गातो उदाहरणार्थ जॅक नीकोलसन, रॉबर्ट डी निरो,अल पचिनो वैगेरे. मलाही हे कलाकार आवडतात.रॉबर्ट डी निरो तर माझा खूप आवडता अभिनेता आहे.पण मला अमिताभ या कलाकारांपेक्षा कुठेही कमी नाही उलट काकणभर सरसच वाटतो.अशा या महानायकाचा आज वाढदिवस.

बच्चन साहेबाना उदंड आयुष्य लाभो हीच याप्रसंगी एक त्यांचा चाहता म्हणून प्रार्थना.

Sunday, September 27, 2020

नाळ

 मातेच्या गर्भातला जीव नवमास भरले कि या वास्तवादी जगात प्रवेश करतो तेंव्हा त्याच्या मातेच्या गर्भाशयाशी ज्या नाळेने  जोडलेला असतो ती  नाळ कापून  डॉक्टर त्या बाळाला गर्भाशयापासून विलग करतात पण त्या नाळेचा काही भाग तुकडा मात्र तसाच बाळाशी चिकटलेला असतो.जो काही दिवसानी आपोआप गाळून पडतो .पण मला असे वाटते की माता केवळ स्वत:च्या नाळेशी जोडलेल्या आपल्या बाळाला केवळ आपले गुणधर्म देते असे नाही तर आपली स्वप्ने मनातल्या ईच्छा आकांक्षा पण देत असावी.म्हणूनच जेंव्हा ती नाळ कापून बाळ वेगळे होते तेंव्हा तो तिच्या ईच्छा आकांक्षारूपी नाळेचा तुकडा बाळाला चिकटून राहतो आणि मग त्या ईच्छा आकांक्षा बाळामध्ये झिरपल्या की मग ती नाळ आपोआप गाळून पडते. आमच्या मंदाआत्येला कोकणाचे भयंकर अप्रूप होते एव्हढे की सम्पूर्ण हयात मुंबईत घालवून देखील ती नेहमी मालवणीतूनच बोलायची. गावाकडच्या आठवणीत रमायची. तिची एक ईच्छा होती की कोकणात आपले एक ऐसपैस घर असावे आणि हेच तिचे स्वप्न उदयदादामध्ये झिरपले असावे .आत्येने तिचे स्वप्न तिने उदयदादा तीच्या गर्भात असताना पेरले असावे. कारण दादाने अक्षरशः ध्यास घेतला होता की माझ्या कोकणात माझे स्वत:चे असे एक घर असायला पाहिजे कारण त्यालाही आता कुठे जाणवत होतं की आपली नाळ या कोकणाच्या मातीशी घट्ट जोडलेली आहे . मग त्याचा शोध सुरु झाला आणि मालवणातील कट्टा या गावाजवळ येऊन थांबला. दादाच्या स्वप्नातले घरकुल उभे राहिले . नावही त्याने खूप विचार करून ठेवलेय ,"अद्वैत " याचा अर्थ कोणाशीही द्वैत म्हणजे वैर नसलेला. हे घर हे नुसतं घर नाहीये त्यातून दादाचा रसिक स्वभाव ठायी ठायी जाणवेल . मला असं वाटतं ह्या घराची हीच खासियत आहे की या घरावर आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टींवर उदय दादाचा ठळक ठसा जाणवतो.त्याने नव्याने उभारलेली पुष्करिणीही त्याला अपवाद नाही. एखाद्या आईने ज्या मायेने,प्रेमाने आपल्या लेकीला सजववावे तद्वत दादाने आपला हा स्वप्नमहाल सजविला आहे.दादाने त्याच्या मनात या घराबद्दल चे वाटतं ते शब्दात मांडले खरे पण ते खूपच अपूर्ण आहे असे मला वाटते कारण या घराबद्दल त्याला जे वाटते ते शब्दांत मांडणे अवघड आहे.खरं म्हणजे घराचा विषय निघाला तर तो बोलायचा थांबतच नाही इतक्या घराबद्दल त्याला प्रेम आहे आणि खरच हे घर त्याच्यासाठी स्पेशल आहे कारण उदयदादासाठी हे केवळ घर नाही तर एक स्वकष्टाने पूर्ण केलेली स्वप्नपूर्ती आहे. त्याची नाळ त्या घराशी आणि कोकणच्या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. 

Tuesday, August 18, 2020

कायम कार्यालय प्रमुख

ज्यांच्या नावातच सुरुवातीला "श्री" हे परम आदरणीय संबोधन आहे त्या माननिय श्रीकृष्ण आंबेकरांचा आज वाढदिवस. पक्षात अनेक पदे भूषविलेल्या आंबेकरजींची आम्हा विले पार्ले विधानसभेतील कार्यकर्त्यांसाठी ओळख ही (आमचे परम आदरणीय गुरुदेव प्रवीर कपूर आंबेकरजींना म्हणतात त्याप्रमाणे ) "का .का .प्र " अर्थात "कायम कार्यालय प्रमुख" हीच आहे.जन्म गोकुळष्टमीचा असल्याने त्यांचे नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आले पण ज्याने कोणी हे नाव त्यांना दिले त्या व्यक्तीला आंबेकरांचे पुढचे भविष्य नक्की दिसले असावे कारण श्रीकृष्ण हा एक कुशल राजकारणी होता,आपल्या लोकांवर त्याचा प्रचंड प्रभाव होता,बोलण्यात चतुर होता आणि राजकारणाशिवाय देखील अनेक विषयांत त्याला कमालीची गती होती.तो एक मुकुट नसलेला राजा होता.आंबेकरजींचे सुद्धा तसेच; राजकारणात तर ते मुरलेले आहेतच,आपल्या प्रभागात (प्रभाग क्र . ८४) मध्ये त्यांचा प्रचंड आदरयुक्त प्रभाव आहे. मराठी टायपिंग ,इंटरनेट,शेअर मार्केट,Desktop publishing (abbreviated DTP),online shopping अश्या अनेक विषयांत आंबेकरजीना कमालीची गती आहे . विले पार्ले (पू) चे GADGET GURU म्हणून आंबेकरजींचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.फावल्या वेळेत इंटरनेट वर विविध माहिती घेणे हा त्यांचा आवडीचा विरंगुळा आहे . त्यामुळेच तर दहा हजाराचा स्पीकर केवळ दोन हजारात खरेदी करायची किमया आंबेकरजीच करू जाणोत.त्यांच्या collection मध्ये महागड्या घड्याळांपासून,drone device पर्यंत सगळे मिळेल तुम्हाला. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यात केलेले विविध व्यवसाय हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अत्यंत मितभाषी आणि विविध विषयांमध्ये कमालीचे पारंगत असलेले व्यक्तिमत्व. राजकारणाच्या,समाजकारणाच्या कामातून अनुभवलेले अनेक किस्से आंबेकरजींकडे आहेत आणि ते किस्से रंगवून सांगण्याची त्यांची हातोटी जबरदस्त आहे. मी परागजींबरोबर काम करत असताना मला अनेक चांगल्या लोकांचा सहवास लाभला. त्यातही आंबेकरजींचा सहवास जरा जास्त लाभला; तेंव्हा आंबेकरजींकडून असे अनेक किस्से आम्ही ऐकलेत ते सांगताना एरवी अत्यंत कमी बोलणारे आंबेकरजी किती खुलून यायचे,वेगळेच दिसायचे. मला वाटायचे तेच खरे आंबेकरजी. आपल्या सुहृदांमध्ये रमणारे . आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगलेल्या आंबेकरजींनी कोणाच्या मुर्वतीखातर आपल्या आवड निवडीला मुरड घातली नाही. स्वतः वर कसलीही बंधने लादून घेतली नाहीत अगदी वैवाहिक बंधन देखील.माझे मत विचाराल तर त्यांच्यासारख्या मोकळेढाकळे आयुष्य जगलेल्या माणसाला असे कोणतेही बंधन मानवले नसते (हे माझे वैयक्तिक मत आहे . कृपया गैरसमज नको ). मी परागजींच्या कार्यालयात असताना अनेकदा आंबेकरजींबरोबर पंक्तीला बसायचा योग आला,कित्येकदा ICE CREAM चे फड रंगले या बाबतीही आंबेकरजींच्या दिलदार आणि चोखंदळ स्वभाव आम्हाला दिसायचा .जे जे चांगले ते आपले हा त्यांचा स्थायी भाव; मग ते खाणे पिणे असो वा इतर काही. कल्याणजवळच्या मुरबाड गावाला आंबेकरजींनी विले पार्ल्याच्या नकाशात पोचवले.आंबेकरजी आता मुरबाडचे पार्ल्यातले brand ambassador बनले आहेत. काही वर्षांपूर्वी पक्षाच्या कार्यालयात आलेल्या आंबेकरजींना स्वप्नातही वाटले नसेल की त्या पक्षात आपल्याला एव्हढा मान मिळेल पण हा मान आंबेकरजींना सहज मिळालेला नाही त्यासाठी खूप कष्ट,त्याग त्यांना करावा लागला. पक्षाबद्दल ,आपल्या विधानसभेबद्दल आणि आपल्या नेत्याबद्दल त्यांची निष्ठा भक्तिभावाच्यापातळीवर जाणारी आहे .परागजींच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातले एक म्हणून आंबेकरजी ओळखले जातात ते उगीच नाही . मी वरती म्हटल्याप्रमाणे आंबेकरजी हे कायम कार्यालय प्रमुख आहेत कारण कार्यालयात त्यांची करडी नजर असते . वेळप्रसंगी एखाद्याचे कडक शब्दात कान उपटायला ते मागेपुढे पाहात नाहीत मग तो कोणी असो. कार्यालयात असलेल्या शिस्तीचे श्रेय आंबेकरजी आणि आता विवेक ताम्हणकर यांना जाते. (योगायोग बघा या दोन कडक शिस्तीच्या मास्तरांचा वाढदिवस एका मागोमाग एक आहे उद्या दि.२० ऑगस्ट हा विवेकजींचा वाढदिवस ). तर असे हे आमचे आंबेकरजी . माझे पूर्वीसारखे वरचेवर कार्यालयात जाणे होत नसल्याने सध्या आमची बरेच दिवस भेट नाही. पण जेंव्हा केंव्हा आमची भेट होईल तेंव्हा आंबेकरजी आपल्या ठेवणीतल्या हास्याने माझे स्वागत करतील हे नक्की.आणि मग ICE CREAM पक्का . बघू कधी योग येतोय तो....... खरे तर काही वर्षांपूर्वी आपल्या वयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आंबेकरजींनी साजरे केले तेंव्हा हे चार शब्द मला सुचले असते तर मला जास्त आनंद झाला असता पण IT'S BETTER LATE THAN NEVER HAPPY BIRTH DAY AMBEKARJI

Monday, August 10, 2020

Happy Birth Day Milind Ji

विलेपार्ल्याचे विधानसभा अध्यक्ष श्री.मिलिंद शिंदे यांचा आज वाढदिवस.विले पार्ल्यातील भाजप कार्यकर्त्यांमधील जे काही पहिल्या फळीतले असे कार्यकर्ते ज्यांच्याबद्दल सर्वात जास्त चर्चा विशेषत: भाजप कार्यकर्त्यांमध्येआपापसात जास्त होते त्यात मिलिंदजींचा नंबर सर्वात वरती असावा.कारण विले पार्ल्यात जेव्हढे प्रभाग आहेत त्या सर्व प्रभागांमध्ये त्यांचा सतत संचार असतो त्यामुळे सर्वात दांडगे संपर्क वर्तूळ आहे त्यांचे.शिवाय परागजींच्या आमदारफंडाची ज्योतिवहिनींच्या नगरसेविका फंडातील सर्व कामे मिलिंदजीच करतात.शिवाय ते सतत सावलीसारखे परागजीं बरोबर असतात;अश्या व्यक्तींबद्दल इतरांच्या मनात एक धारणा बनून जाते मग आपसुकच अश्या व्यक्तीच्या हीतचिंतकाची(ज्यांना ह्यांचे हित झाले की चिंता वाटते अशांची) संख्या जास्त असते.अर्थात
मिलिंदजींना याची कल्पना नाही असे अजिबात नाही पण कबड्डीचा खेळ रक्तात मुरलेल्या या माणसाला हे ही पक्के ठावूक आहे की एखादी आक्रमक चढाई (raid) जशी सुकी सोडून द्यावी लागते तसेच या हीतचिंतकांकडे दुर्लक्ष केलेले बरे.याचा अर्थ ते शांत असतात असे नाही गरज पडली तर मिलिंदजी किती आक्रमकपणा करू शकतात हे आमच्यातल्या बर्याचजणानी पार्ले महोत्सवाच्या कबड्डी स्पर्धेत बघितले आहे. या स्पर्धेत टगेगिरी करणार्यांना त्यांच्यावर भारी पडेल अशी टगेगीरी मिलिंदजींकडून पहायला मिळते.ह्या खेळाचा मिलिंदजींच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर कमालीचा प्रभाव दिसून येतो.या खेळातला रांगडेपणा हा मिलिंदजींच्या वागण्या बोलण्यात कमालीचा उतरलाय.बोलताना शिव्यांचे लडिवाळ फिक्रे असतात.बोलणेही तसे थोडे मोठ्या आवाजातच.कदाचित त्यामुळेच अनेकांना ते उद्धट वाटतात.आपल्या जिवलग मित्रांचे मिलिंदजींच्या आयुष्यात मोठे स्थान आहे. त्यात विनित गोरे हे विशेष जवळचे.आमच्या भाजप(जिल्हा) का.का.प्र.( कायम कार्यालय प्रमुखां)चा कार्यालयात जबरदस्त वचक आणि दरारा आहे.मिलींदजी त्याला अपवाद.खरे तर दोघे ही खूप चांगले मित्र पण "का.का.प्र."ना उगीचच छेडायला मिलिंदजींना भारी आवडते.आपल्या गावावर मिलिंदजींचे प्रचंड प्रेम.महिन्यातून तीन चार फेर्या असतातच.ते स्वत:च्याही फार प्रेमात आहेत.म्हणूनच तर "FACEBOOK"वर सर्वात जास्त selfies आणि स्वत:चे विविध angle चे फोटो टाकण्याची भारी हौस आहे त्यांना.इंग्रजीत एक वाक्य आहे."you can hate me you can love me but you can't forget me".हेच मिलींदजींच्या व्यक्तिमत्वाचे एका वाक्यात वर्णन आहे.त्यांना कोणी निंदो वा कोणिही वंदो मिलींदजी सर्वाना हवेहवेसेच वाटतात.
"Haapy BirthDay" मिलिंदजी....

Sunday, July 26, 2020

सखी सहचारिणी

 
प्रिय.... 
आज आपल्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली. सात या आकड्याला तसे पाहता खूप महत्व.संगीतातल्या सरगमचे सूर सात,पावसाळ्यात दिसणारे मनमोहक इंद्रधनूचे रंग ही सात.आपल्या कुंडलीत जर सातव्या स्थानात जर शुभ ग्रह असेल तर ते अत्यंत भाग्याचे लक्षण मानले जाते. वटपौर्णिमेला सात जन्म हाच पती मिळावा असे म्हणत सुवासिनी वडाची पूजा करतात. लग्नामध्ये पण सप्तपदी असतेच.अशीच सप्तपदी पूर्ण करून तू माझ्या आयुष्यात आलीस. खरं सांगायचं तर ती वचने माझ्यापेक्षा तूच जास्त चांगली निभावली आहेस नव्हे निभावत आहेस.
काही वर्षांपूर्वी सावित्री बनून तुझ्या सत्यवानाला यमाच्या दारातून परत घेऊन आलीस.त्या आघातातून तन सावरले पण मन अजून सावरते आहे.याची जाण तुलाही आहे म्हणून तू केवळ माझी पत्नी म्हणून न राहता माझी आई पण झालीस.तळ हाताच्या फोडाप्रमाणे मला जपलेस आणि अजूनही जपतेस.माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटतेस. माझ्या आवडी निवडी जपतेस .माझे राग लोभ सांभाळतेस.... कोणताही आव न आणता!! नाहीतर असे आपल्या माणसांसाठी झटणाऱ्या लोकांमध्ये "मी"पणा येऊ लागण्याची शक्यता असते,"मी नसतो किंवा नसते तर तुमचे काय झाले असते" हे आणि अशाच प्रकारची वाक्ये सारखी ऐकू येतात,अशी माणसे मग मोकळेपणाने हसत बोलत नाहीत,सतत कसल्यातरी ओझ्याखाली दबलेली वाटतात,सुदैवाने असे कोणतेही लक्षण तुझ्यात नाही.अगदी मोकळेपणाने तू माझ्याशी बोलतेस,भांडतेस,रुसतेस.तुझे धबधब्यासारखे मनमोकळे हास्य तुझे स्वभाववैशिष्ठ्य अधोरेखित करून जाते .जितका टोकाचा तुझा राग आहे, तितकेच उत्कट प्रेम तुझे माझ्यावर आहे.आपल्या सासूशी शिळोप्याच्या गप्पा मारणे हा तर आवडता छंद.आपल्या माणसांना घट्ट धरून आहेस तू.
आतापर्यंतच्या संसारीक वाटचालीत तुझी खंबीर साथ मला जगण्याचे,संकटांशी लढण्याचे बळ देत आलीय.
अशा या माझ्या सखी सहचारणीसह लग्नाचा ७वा वाढदिवस आज मी साजरा करत आहे.आम्हा दोघांच्या परिवारातल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद,मित्रपरिवाराच्या शुभेच्छा आणि आम्हा दोघांपेक्षा (वयाने) लहान असलेल्या मंडळींचे प्रेम आम्हाला लाभो हीच याप्रसंगी स्वामीचरणी प्रार्थना..

प्रिय पप्पा

आज तुम्हाला देवाज्ञा होऊन वर्ष झाले.प्रसिद्ध इंग्रजी लेखक P.G.WoodHouse याची अत्यंत लाडकी कन्या अचानक देवाघरी गेली तेंव्हा दुःखाने भारलेला हा महान लेखक सहज बोलून गेला " I thought she was immortal". तुमच्या बाबतीतही मला हेच वाटले होते.एव्हढे व्यायामाने कमावलेले शरीर तुम्हाला लाभलेले.खाण्यापिण्याच्या बाबतीतही तुम्ही फारच काटेकोर होता.नियमित चालण्याचा व्यायामही चालू होता.पण नियतीपुढे कोणाचेच काही चालले नाही.बरोबर १ वर्षांपूर्वी याच तारखेला आम्हा सर्वांचा आधारस्तंभ आम्हाला सोडून गेला.तसे तुम्ही अजातशत्रू,अबोल,शांत स्वभावाचे.
कुणालाही त्रास होणार नाही याची तुम्ही सतत काळजी घेतलीत,अगदी हे जग सोडून जातानासुद्धा अगदी शांतपणे झोपेतच तुम्ही या जगाचा निरोप घेतलात.दुसर्यांसाठी सतत दीर्घायुष्याचे वरदान मागणार्या तुम्हाला स्वतःला मात्र दीर्घायुष्याचे वरदान लाभले नाही.अजित अण्णाच्या बाळाला बघायला किती उत्सुक होतात तुम्ही.आजही बागडे काका भेटले तरी तुमच्या नुसत्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावतात.भांजी काकांच्या मुलाच्या हळदीला तुमचे "Indian Airlines"मधले सगळे मित्र भेटले..अशोक आमच्या मनात कायम राहील असे जेंव्हा राऊत काका म्हणाले मला हुंदका दाटून आला होता.असा एक दिवस नाही ज्या दिवशी मला तुमची आठवण येत नाही.रात्री अपरात्री मी दचकून जागा होतो.आईच्या डोळ्यांत किती दिवसांत झोप उतरली नाही.तुमच्या आवडीचे काही घरात बनले की आईच्या डोळ्यांत पाणी तरळते.रूपालीने नविन काही कपडे घेतले तरी ते घातल्यावर ती सर्वात आधी तुमच्या तसबिरीसमोर उभी राहते तुम्हाला दाखवायला!!!आजही तुमचे अस्तित्व घरात जाणवते.तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे,तो सदैव रहाणार याची खात्री वाटते.
"LOVE YOU DAD"
"MISS YOU A LOT"

प्रिय मैत्रिणी

तसे बघितले तर आमच्या मैत्री १ दशकाहून जास्त जुनी आहे.एखाद्याला अचानक चांगला काही लाभ व्हावा तशी हिची मैत्री मला लाभली.माझी प्रिय सखी मैत्रीण. असे म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हिचे मनमोकळे स्मितहास्य तिच्या आई वडिलांना पाळण्यात दिसले असावे म्हणूनच तिचे नाव "स्मिती" ठेवले असावे.मी सदैव तिला आपले नाव सार्थ करतानाच पाहिले आहे.सदैव हसतमुख.हिंदीत एक वचन आहे "दुख अपने लिए रख,सुख सबके लिए" हे वचन म्हणजे स्मिती.माझी खूप जवळची मैत्रीण आहे ती.आम्ही खरेतर वळीवाच्या पावसासारखे भेटतो अचानक कुठेतरी न ठरवता.पण त्या पावसासारखीच आमची भेट असते.सुंदर,जुन्या आठवणींनी चिंब भिजलेली,नव्या चांगल्या आठवणी देऊन जाणारी.तिच्याशी बोलताना,व्यक्त होताना मला पुरुषाठायी स्त्रीप्रती असलेले अनाम अवघडलेपण कधीच जाणवले नाही.एखाद्या जिवलग मित्राच्या खांद्यावर हात ठेवत आपण ज्या सहजतेने संवाद साधतो तितक्याच सहजतेने मी स्मितीशी बोलू शकतो.आपल्या सहजसुंदर वागण्याने,प्रेमळ स्वभावामुळे तिने प्रचंड मोठा मित्रपरिवार जोडला आहे,तो ही असा की तिच्या एका हाकेवर हा मित्र परिवार धावत येईल.जीवनाचा संघर्ष कोणाला चुकलेला नाही पण स्मितीच्या वाटेला आलेला संघर्ष किती कठीण होता त्याचा मी साक्षीदार आहे आणि तो कठीण होण्यात तिने घेतलेले काही चुकीचे निर्णय जबाबदार आहेत.मी तिचा मित्र जरी असलो तरी मी तिने तिच्या आयुष्यात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे अजिबात समर्थन करणार नाही.पण तिच्या चुकांचे खापर तिने कधीही नशिबाच्या किंवा इतर कोणाच्याही माथी मारले नाही.परिस्थिती मान्य करून त्या परिस्थितीचा सामना करून ज्या खंबीरपणे ती आज उभी आहे ते खरंच कौतुकास्पद आहे.एक कुशल नृत्यांगना,आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आई,एक यशस्वी "BEAUTICIAN","TALENTZIA" ची सर्वेसर्वा,पार्ले महोत्सवाच्या नृत्य स्पर्धेची प्रमुख अशा अनेक भूमिका ती सुहास्य वदनाने लीलया पार पाडत आहे.आज तीचा वाढदिवस.तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि एक जुना मित्र म्हणून मला एकच सांगावेसे वाटते,आपण खूप चांगले आहोत म्हणून हे सगळे जग चांगले आहे असे नसते आणि संघर्ष करणे सोडू नकोस कारण तिच तुझी खरी ताकद आहे.
"HAPPY BIRTHDAY MY DEAR FRIEND"

पार्ल्याचा "नारायण"

ख्यातनाम लेखक आणि अस्सल पार्लेकर पू.ल.देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून अनेक व्यक्तिचित्रे प्रसवली.त्यातलेच एक म्हणजे "नारायण".हे एका अशा व्यक्तीचे चित्रण होते की एरवी ती व्यक्ती शांत असते पण प्रसंगी अनेक कामे तडीस नेते आणि ते कार्य पार पडेपर्यंत जीव तोडून काम करत असते पण जेंव्हा कौतुकाची वेळ येते तेंव्हा ती स्वत:ला कुठेतरी लपवते,दूर कुठेतरी उभी राहून तो कौतुक सोहळा बघत असते ज्याच्या पूर्णतेसाठी ती राबलेली असते.आपली आई आपल्यासाठी खूप प्रेमाने कष्टाने जेवण बनवते आणि ते जेवण जेवताना जेवणार्या बाळाच्या चेहर्यावरला आनंद बघून जसे आईला समाधान मिळते तसेच समाधान या 'नारायणा'च्या चेहर्यावर असते.पार्ल्याचा असा 'नारायण' म्हणजे आमचे सुधीर भाऊ रेवाळे.मी नेहमी म्हणत आलो आहे परागजींच्या चुंबकीय व्यक्तिमत्वामुळे अनेक जीवाभावाचे सहकारी त्यांना लाभले,सुधीर भाऊ त्यातलेच एक.पार्ल्यावर अतोनात जीव असणार्या परागजींसारख्या 'नरश्रेष्ठा'ला साथ आहे ती या 'नारायणा'चीच.महानगर पालिका असो वा एखाद्या कार्यक्रमासाठी परवानगी मिळवणे,महत्वाच्या कागदपत्रांची ने आण असो वा पार्ले महोत्सवाच्या पत्रकांचे काम,परागजींनी एकदा का सुधीरभाऊंना काम सांगितले की ते निश्चींत असतात कारण ते काम होणारच ही खात्री असते.भाऊंना ते काम पूर्ण केल्यानंतर परागजींच्या चेहर्यावर पसरलेला आनंद बघीतला की 'याचसाठी केला अट्टाहास' असे वाटून जाते. परागजींच्या अथवा ज्योतिवहिनींच्या प्रयत्नांनी सुरु झालेले पार्ल्यातले महानगरपालिकेचे काम सुधीर भाऊंच्या देखरेखीखालीच पूर्ण होते.मग ते रस्ता दुरुस्ती असो वा जलवाहीनीचे काम असो वा आणखी काही.सतत 'नारायण नारायण' करणारया नारदासारखा संपूर्ण पार्ल्यात सुधीर भाऊंचा सर्वत्र संचार सुरु असतो.तसा हा माणूस मितभाषी आहे.त्यात मुखी १२० चा रोल असतो.पार्ल्यातले तमाम पानवाल्यांचे बाकी कोणी नसू दे पण हे गिर्हाईक पक्के आहे.पार्ल्यात कुठे ही काम चालू असू दे आणि जर भाऊ तेथे उभे असतील बस्स भाऊंनी क्रिकेट मधला अंपायर जशी 'OUT'ची खूण करतो तसे आपले बोट वर केले की त्या नाक्यावरचा पानवाला लगेच कामाला लागतो.आपले काम झाले की त्या पानवाल्याकडून घेतलेला १२०चा रोल मुखात सरकवून स्वारी पुढच्या कामाला रवाना.त्यांची ही माव्याची सवय सुटावी म्हणून आम्ही सर्वानी आणि विशेषतः त्यांच्या 'बाय'ने खूप प्रयत्न केले.पण ही सवय काही सुटली नाही.याव्यतिरीक्त आणखी ही काही वाईट खोडी या माणसाला आहेत त्या म्हणजे समोरच्याला उगीचच फालतू प्रश्न विचारून भंडावून सोडण्याची जाम खोड ह्याना आहे आणि नारदाप्रमाणे सर्वत्र संचाराची कला आहेच पण त्याच नारदाप्रमाणे मित्रांमध्ये काड्या टाकून मजा बघायची पण खोड आहे.दीपा ताई हे आवडते लक्ष.पण बाकी अतिशय मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव.मित्रांसाठी काहीपण करायची तयारी हे ही खास.बामणोली या कोकणातल्या आपल्या गावावर त्यांचे खूप प्रेम.इतरवेळी रविवारी देखील सुट्टी न घेणार्या भाऊंची गणपतीची आठवडाभराची सुट्टी मात्र नक्की असते.आपल्या सहकार्यांची नेहमीच काळजी घेणार्या परागजींनी सुधीरभाऊंच्या विनंतीला मान देऊन खास पार्ल्यातून कोकणात गणपती साठी एस.टी.सेवा सुरु करून घेतली;त्यायोगे पार्लेकर कोकणी माणसांना गणपतीत कोकणात जाता यावे.त्या गावच्या वातावरणात राहून,ताजेतवाने होऊन परत आले की भाऊंची पुन्हा कामाला सुरुवात.आपले काम झाले की शांतपणे कुठेतरी एका कोपरयात गर्दीपासून लांब उभा राहिलेला हा 'नारायण' आम्ही मित्रांनी नेहमी बघितला आहे.भाऊ आज तुमचा वाढदिवस.तुम्हाला दीर्घायुष्य लाभो,तुमची १२०ची सवय सुटो हीच याप्रसंगी माझी स्वामीचरणी प्रार्थना.

तेरा मेरा साथ रहे

तो असेल 18 वर्षांचा,नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला,ती 15 वर्षांची..नवथर अल्लड तरूणी.एकाच परिसरातच नव्हे तर एकाच आळीत राहणारे...त्याच्या घराच्या चार घरे पुढे तिचे घर येता जाता पायाच्या टाचे पर्यंत लांब केस,जन्मजात लाभलेले अप्रतिम लावण्य त्याच्या नजरेस पडे.तिला ही हा खूप प्रेमळ,आई वडिलांना मानणारा,अभ्यास सोडून बाकी बाबतीत पुढे असलेला,पण चारचौघांपेक्षा वेगळा असलेला तरूण पाहण्यात होताच.एकाच आळीतले म्हणून ओळख होतीच.पण त्याला ती मनापासून आवडली होती,आणि त्याने एकदा आपले प्रेम तिच्याकडे व्यक्त केले.तिने ही होकार दिला आणि एक प्रेम कहाणी फुलू लागली.दोघांचीही वये लहान.आणि मग अशा वयातल्या प्रेमाचे जे काही होते ते त्यांचे ही झाले. प्रेमाच्या आणा भाका झाल्या,कधी दूर रहावे लागले तरी प्रेम होतेच.लग्न ही झाले लवकर....दोघांच्याही घरची परवानगी नव्हती....आळंदीत मामाच्या सक्षिने दोघे एकमेकांचे झाले.पुढचे कसलेही विचार नव्हते..संसार कसा करायचा याचे काही त्रैराशिक मांडले नव्हते.पण आता एकमेकांची साथ आहे हे नक्की केले होते.ती त्याच्यापेक्षा हुशार तर तो बोलण्यात हुशार पण शिक्षणात कमी त्यामुळे सुरुवातिचा काळ खूप कठीण होता.प्रेमाची धूंदी उतरून व्यवहार सुरु झाला.कुरबुरी झाल्या...आपल्यावर प्रेम करणारा करणारी ती हीच? तो हाच? प्रश्न पडू लागले....प्रेम करणे सोपे पण निभावणे कठीण...जाणवू लागले...तिने स्वात:ला त्या घरात जूळवून घ्यायला सुरुवात केली....घरातली माणसे खूप चांगली 3 बहिणी आणि हा एकच भाऊ सासू सासरे..सगळ्यांचे स्वभाव भिन्न पण प्रेमळ...जमवले तिने...नव्या जीवाची चाहुल लागली होती पण त्याच्या नोकरीचे काही होत नव्हते...मेव्हण्याने मदत केली एक व्यवसायाची सुरुवात करून दिली....त्याने स्वत:ला झोकून दिले.तिने ही शिक्षकी पेशा स्विकारला आणि खरया अर्थाने संसाराची गाडी मार्गी लागली....अल्लड प्रेम मागे राहिले आणि जोडीदारा प्रती वाटणारे आदराचे जिव्हाळ्याचे प्रेम वाढीस लागले....लहान वयात तिच्याकडे मातृत्व आले...सुरुवातीला ती भांभावली होती...पण मातृत्वाच्या जबाबदारीने तिला खूप काही शिकवले..तिला घडवले....तिला ठाशीव व्यक्तिमत्व दिले....त्याचमुळे दुसर्या अपत्याविषयी ती ठाम होती. त्याचा ही जम बसला होता... आणि ते दोघेही एका अल्लड प्रेमी जोड्यामधून एक जबाबदार जोडप्यामध्ये रुपांतरीत झाले.दोघांमधले प्रेम तर जुन्या मधाप्रमाणे सरत्या वर्षां गणिक अधिक घट्ट आणि गोड होत आहे.आज तर त्यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस...जुन्या कडू गोड आठ्वणीना उजाळा देत सर्व आप्त्स्वकीयांच्या उपस्थितीत साजरा करतायत दोघे.....आपल्या नम्र आणि लाघवी वागण्याने,बोलक्या स्वभावाने त्यांनी केवळ कुटूंबियांचेच नव्हे तर अनेकांचे मन जिंकले आहे...खूप मोठा मित्रपरिवार आहे त्यांचा.दोन्ही मुले आपल्या आई वडिलांसारखीच लाघवी आणि हुशार...मोठा मुलगा आता पुढिल शिक्षणासाठी अमेरिकेला निघालाय....२५ वर्षे लग्नाची आणि त्याआधी प्रेमाची सगळ्याचे सार्थक झाले...भांडले एकमेकांशी पण प्रेम कमी नाही होऊ दिले.कुटुंबाला धरून राहिले...अण्णा आणि वहिनी तुम्हाला दोघानाही लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आणि तुमच्यावर सौदागर चित्रपटातले लताबाईंनी गायलेले अजरामर गाणे अगदी फिट्ट बसेल

तेरा मेरा साथ रहे ,तेरा मेरा साथ रहे....
धूप हो छाया हो दिन हो के रात रहे....

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नीतू ताई

खरे तर ती चव्हाण कुटुंबातले शेंडफळ चार भावंडातली धाकटी बहीण आणि शेंडफळ म्हटले की खूप लाड होतात हा सर्वसाधारण समज आहे तिच्या बाबतीत तो काही अंशी खरा ही असेल,पण या चार ही भावंडानी आपल्या आई बाबांच्या मागे घर ही व्यवस्थीत सांभाळले हे कुणीही नाकारू शकत नाही आई-वडील दोघेही नोकरी करायचे, घरात चार भावंडं,परिस्थिती बेताचीच.त्यामुळेच असेल की काय या भावंडाना फार लवकर परिस्थितीची समज आली.कधी ही कसली तक्रार नाही आई वडिलांकडे उगीच हट्ट नाही.सदैव आनंदी.स्वभावाने तर ही चार ही भावंडे इतकी प्रेमळ की कधी कधी या प्रमाने जीव गुदमरतो.डोळ्यांत पाणी येते.तिचे लग्नही लवकर झाले.कर्तुत्ववान पण अत्यंत मनस्वी नवरा लाभला तिला. लक्ष्मीच्या पावलाने ती
साटम कुटुंबात आली आणि तिच्या येण्याने त्या घराची नेहमी भरभराट झाली. संसार म्हटला की कपातली वादळं आलीच आणि आयुष्य म्हटलं तर चढ उतार येणारच. या सर्वांमध्ये तिने आपल्या मनाचा तोल कधीच ढळू दिला नाही.साटम कुटुंबात तर अशी सामावलीय जणू दुधात साखर.आजवरच्या जीवनप्रवासात ती तरून गेली कारण लग्नानंतर तिने आत्मसात केलेला सर्वात महत्त्वाचा गुण आणि तो म्हणजे संयम.खूप कमी बोलते ती,खूप शांत असते याचा अर्थ तिच्या मनात भावनांची आंदोलने नसतात असं नाहीये. खूप विचार तिच्या डोक्यात. तिच्यावरही तिच्या संयमाची परिक्षा पाहणारे क्षण आले,पण ती प्रत्येक परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तिर्ण झालीय.नीतू ताई आज तुझा वाढदिवस आणि तुझा लहान भाऊ म्हणून मी एकच सदिच्छा व्यक्त करतो कि संयम कधी सोडू नकोस.तुला पुढच्या आयुष्यातही तुला तोच तुला साथ देणार आहे. मागे वळून बघू नकोस आणि पुढे काय होणार याचा विचार करू नकोस.वर्तमानाचा आनंद घे. इंग्रजीत एक वचन आहेे yesterday  was history, Tommorrow is mistory but Today is the gift,that's why it is called PRESENT".
जास्त विचार न करता समोर आलेले आयुष्य मनापासून जग एवढीच सदिच्छा!!!
Happy Birthday to you ताई

आद्य क्रांतीसूर्य

1911 सालातली गोष्ट असावी!! भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचे म्हणजेच इंग्रजांचं राज्य होतं अनेक स्वातंत्र्यसेनानी मायभूमीच्‍या स्वातंत्र्यासाठी लढत होते, झगडत होते, प्राणांची आहुती देत होते.त्यातल्याच एका अशा तेजस्वी क्रांतीसूर्याला अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा झाली; तीही किती??? तर पन्नास वर्षांची!! जेव्हा हा कैदी अंदमानच्या जेलमध्ये पोहोचला, त्याला खीजवण्यासाठी तत्कालीन जेलप्रमुखाने त्याला म्हटलं "काय आता पन्नास वर्षे खितपत पड या अंदमानच्या जेलमध्ये". पण त्या प्रखर देशभक्ताने आपले तेजस्वी डोळे त्या इंग्रजावर रोखले आणि म्हणाला पन्नास वर्ष?? अरे तेवढी वर्ष तुमचं राज्य तरी टिकेल काय?? एवढा प्रखर देशाभिमान, हिंदुत्वाबद्दल असलेली जाज्वल्य निष्ठा!!! असा दुसरा क्रांतीसुर्य होणे नाही!! त्या
क्रांतीसूर्याचे नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर. या आद्य क्रांतीसूर्याला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझे विनम्र अभिवादन!!! "झाले बहु,होतील बहु,परंतु या सम हाच"!!!

मित्रा फसवलेस....

जगातील सर्वात दुख:द घटना कुठली असावी तर एखादा आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्याला श्रद्धांजली द्यावी लागते तो.आज तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय!! माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या माझ्या एका जवळच्या मित्राला मला श्रद्धांजली द्यावी लागेतेय. हा क्षण कधी येऊच नये असं वाटलं होतं पण काळापुढे कोणाचं चालत नाही.काळच सर्वांना वेदना देतो आणि आणि त्या वेदनेवर फुंकर ही काळच घालत असतो. आमच्या भाजप (विलेपार्ले) परिवारातले महत्त्वाचे सदस्य माननीय श्री अभिषेक भार्गव ज्यांना आम्ही प्रेमाने अबू म्हणायचो त्यांचे आज दुर्दैवी निधन झालं. फार लवकर त्याने हे जग सोडून जाण्याची घाई केली.त्याने अजून वयाची चाळिशीही ओलांडली नव्हती. पण या लहान वयातही त्याने बरेच काही साध्य केलं होते.तो एक यशस्वी उद्योजक होता. भारतीय जनता पार्टी मध्ये त्याने फार लवकर कामाला सुरुवात केली आणि आपल्या अंगभूत गुणांमुळे तो फार लवकरच प्रभाग क्रमांक 85 चा अध्यक्षही बनला होता.तिथेही त्याने खूप चांगली कामगिरी करून दाखवली होती. परागजींच्या निवडणुकीच्या काळात,ज्योतीवहिनींच्या निवडणुकीच्या काळात अभिषेकने खूपच भरीव कामगिरी केली होती. पार्ले महोत्सवाच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांपैकी तो एक होता.गेले कित्येक वर्ष पार्ले महोत्सवाच्या नृत्यस्पर्धेचा प्रमुख म्हणूनही त्याने उत्तम कामगिरी बजावली होती.आपला मुद्दा (भलेही तो चुकीचा का असेना!! )पण रेटून तो कसा खरा आहे हे पटवण्यामध्ये त्याचा हात कोणीच पकडला नसता.माईक न घेताही मैदानाच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाईल एवढा भारदस्त आवाज होता त्याचा.आज तो आपल्यात नाही ही कल्पना खरं तर अशक्य वाटते आहे पण हेच वास्तव आहे.अभिषेक मित्रा तुझ्या मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुझ्यासाठी "तुला भावपूर्ण श्रद्धांजली" हे शब्द लिहावे लागतील असा कधी वाटला नव्हते,, पण ती वेळ आमच्यावर आली आहे,याचं दुःख फार मोठे आहे....

आभार

आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी खरच खुप सर्वांचा ऋणी आहे आणि भारावून गेलोय.🙂 माझे अत्यंत आवडते लेखक आणि महाराष्ट्राचे दैवत पु.ल. देशपांडे यांनी असे लिहून ठेवले आहे की माणूस किती श्रीमंत आहे हे त्याच्याकडे असलेल्या धन दौलतीने मोजू नका त्याने कमावलेल्या माणसांनी मोजा असं मानलं तर खरच मी खूप श्रीमंत आहे, की मला अशी प्रेमळ माणसे मिळाली आहेत. आपली पूर्वपुण्याई जबर असल्याशिवाय अशी माणसे भेटणे केवळ अशक्य आहे.माझा पार्ले मित्र परिवार ,माझ्या जुन्या ऑफिसमधले माझे सहकारी, माझ्या बालमोहन शाळेतले माझे मित्र मैत्रिणी,माझ्या कॉलेजचे माझे मित्र मैत्रिणी, माझे नातेवाईक, आप्तेष्ठ ज्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानतो.मी खरच स्वतःला भाग्यवान समजतो.कारण मला सर्व स्तरातले,वयोगटातील मित्र मिळाले मग ते ऐंशीची झुळुक लागलेले किरणे काका असोत व नुकतीच साठी ओलांडलेले शहाणे काका असोत,दादा भिसे असोत वा ज्याना मी आदराने गुरुजी म्हणतो ते आमचे चरण सर असोत.किंवा आज सकाळी सकाळी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेला माझ्या इमारतीचा आमचा नेपाळी वाचमन करण बहादूर असो. या माझ्या सर्व मित्रांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. कारण या वर्षी माझ्या वाढदिवसाला दुःखाची दुहेरी किनार होती.पहिली म्हणजे जगात पसरलेला करोना आणि दुसरा केवळ वीस दिवसांपूर्वी माझ्या पार्ले परिवारातील एक उमदा सदस्य अभिषेक भार्गव ज्याला आम्ही प्रेमाने अबू म्हणायचो त्याचे झालेले अकाली निधन.पण तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा दिल्यात आणि माझा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहील असा बनवलात.माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

त्रिकोणातला एक कोन

त्रिकोणाच्या नेहमी तीन बाजू असतात अशाच माझ्या माहितीतल्या घाग,मोरे आणि सूर्यवंशी या अभेद्य त्रिकोणाचा एक कोन म्हणजे श्री विश्वनाथ घाग म्हणजे आमचे सर्वांचे लाडके घाग काका यांचे आज दुर्दैवी निधन झाले. तसे हे वर्ष 2020 हे काही सुखद वर्ष नाहीच आहे. एकावर एक धक्के बसत आहेत पण हा धक्का निश्चितच अनपेक्षित होता कारण घाग काका तसे काटक होते,आनंदी होते.मला अजूनही आमच्या वैष्णोदेवी सहलीतले,सर्वांना सांभाळून घेणारे,सगळ्यांची काळजी करणारे,आनंदी घाग काका आठवतात.आपल्या तिन्ही मुलांवर निरतिशय प्रेम करणारे असे आमचे काका.नुकताच त्यांना नातू झाला होता.खूप आनंदात होते ते.
घाग,सूर्यवंशी आणि मोरे हे अद्वैत अगदी जुने. या तिघांची मैत्री चाळीस वर्षांपेक्षाही जुनी असावी.एकाच कार्यालयातले हे तिघे.राहायचे ही एकत्रच. एकाच वडाळा विभागातल्या कार्यालयीन निवासी संकूलात.नंतर निवृत्तीनंतरही नेहमी एकत्रच राहिले. आजही बदलापूरमध्येही हे तिघेही एकाच इमारतीत राहतात. एवढी जुनी मैत्री एवढा जुना ऋणानुबंध.पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही हे मात्र खरे.
 घाग,मोरे आणि सूर्यवंशी या अभेद्य त्रिकोणातला एक कोन आज कायमचा भंगला.घाग काका तुम्ही आमच्या मनात तुमच्या चांगल्या आठवणींच्या रुपाने सदैव राहाल.
तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली...
We All Miss You....

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विवेकजी

व्यवसायाने सनदी लेखापाल असल्याने सतत आकड्यांच्या खेळात गुंतलेले असतानाही अजिबात रूक्ष न झालेले, स्वभावाने खेळकर, प्रवृत्तीने शिक्षक असलेले आमचे मित्र माननीय विवेक रानडे ज्यांना सर्व त्यांचे मित्र परिवार प्रेमाने रॉनी असे म्हणतात त्यांचा आज वाढदिवस.विवेकजींची आणि माझी मैत्री झाली आमचे एक मित्र श्री गुरुचरणसिंग संधू यांच्यामुळे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत घडलेले विवेकजी तसेच शिस्तशीर आहेत आणि संघाशी संबंधित असलेला माणूस हा सदैव गंभीर असतो असा एक उगीचच (गैर)समज आहे. असा (गैर)समज कदाचित विवेकजींच्या बाबतीतही असावा; पण या माणसाच्या चेहऱ्यावर सतत एक मिश्किल हसू विलसत असते.बोलता-बोलता कधी समोरची विकेट काढतील सांगता येणार नाही. 2019 मध्ये आम्ही GST कार्यशाळेचे आयोजन केले होते.एक महिन्याची ती कार्यशाळा होती त्याच्यामध्ये काही वर्ग विवेकजींनी  घेतले आणि मीही त्या कार्यशाळेचा एक भाग असल्याने एक शिक्षक म्हणून विवेकजी किती चांगले आहेत याचा मला अनुभव मिळाला आणि आपल्या विषयात त्यांची काय जबरदस्त पकड आहे हे त्यावेळी जाणवलं.GSTसारखा क्लिष्ट विषय त्यांनी अतिशय खेळकरपणे समजावून सांगितला.शिकवीत असताना मध्येच एखाद्याने प्रश्न विचारला तर मात्र त्यांना अजिबात आवडत नसे.त्यांचे म्हणणे असे की मी शिकवून झाले की तुम्ही प्रश्न विचारा किंवा त्यांच्याच वर्गातला एखादा विद्यार्थी दुसऱ्या कोणाला ते शिकवत असताना एखादा भाग समजला नसेल तर सांगत असेल तर तेही त्यांना आवडत नसे आणि त्यांचे म्हणणे रास्त होते.कारण असे परस्पर विद्यादान झालेले त्यांना पटत नसे आणि मग ते रुद्रावतार धारण करीत, पण तोही लोभस असे. माझ्याशी त्यांची मैत्री केवळ  2 वर्षेच जुनी असेल पण ते माझ्याशी मी खूप त्यांचा जुना मित्र असल्यासारखे वागतात.खरेतर मी त्यांच्या वयाने खूप लहान आहे; हाही त्यांच्या स्वभावाचा एक भाग आहे. तर अशा आमच्या अष्टपैलू,हरहून्नरी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

गणेश अण्णा 50

बहुतेकांच्या घराला आढळणाऱ्या हॅपी बुद्धा सारखे सदैव आनंदी असणारे आणि निवांतपणा हा स्थायीभाव असणारेआमचे सर्वांचे लाडके बंधू माननीय श्री गणेश
अण्णा चव्हाण यांनी या वर्षी आपल्या वयाची 50 वर्षे पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.अत्यंत अगत्यशील,सदैव हसरा चेहरा आणि लहानपणापासूनच मोठ्या कुटुंबात राहिल्यामुळे अत्यंत गर्दीप्रिय असे हे व्यक्तिमत्व. माणसांच्या गोतावळ्यात राहायला आवडते म्हणूनच असेल,वेळ मिळाला की आपल्या बहिणींच्या कुटुंबासमवेत नवीन घेतलेल्या गाडीतून भटकंती करायला प्रचंड आवडते .खरेतर गाडी घेऊन त्यांना दोन एक वर्ष झाली असतील पण त्यांनी गाडी पुढच्या दहा वर्षात जेवढे धावेल एवढं दौडवीली आहे यावरून तुम्हाला कल्पना यावी.अण्णाकडे जर कधी जावे तर त्याच्या अगत्याने तुम्हाला गुदमरायला होते.हॉटेलमध्ये काय घेऊन जाईल,काय काय नवीन नवीन खाण्याच्या डिशेस मागवेल.घरच्या जेवणात पण खास बेत ठरलेला. त्यात आमची वहिनीपण सुग्रण आहे मग तर काय विचारायलाच नको.त्यामुळेच कदाचित अण्णाची तब्येत आता त्या हॅपी फेस बुद्धा सारखीच होत चालली आहे.बुद्धीच्या देवतेचे नाव लाभल्याने अत्यंत बुद्धिमान तर आहेतच आणि गोड खाण्याची आवड असल्यामुळे तो गोडपणा बोलण्यातही उतरलाय.आदर्श पती,आदर्श पिता,आदर्श पुत्र आणि आदर्श भाऊ अशा सगळ्या जबाबदाऱ्या लीलया पेलणारे आमचे बंधुराज; चेहर्‍यावरची लकाकी अजून वय तिशीतच थांबलेय असे वाटावे इतकी चांगली. मिशांची ठेवण थेट "भाऊजी" आदेश बांदेकरांसारखी,म्हणून पर्वतीचा आदेश बांदेकर असेही यांना म्हणतात.अश्या ह्या आमच्या सदैव आनंदी आणि गोड स्वभावाच्या भावाला सुवर्णमहोत्सवी जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

द ग्रेट मराठा सरदार

आजच्या दिवसाचे मानकरी आहेत ज्यांचा उल्लेख मी नेहमी "मराठा सरदार" असा करतो ते पार्ले महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष श्री.गुरचरणजितसिंग संधू अर्थात सर्वांचे लाडके "चरण सर".एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढण्यात अत्यंत तरबेज असलेले आणि सरदार असल्याने प्रत्येक आघाडीवर विजय मिळवण्याच्या जिद्दीने लढणारा हा लढवय्या. "जसा रोगी तसा इलाज " या कलेत तर ह्या माणसाचा कोणी हाथ पकडू शकत नाही त्यामुळे कोणाला कुठली मात्रा लागू पडेल याचा ह्यांचा अंदाज तर वाखाणण्याजोगा.जन्माने मराठी असलेल्यानांदेखील आश्चर्य वाटेल इतके सुंदर मराठी हा जन्माने मराठी नसलेला माणूस बोलतो.विले पार्ले म्हणजे मुंबईची सांस्कृतिक राजधानी,त्यामुळे इथे सतत काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते ह्यातल्या बहुतेक कार्यक्रमांत खारीचा का होईना वाटा घेऊन कोणत्याही वय्यक्तिक फायदा न बघता केवळ तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असलेला हा सच्चा पार्लेकर.औदुंबराला जेव्हढ्यावेळा फूल येत असेल त्यापेक्षा कमी वेळा ह्यांच्या चेहर्यावर हसू असते बाकी वेळी (उगीचच) गंभीर चेहरा. पण ह्या गंभीर चेहर्याच्या माणसाकडे (फक्त चेहराच गंभीर आहे,बोलता बोलता कधी समोरच्याची फिरकी घेतील याचा नेम नाही) अत्यंत कलासक्त मन आहे.सुप्तावस्थेत असलेली  "WAFS" पुनरुज्जीवित करण्याचे आणि त्यासाठी प्रामाणिक कार्यकर्ते जोडण्याचे श्रेय फक्त या माणसाला जाते.त्यासाठी त्यांनी केलेले भगीरथ प्रयत्न आम्ही पाहिले आहेत.विद्यार्थीदशेत असल्यापासून नृत्य,अभिनय ,राजकारण अशा अनेक क्षेत्रात मनसोक्त मुशाफिरी केलेला,त्यामुळेच आलेल्या अनुभवसंपन्नतेमुळे प्रवृत्तीने स्थिप्रद्न्य असलेला आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने निघालेल्या बाणाप्रमाणे सरळ गतिमान चालीसारख्या सरळ स्वभावाचा ,आयुष्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची झुळूक लागलेला हा आमचा चिरतरुण मित्र..... चरण सर तुम्हाला  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.सुरु झालेले २०१८ साल तुम्हाला अत्यंत यशस्वी कारकिर्दीचे जावो ही स्वामीचरणी प्रार्थना......

Happy Birthday Uday Dada

शुभेच्छा.. नमस्कार मंडळी ..... तर आजच्या शुभेच्छांचे मानकरी आहेत L & T रत्न श्री.उदय कुडतरकर ...... (टाळ्या).ह्या माणसाबद्दल काय सांगावे महाराजा. "Live Life King Size" हे जगण्याचे ब्रीदवाक्य असलेले हे महाभाग. खरे तर आपण आजच्या जमान्याचे "लिओनार्दो द विंची " च व्हायचे पण पदरी ( L & T) पडले आणि पवित्र झाले या उक्तीनुसार गेली तीस वर्षे इमाने इतबारे नोकरी केली,अजून करतात . पोलाद कंपनीत कामाला असून देखील (एकेकाळी) पोलादी शरीराच्या ह्या माणसाची कुंचल्यावरची पकड तितकीच नाजूक आणि नज़ाकतभरी आहे. रंगाच्या दुनियेत मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्या उदयजींनी अनेक सुंदर सुंदर चित्रे काढली आहेत.ह्याच्या जोडीला अत्यंत सुंदर गाता गळा ह्यांना लाभलेला आहे. अनेक गाण्याच्या मैफिली गाजवल्या आहेत. तर असे हे "गाणे ,चित्रकला ,छायाचित्रण,प्रवास" असे चांगले तर "अवाढव्य आणि वायफळ खरेदी,दुसऱ्याला उगीचच ज्ञानामृत पाजणे आणि प्रचंड झोप " असे भलते सलते षौक बाळगणारे,एक नुकतीच मिसरूड फुटलेला आणि नेहमी ह्यांच्याशी मान खाली घालून बोलणारा मुलगा (कारण तो ह्यांच्यापेक्षा उंचीने जास्त आहे ),एक निळ्या बटांचे केस असलेली मुलगी आणि मासे व चहा ह्या दोन गोष्टींवर नवऱ्याइतकेच प्रेम असणारी ह्यांची सुविद्य,गृहकृत्यदक्ष पत्नी ह्यांच्यात रमलेले एक बहुआयामी रुबाबदार व्यक्तिमत्व. एकाच वेळी अनेक मोबाईल चार्ज करायची सुविधा असलेला "बहुपिनी " चार्जरच जणू .....पण हा चार्जर स्वतः ला चार्ज करायला त्याच्या कोकणातल्या घरी जेंव्हा सुट्टी मिळेल तेंव्हा रवाना होतो ,तेथील निसर्गाच्या सान्निध्यात रमतो ,मनसोक्त गातो आणि खातो (म्हणून बऱ्याचदा एकटाच जातो )... डोक्यावरची कौले उडायला लागल्यावर विचार आला कोकणात एक कौलारू घर असावे आणि "अद्वैत "निर्मिती झाली. ते आता त्याचे "Most Favourite Destination " बनले आहे . आजूबाजूच्या मालवणी लोकांमध्ये आता चांगली उठबस होऊ लागली आहे .. तिकडच्या काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेहमी बोलवणे असते,स्थानिक मालवणी भाषाही लीलया बोलू शकतो.माझ्या आई वडिलांनी पुरविले नसतील एव्हडे लाड माझ्या ह्या भावाने माझे पुरविले आहेत  .तर अशा या कुडतरकर घराण्याच्या दुसऱ्या पिढीच्या नायकाला माझ्या तर्फे आणि संपूर्ण परब परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. "HAPPY BIRTH DAY UDAY DADA "

एका आर्य पुरुषाची निवृत्ती

एखाद्या ललनेला सहज आकर्षित करू शकेल अश्या रांगड़या पुरुषार्थाची सर्व लक्षणे मिरवणारया आणि अतिशय सुदृढ प्रजनन क्षमतेच्या पुरुषाला आपल्या संस्कृतीमध्ये आर्यपुरुष म्हणून संबोधतात.अश्या पुरुषाकडे अशी काहीतरी दैवी असते की कुठल्यातरी अनामिक ओढीने स्त्रिया चुंबकासारख्या ह्या पुरुषाकडे ओढल्या जातात.अश्याच कासवातल्या आर्यपुरुषाच्या गेल्या महिन्यातल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले.
"डिएगो" नावाचं कासव आपल्या वयाच्या शंभरीमध्ये निवृत्त झाले आणि ही त्याची निवृत्ती सर्वार्थाने गाजली.त्याला एका राष्ट्र वीराच्या सन्मानाने परत त्याच्या मूळ जन्मस्थानी सोडण्यात आले.आता ह्या डिएगोने काय एवढे मोठे कार्य केले ते आपण जाणून घेणे इथे फार महत्त्वाचे ठरते.त्यासाठी आपण आधी ह्या कासवाचा इतिहास जाणून घेऊ.
डिएगोचा जन्म 1920 सालातला एस्पाओला बेट, गॅलपागोस,स्पेन येथला. तेथील नैसर्गिक वातावरणात आपल्या आयुष्याची काही वर्षे आनंदात घालवल्यानंतर नंतर 1940 झाली डिएगो पकडला गेला आणि त्याची रवानगी झाली अमेरिकेतल्या कैलिफ़ोर्निया राज्यातील सॅन डिएगो राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात.तेथे ही स्वारी खूपच चांगली रमली आणि 1970 सालापर्यंत तिथे अत्यंत आनंदात डिएगो जगत होता.कस्तुरीमृगाला ज्याप्रमाणे आपल्या नाभीमध्ये कस्तुरी आहे हे जसे माहिती नसतं तसंच डिएगोलाही आपण कुठल्या कार्यासाठी जन्माला आलोय आणि आपल्याकडे काय आहे याची काहीच कल्पना नव्हती. रोजच्याप्रमाणे खाणे,आपल्या प्राणिसंग्रहालयात जिथे त्याला ठेवलं होतं त्या जागेत मनसोक्त विहार करणे एवढेच त्या बिचारयाला माहित. पण डीएगो खऱ्या अर्थाने प्रकाशात आला तो 1970 साली.त्याचे कारण असे की निसर्गनियमाप्रमाणे आणि मुख्यतः मानवनिर्मित घटनांमुळे अनेक प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. हूड आयलँड कासव(प्रजाती:-Chelonoidis hoodensis ) हेही त्यातलेच एक. या कासवांची शिकार मुख्यतः शेळीऐवजी पर्यायी अन्न म्हणून आणि त्याचे मोठे पाठीवरचे कवच यासाठी प्रामुख्याने केली गेली.स्पेन मध्ये प्रामुख्याने विकसित झालेल्या आणि तिथेच वाढत असलेल्या प्रजातीला अनेकांच्या क्षुधाशांतीसाठी प्रामुख्याने वापरले गेले; इतके की शेवटी या प्रजातीची फक्त बाराच कासवे शिल्लक राहिलीत असे तेथील स्थानिक वनअधिकार्यांना जाणवले.या प्रजातीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या कासवाची मान लांब असते आणि पूर्ण वाढ झालेले कासव हे पाच फुटापर्यंतही असू शकते. ही प्रजाती पूर्णतः शाकाहारी आहे.असो!! नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या ह्या कासवांच्या प्रजातीकडे वन्य विशेषकांचे लक्ष गेले नसते तरच नवल होते.मग त्यातली काही कासवे ही अमेरिकेतील सांताक्रूझ आयलँड येथील प्रजनन केंद्रात आणली गेली. हेतू हा की तेथे संरक्षित परिस्थितीमध्ये त्यांचे प्रजनन व्हावे आणि त्यांची संख्या वाढावी. तिथे या सर्व कासवांची शारीरिक तपासणी केली गेली पण असे लक्षात आले की तिथे प्रजननयोग्य नरांची संख्या कमी आहे. मग हा शोध पुन्हा सुरू झाला आणि डिएगो वर येऊन थांबला. डिएगोची पूर्णतः शारीरिक तपासणी करण्यात आली.त्याच्या जनुकीय बनावटीचाही अभ्यास केला गेला;त्यावरून असे लक्षात आले की डिएगो हाही हुड आयलंड प्रजातीला कासव आहे आणि प्रजनन योग्यही आहे.मग डिएगोची रवानगी सांताक्रुज़ आयलँड मधील प्रजनन केंद्रात करण्यात आली. ते साल होतं 1970 आणि त्यावेळी डिएगो होता पन्नास वर्षांचा. डिएगोप्रमाणेच आणखी दोन नर कासवे E 5 आणि E 3 यानांही याच कामासाठी प्रजनन केंद्रात आणले गेले.या तिघांनी मिळून आतापर्यंत २५००हून अधिक पिलांना जन्माला घालायचे सत्कर्म केले आहे.यात एकट्या डिएगोचा वाटा 900 पेक्षा अधिक पिलांचा म्हणजे या एकूण प्रजननातील तब्बल ४०% भार या कासवातील आर्यपुरुषोत्तमाने एकट्याने उचलला आहे.या प्रजनन केंद्रातील तज्ञांनी आपली निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्यानुसार डिएगोच्या प्रजातीतील बहुसंख्य माद्यांनी E5 आणि E3 या दोन नरांपेक्षा डिएगोला मिलनासाठी सर्वात जास्त पसंती दिली.याचं कारण E5 आणि E3 दोघेही प्रजनन करणे हे केवळ कार्य समजून ते कार्य करायचे आणि एवढे मिलनोत्सुक नसत.पण डीएगो मात्र मीलनाच्याबाबतीत आक्रमक,बोलका आणि आग्रही असायचा.त्यामुळे अश्या नरोत्तमाकडे माद्या आकर्षिल्या गेल्या यात नवल ते काय?? डिएगोही अपेक्षेपेक्षा जास्तच उत्साही निघाला.अगदी आताआतापर्यंत म्हणजे 2020 सालापर्यंत आपल्यावर सोपवलेले आपल्या प्रजातीच्या वाढीचे काम तो इमानेइतबारे करत होता.हुड आयर्लंड प्रजातीच्या कासवांची संख्या आता व्यवस्थीत वाढली आहे असे लक्षात आल्यावर सांताक्रुज़ आयलँड प्रजनन केंद्रातील अधिकार्‍यांनीही आपल्या प्रजातीच्या पुनरुथ्थानासाठी गेली पन्नास वर्ष झटलेल्या या कासवा मधल्या आर्या पुरुषाला त्याला शोभेल असाच निरोप द्यायचे ठरवले आणि पूर्ण सन्मानाने एखाद्या राष्ट्र वीराच्या मानाने डिएगोला नैसर्गिक वातावरणात परत नेऊन सोडण्यात आले जेणेकरून तो आपले उर्वरित आयुष्य निसर्गाच्या सानिध्यात सुखाने,समाधानाने घालवू शकेल.अर्थात तिथे सोडण्याआधी डिएगोची पूर्ण शारीरिक चाचणी पुन्हा एकदा करण्यात आली. निवृत्तीच्या वेळी शंभर वर्षाचा असलेला डिएगो शारीरिक चाचणीत सुदृढ आढळला.जर नैसर्गिक वातावरणात डिएगो कोणाकडून काही अपाय झाला नाही तर आणखी पन्नास वर्ष सहज जगू शकेल अशी त्याची शारिरीक तंदुरुस्ती सांगते.अशा या कासवातल्या आर्य पुरुषाला निवृत्तीच्या शुभेच्छा.आजच्या तरुण पिढीच्या फेसबुकी भाषेत बोलायचं तर या दिएगोसाठी एक लाईक तो बनता है.